आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये : सदाभाऊ खाेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जायखेडा : अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती बाधित झाली असून, साडेचार लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. यात हंगामपूर्व द्राक्षांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तर बाजरी, मका, कांदा, डाळिंब, भाजीपाला, कांदा रोपे व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाला दिले. यात एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी महसूल व कृषी विभाग तसेच ग्रामसेवक यांनी घ्यावी व जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या अाहेत.


अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील विविध गावांना भेट दिली. यावेळी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी व सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. खोत यांनी बागलाण तालुक्यातील सटाणा, करंजाड, पिंगळवाडे, पारनेर-निताणे, बिजोटे, आखतवाडे, द्याने व परिसरातील गावातील नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी वायगाव येथील आत्महत्या केलेल्या केदा देवरे या शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.


पीक विमा जून-जुलैमध्ये लागू झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. यामुळे यावर पुनर्विचार केला जाईल, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. केवळ पीकविम्याची पावती व एक अर्ज द्यावा, केंद्र व राज्य सरकार तसेच विम्याच्या माध्यमातून मदत व कर्ज पुनर्गठनासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अहवाल देण्याचे व बागांना संकटांपासून वाचवण्यासाठी अनुदान व सवलतीत प्लॅस्टिक पेपर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या वेळी सदाभाऊ खोत यांनी दिले.

बँकांनी आततायीपणा केल्यास कठोर कारवाईचा इशारा
बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध राहील. प्रशासनाने यामध्ये कुठेही दिरंगाई केल्यास त्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कर्जवसुलीसाठी जमीन लिलावाच्या नोटिसा आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्यावर सदाभाऊ खोत यांनी संबंधित बँकांनी तत्काळ ही वसुली थांबवण्याच्या सूचना देण्यात येतील, शेतकऱ्यापेक्षा कोणतीही व्यवस्था मोठी नाही. बँकांनी आततायीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.

'कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही; उगाच ओरड कशाला?'
लासलगाव : परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रुपये किलो दराने खावा लागला तर खुशाल खाल्ला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही. विनाकारण कांद्याची ओरड थांबवावी. अन्यथा ओरडणाऱ्यांनी शेती करावी, असा सल्ला राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निफाडमधील कोळवाडी येथे दिला.


कोळवाडी येथील कोंडाजी पुंजा शिंदे यांच्या द्राक्षबागेत जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची खाेत यांनी पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.


कांद्याचे भाव अनेकदा अस्थिर होतात. त्यावेळी फक्त कांद्याची खूप चर्चा देशभरात हाेते. त्यासाठी कांदा आयात-निर्यातीचे धोरण किमान पाच वर्षांसाठी कायमस्वरूपी आखणे गरजेचे असल्याचे मत या वेळी खोत यांनी व्यक्त केले. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा असेल तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. तो नक्की करू, असेही त्यांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...