आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदेलात २५ वर्षांत एकही गुन्हा नाही दाखल, बस्तर भागातील या गावात ग्रामस्थ एकत्र बसून वादावर काढतात तोडगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्ह्यात सहभाग आढळल्यास करतात आर्थिक दंड

दंतेवाडा- छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागातील दंतेवाडा जिल्ह्यातील उदेला या नक्षलवादग्रस्त भागात गेल्या २५ वर्षांत ग्रामस्थांनी गावात घडलेल्या कुठल्याही प्रकरणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला नाही. गावातील लोक एकत्र येऊन आपापसातील वाद स्वत:च मिटवतात आणि त्यावर तोडगाही काढतात.उदेला हे गाव दंतेवाडा जिल्ह्यातील कुआकोंडा पोलिस ठाण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. तेथे गेल्या २५ वर्षांपासून ग्रामस्थांनी गावात घटलेल्या कुठल्याही प्रकरणात ठाण्यात एफआयआर नोंदवलेला नाही. या गावातील लोक परस्परांत झालेली भांडणे किंवा वाद यावर चर्चेद्वारे तोडगा काढतात. ते पोलिस आणि न्यायालयांत खेटे घालण्याच्या विरोधात आहेत.

कुआकोंडाचे ठाणेदार जितेंद्र साहू यांनी सांगितले की, जवळपास पाचशे लोकसंख्या असलेल्या आदिवासीबहुल गावातील ग्रामस्थांनी आपली परंपरा आजही कायम ठेवली आहे. कधी-कधी गावातील समस्येच्या निराकरणासाठी ग्रामस्थ आम्हाला बोलावतात, तेथे त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. पण, आजपर्यंत या गावात कुठल्याही वादाची पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. याउलट आजूबाजूच्या गावांतील अनेक गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यामुळे उदेला गावाचे वेगळेपण लक्षात येते.

गुन्ह्यात सहभाग आढळल्यास करतात आर्थिक दंड

उदेला गावातील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे की, आमच्या पूर्वजांनी नेहमीच एकत्र येऊन आपापसातील वादावर चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. हे गाव १९९४ मध्ये कुआकोंडा पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत एकही प्रकरण किंवा तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली गेली नाही. जर गावातील कोणत्याही व्यक्तीचा गुन्ह्यात समावेश आहे असे आढळले तर त्याला आर्थिक दंड केला जातो शिवाय त्याला गावाबाहेरही काढले जाण्याची शिक्षा केली जाते. या निर्णयाचा प्रभाव अजूनही कायम आहे. कुठलीही आडकाठी न घालता ग्रामस्थ ही परंपरा मान्य करत आहेत. त्यामुळे गेल्या २५ वर्षांत एकही गुन्हा दाखल न होण्याचा विक्रम या गावाच्या नावे आहे.
 

बातम्या आणखी आहेत...