आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारुपेश कलंत्री
औरंगाबाद- एमजीएमच्या प्रियदर्शिनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना वृक्षतोडीविरुद्ध दिव्य मराठीने घेतलेल्या ठाम भूमिकेला यश मिळाले. येथे आता एकही झाड तुटणार नाही, याची काळजी घ्या. उलट काही झाडे लावा. शिवाय मनपा पदाधिकाऱ्यांनी व्यवसायावर नजर ठेवून, मोठ्या उलाढालीसाठी आराखड्यात समाविष्ट केलेले फूड पार्क, अॅम्फी थिएटर, कॅफेटेरियाही रद्द करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेला शुक्रवारी (१० जानेवारी) दिले. २५ जानेवारीपर्यंत स्मारकाचा सुधारित सविस्तर विकास आराखडा (डीपीआर) तयार करून त्याला पीडब्ल्यूडीची मान्यता घ्या. निविदा प्रक्रिया सुरू करा, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी उदय चौधरींसोबत प्रियदर्शिनी उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर देसाई यांनी हॉटेल रामा येथे आढावा बैठक घेतली. दिव्य मराठीचे डेप्युटी एडिटर रुपेश कलंत्री यांनाही या बैठकीसाठी खास निमंत्रित करण्यात आले होते. शासनाच्या सर्व विभागांची परवानगी घ्या : सुधारित डीपीआर तयार झाल्यानंतर काम सुरू करण्यापूर्वी स्मारकासाठी लागणार्या सर्व शासकीय विभागांची परवानगी घ्या, असेही देसाई यांनी बजावले आहे. येथे सध्या एकच सुरक्षारक्षक कर्तव्यावर आहे. मात्र या परिसरात काही युवक वादग्रस्त प्रकार करत असल्याने आणखी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना त्यांनी मनपा आयुक्तांना केली.
यांची होती उपस्थिती : देसाई यांंनी घेतलेल्या बैठकीस महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेते विकास जैन, राजू वैद्य, त्र्यंबक तुपे, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, मे. आर्कहोम एजन्सीचे कन्सल्टंट मनोज दवे, आर्किटेक्ट धीरज देशमुख, प्रख्यात वास्तुविशारद भूपाल रामनाथकर, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.
फक्त आर्ट गॅलरी, संग्रहालय
आर्कहोम एजन्सीचे सल्लागार मनोज दवेे, आर्किटेक्ट धीरज देशमुख यांनी मनपा पदाधिकाऱ्यांच्या हट्टामुळे स्मारकासह परिसर विकासाचा ६४ कोटींचा आराखडा केला होता. त्यात फूडपार्क, अॅम्फिथिएटर, कॅफेटेरिया, सर्व्हिस बिल्डिंग, आर्ट गॅलरी, संग्रहालय समाविष्ट हाेते. यासाठी एक हजारांवर झाडे तोडण्याचे नियाेजन हाेते. 'दिव्य मराठी'ने डीबी स्टार'च्या माध्यमातून त्याविराेधात अभियान छेडले. त्याची दखल घेत देसाईंनी स्मारकासाेबत फक्त आर्ट गॅलरी, संग्रहालयच करावे. चिल्ड्रन पार्कमध्ये बदल करा, असे स्पष्ट केले. फडणवीस सरकारने १० कोटींत स्मारक, परिसर विकासाचे अादेश दिले हाेते. मात्र आता देसाई यांच्या आदेशाने ६४ कोटींचा खर्च त्यात कमी होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री देसाई यांच्या बैठकीत स्मारकाचे सादरीकरण
देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीपूर्वी अर्बन अटेलियरचे धीरज देशमुख, अभय जयपूरकर, प्रशांत संचेती यांनी आराखडा सादर केला. उद्यानातील तळ्यात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची कल्पना त्यांनी मांडली. खुल्या जागेत आर्ट गॅलरी, फूड कोर्ट आणि शेजारी अॅम्पिथिएटर उभारावे, असे त्यात म्हटले होते. त्याला 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने आक्षेप घेत एमजीएममध्ये एक अॅम्फिथिएटर असताना दुसऱ्याची गरज काय? फूड कोर्ट असेल तर लोकांचा वावर कसा कमी होईल? असा सवाल केला. बाळासाहेबांच्या स्मारकाची पाटी लागलेल्या जागेवर कचरा डेपो कसा करू शकता? या प्रश्नांवर सारेच शांत झाले होते. पर्यावरण प्रेमी राजेंद्र जोशी यांनीही उद्यानातील सुरक्षेचा मुद्दा मांडला. जिल्हाधिकारी चौधरी आणि मनपा आयुक्त पांडेय हेही पर्यावरणपूरक भूमिका बैठकीत लावून धरत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.