आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"एक नवा पैसाही केंद्राला पाठवला नाही, मुळात केंद्राकडून पैसा आलाच नाही" देवेंद्र फडणवीसांचे 'त्या' दाव्यावर स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केला खळबळजनक दावा

मुंबई- देवेंद्र फडणवीस हे 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केंद्राचे 40 हजार कोटी रुपये वाचवले, असा खळबळजनक दावा भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केला होता. आता त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिले आहे. "केंद्राला एक नवा पैसाही परत पाठवलेला नाही, केंद्राकडून पैसा आलाच नाही, शिवाय काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही", असे म्हणत फडणवीसांनी अनंत कुमार हेगडेंचा दावा फेटाळून लावला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, "अनंत हेगडे नेमकं काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण जे काही मीडियातून समजतंय, त्यावरुन मला माहिती मिळतीये. अनंत हेगडेंचा दावा शंभर टक्के खोटा आणि चुकीचा आहे. एक नवा पैसादेखील महाराष्ट्राने केंद्र सरकारला परत केलेला नाही. मुळातच बुलेट ट्रेनकरिता एक नवा पैसा केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला मिळालेला नाही. बुलेट ट्रेनसाठी एक कंपनी तयार झालेली आहे. जी केंद्र सरकारची आहे. जेव्हा केव्हा बुलेट ट्रेनचे पैसे येतील, तेव्हा ते पैसे या कंपनीमध्ये येतील, महाराष्ट्र सरकारकडे येणार नाही. महाराष्ट्र सरकारची भूमिका ही केवळ जमीन हस्तांतरणाची आहे."
"ज्यांना अकाऊंटिंगची पद्धत समजते, त्यांना असे पैसे आले आणि परत पाठववले असं कधी होत नाही हे कळतं. तसंही मी जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री होतो, किंवा मुख्यमंत्री होतो, निवडणुकीनंतर किंवा त्याकाळात एकही धोरणात्मक निर्णय मी घेतलेला नाही. जोपर्यंत नियमित सरकार येणार नाही, तोपर्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार नाहीत, हे मी जाणीवपूर्वक सांगितले होते. त्यामुळे खोटे, चुकीचे पसरवण्यात येत आहे. मी पुन्हा स्पष्टपणे सांगतो की एक नवा पैसादेखील महाराष्ट्राचा केंद्राला गेला नाही, केंद्राने तो मागितलेला नाही. मागण्याचा विषय येत नाही, देण्याचा विषय येत नाही". असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

काय म्हणाले अनंत कुमार हेगडे ?


अनंत कुमार म्हणाले, "सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रात आमचा माणूस 80 तासांसाठी मुख्यमंत्री झाला. त्यानंतर फडणवीसांनी राजीनामा दिला. त्यांनी हे सर्व नाटक कशासाठी केलं? आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला माहित नव्हतं का? तरीही ते मुख्यमंत्री का झाले? हा तोच प्रश्न आहे जो सर्वजण विचारत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे जवळपास 40 हजार कोटी रुपयांचा केंद्राचा निधी होता. जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेत आले असते, तर त्यांनी या 40 हजार कोटी रुपयांचा दुरुपयोग केला असता. त्यामुळेच फडणवीसांनी 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन 15 तासाच्या आत केंद्राचा हा निधी परत पाठवला आणि केंद्राचं नुकसान होण्यापासून वाचलं," असा गौप्यस्फोट अनंतकुमार हेगडे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...