आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंद्रकांत शिंदे
मुंबई - शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडून आमच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. भाजपने याची कल्पनाही केली नव्हती, परंतु ते घडल्याने त्यांना काय करावे ते सुचेनासे झाले आहे. आमचे सरकार आता पडणार, उद्या पडणार, असे ते सतत सांगत शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भाजपने किती उसने बळ आणून सरकार पाडण्याचे प्रयत्न केले तरी हे सरकार पाच वर्षे तर पूर्ण करीलच, पण पुढेही महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपचे नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे सांगत भाजप फुटीच्या मार्गावर असल्याचे सूतोवाच केले आहे.
भाजप आता पुन्हा महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न करत असून काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेत असल्याचा आरोपही करत आहे. त्यातच हे सरकार फार टिकणार नाही, अशी वक्तव्येही भाजप नेत्यांकडून केली जात आहेत. याबाबत अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना या मंत्र्याने सांगितले की, भाजपने कितीही प्रयत्न केला तरी असे काही होणार नाही. आम्ही तिघेही एका समान कार्यक्रमाच्या माध्यमातून सत्तेवर आलो आहोत आणि त्या कार्यक्रमानुसारच आम्ही काम करत आहोत. तिन्ही पक्षांची वेगळी विचारधारा आहे. त्यामुळे काही वक्तव्ये होतात, परंतु आम्ही त्याचा सरकारवर परिणाम होऊ देणार नाही.
भाजपत गेलेल्यांना पक्षात परतण्याची इच्छा
नारायण राणे यांच्यावर आमदार फोडण्याची जबाबदारी दिली आहे, असे म्हटल्यावर या मंत्र्याने सांगितले, मला एक सांगा, सत्तेवर असलेल्या पक्षातील कोण फुटेल आणि भाजपमध्ये जाईल? उलट भाजपमध्येच गेलेले काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते परत पक्षात येऊ इच्छितात, तर भाजपचेही काही नेते भाजप सोडण्याबाबत विचार करत आहेत. शिवसेनेतील कोणीही फुटण्याची शक्यता नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असल्याने कोणी पक्ष सोडून जाईल हे शक्य नाही.
सत्ता सोडण्यास कोण तयार होईल?
दुसरी गोष्ट अशी की, शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे आणि सत्तेवर आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी गेली पाच वर्षे विरोधात बसले होते. आता अचानक सत्ता मिळाल्यानंतर ती सोडण्यास कोण तयार होईल? त्यामुळे कितीही काहीही वादविवाद झाले तरी आम्ही एकत्रच काम करणार. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाआघाडी झाली असून राज्यातील सत्तेसोबत अन्य ठिकाणीही आम्ही एकत्रच लढणार आहोत. प्रत्येक निवडणुकीवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवून आता कायमच विरोधी पक्षात ठेवणार, असेही या मंत्र्याने सांगितले.
मोदी लाट ओसरली, महाराष्ट्रातच भाजपची बोट बुडणार
भाजपची लाट ओसरली आहे. अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्यास उत्सुक आहेत. आठवडाभरात मोठे फेरबदल पाहायला मिळतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील, असे वक्तव्य केले होते. देवेंद्र फडणवीसही सत्तापालट होण्याविषयी बोलत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात कमल खिलेगा कार्यक्रम सुरू होणार, ही बातमी पेरली जात आहे. मात्र, मोदी लाट ओसरली आहे. पण महाराष्ट्रातच यांची बोट बुडणार.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.