आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या 335+ सभा; भाजपच्या 330+ सभा, रॅली; 79 वर्षीय शरद पवार यांच्या 16 दिवसांत 60 सभा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे/अशोक अडसूळ 

मुंबई - प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळी थंडावल्याने गेल्या १५ दिवसांपासून मतांचा जोगवा मागत फिरणाऱ्या नेत्यांना आता काही तासांच्या ‘विश्रांती’ची संधी आहे. अर्थात जाहीर प्रचार संपला असला तरी दोन दिवस छुप्या प्रचाराचे राहणार असून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी नेहमीप्रमाणेच याची रणनीती तयार केली आहे. यामध्ये गेट मीटिंगपासून धार्मिक नेत्यांच्या भेटींपर्यंतचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. सुत्रांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार शनिवारी संपलेल्या प्रचारात भाजपने राज्यात ३३० पेक्षा जास्त  सभा व रॅली घेतल्या. यापैकी १७१ सभा व रॅली या केंद्रीय नेते आणि अन्य राज्यांतील नेत्यांच्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त ६५ च्या आसपास सभा आणि रॅली घेतलेल्या आहेत. दुसरीकडे, ७९ वर्षीय पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनेही सुमारे ३३५ सभा घेऊन राज्य पिंजून काढल्याच अंदाज आहे. आता प्रतीक्षा आहे ती २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीची...

भाजपच्या सभा आणि प्रचारफेऱ्या
 
भाजपने आपल्याला विरोधकच नाही, असा प्रचार केला. तथापि, पक्षाने राज्यात पंतप्रधान, राष्ट्रीय अध्यक्षांपासून अनेक केंद्रीय नेते आणि अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही मैदानात उतरवले होते.
> नरेंद्र मोदी 09  सभा
> अमित शहा 18 सभा
> नितीन गडकरी 35 सभा
> रामदास आठवले, शाहनवाज हुसेन, जेपी नड्डा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, विजय रूपाणी, वसुंधराराजे यांच्या प्रत्येकी 5 सभा 
> रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांनी 30 सभा घेतल्या.

पवारांच्या २१ जिल्ह्यांत सभा
घरी सांगून आलोय, असे म्हणून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडलेले ७९ वर्षांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी १६ दिवसांच्या प्रचारात २१ जिल्ह्यांत ६० सभा घेऊन आपला शब्द खरा करून दाखवला.
 

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या ३३५ सभा 
 
> जयंत पाटील  65 सभा   
> छगन भुजबळ 48 सभा   
> धनंजय मुंडे 38 सभा   
> अजित पवार 35 सभा   
> सुप्रिया सुळे 12 सभा   
> सुनील तटकरे 12 सभा   
> अमोल कोल्हे 65 सभा


> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १३ ते १४ सभा घेतल्या. या सभांतून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी मतदारांपुढे केली.

उद्धव ठाकरेंच्या ५० तर आदित्य यांच्या २२ सभा
शिवसेनेकडून प्रचाराची प्रमुख धुरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांभाळली. आदित्य वरळीतून निवडणुकीच्या मैदानात उभे असले तरी त्यांनी राज्यभर प्रचाराचा धुरळा उडवला होता. उद्धव ठाकरे यांनी ८ ऑक्टोबरला शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून प्रचाराची सुरुवात केली आणि १९ ऑक्टोबरपर्यंत ५० सभा घेतल्या. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २२ सभा राज्यात घेतल्या.राहुल यांच्या ५ सभा, प्रियंका-सोनियांची पाठ
सोनिया व प्रियंका गांधी यांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच सभा घेऊन काहीशी धुगधुगी निर्माण केली. 
> मल्लिकार्जुन खरगे 13 सभा
> भूपेश बघेल 12 सभा
> अशोक गेहलाेत 05 सभा
> सचिन पायलट 04 सभा
> ज्योतिरादित्य 05 सभा
> मुकुल वासनिक 28 सभा
> अशोक चव्हाण 15 सभा
> राजीव सातव 12 सभा
> हुसेन दलवाई 16 सभा
> सचिन सावंत 15 सभा
> शत्रुघ्न सिन्हा 05 सभा

वंचित बहुजन आघाडी
> प्रकाश आंबेडकर 50 सभा
> नामदेव जाधव  4 सभा
> अण्णाराव पाटील 15 सभा
> अंजली मायदेव 7 सभा
> सुजात आंबेडकर 5 सभा
> एकूण  81+

उमेदवारांचा भर छुप्या प्रचारावर; आयाेगाची पाळत लक्ष्मीदर्शनावर
मुंबई | जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर आता छुप्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अनेक मतदारसंघांत सुरू झाले आहेत. काही ठिकाणी पैसे वाटण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. मुंबईतील वरळी मतदारसंघात शनिवारी सायंकाळी निवडणूक आयाेगाचे भरारी पथक व पाेलिसांनी एका वाहनातून ४ काेटींची राेकड जप्त केली. तर बीड शहरातील खंडेश्वरी भागात मतदारांना पैसे वाटताना एकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून १.२५ लाख रुपये जप्त करण्यात आले.