आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुहान, इझोऊ शहरांतून कुणासही बाहेर जाण्यास मनाई; बस, विमानसेवा स्थगित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग / वॉशिंग्टन : चीनमध्ये कोरोना विषाणूचा परिणाम कमी झालेला नाही. प्रशासनाने खबरदारी म्हणून विषाणूच्या प्रभावाखालील वुहान व इझोऊमधील लोकांना बाहेर पडण्यास मनाई केली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही शहरांतून जाणाऱ्या बस, रेल्वे सेवा, विमान उड्डाणेही रोखण्यात आली आहेत.

चीनमध्ये शनिवारपासून पारंपरिक चिनी नववर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे प्रचंड सतर्कता बाळगली जात आहे. चीनमध्ये देश-विदेशातील सुमारे ४० कोटी लोक हा उत्सव साजरा करतात. यानिमित्ताने लोक गीत-नृत्यही सादर करतात. वुहानमधून गुरुवारी अखेरचे आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑस्ट्रेलियासाठी होते. त्यामधील सर्व यात्रेकरू मास्क परिधान करून होते. ऑस्ट्रेलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ब्रँडन मर्फी म्हणाले, प्रवाशांपैकी कोणीही आजारी नाही. चीनच्या नानजिंग शहरातही ३-९ फेब्रुवारीपर्यंत होणारा महिला ऑलिम्पिक फुटबॉल पात्रता सामना आता इतरत्र होणार आहे. चीनमध्ये ३१ डिसेंबर ते आतापर्यंत कोरोना व्हायरसचे ५७१ प्रकरणे समोर आली आहेत, तर १९ जणांचा मृत्यू झाला. त्याचा परिणाम अमेरिकेसह ९ देशांत दिसून येत आहे. सिंगापूरमध्येही गुरुवारी एक प्रकरण समोर आले आहे.

  • २४ दिवसांत अमेरिकेसह ९ देशांत संसर्ग, सिंगापूरमध्येही व्हायरस पोहोचला

'येणे जाणे थांबवणे कठीण'

कोरोना व्हायरसवरील नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होती. संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अॅडहेनम ग्रेब्रेयीसुस म्हणाले, चीनने वुहानमधून बस, रेल्वे व विमानांची बाहेरील सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विषाणूचा प्रभाव रोखता येणार आहे. त्यामुळे इतर देशांत हा विषाणू पोहोचण्याची शक्यता कमी होणार आहे.

संकटांचा सामना कठीण

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील चीनसंबंधी प्रकरणांचे तज्ञ दली यांग म्हणाले, वुहान शहराची लोकसंख्या सुमारे एक कोटी आहे. एवढ्या मोठ्या लाेकसंख्येवर कोरोना व्हायरसचा धोका अचानक आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासन व लोक पूर्णपणे सज्ज नाहीत. त्यामुळेच समस्या रोखणे कठीण होऊ शकते. वुहानसाठी ही आणीबाणी आहे.
 

पाकिस्तानात अलर्ट, सीपीईसी कर्मचाऱ्यांमुळे विषाणूचा धोका

इस्लामाबाद : पाकिस्तानने आपल्या रुग्णालयात कोरोना व्हायरसवरून सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागाने संबंधित विभागाला एक पत्र पाठवले. दर महिन्याला हजारो चिनी व पाकिस्तानी लोक परस्परांच्या देशांचा प्रवास करतात. त्यातून कोरोना व्हायरस पाकिस्तानात पोहोचण्याची शक्यता वाढली आहे. त्यातही चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्पासाठी (सीपीईसी) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा जास्त धोका आहे. केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. ए.बख्श मलिक म्हणाले, पाकिस्तान कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, २०१३ मध्ये पाकिस्तानात २० हजार चिनी लोक होते. परंतु सीपीईसीमुळे २०१८ मध्ये ही संख्या ६० हजारांवर गेली आहे. चीनचे ४०० छोट्या-मोठ्या कंपन्या पाकिस्तानातील सीपीईसीसाठी काम करत आहेत. त्याशिवाय दरवर्षी ५ लाख पाकिस्तानी विद्यार्थी चीनला जातात. त्यापैकी २२ हजार विद्यार्थ्यांना चीनमध्ये शिष्यवृत्तीअंतर्गत शिक्षण घेता येते. बंदरे व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांची तपासणी केली जात आहे, असे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.