आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • No Unilateral Adjournment On 'CAA' Without Hearing Of The Center's Opinion, Hearing Before 5 Bench Of Justices On 144 Relevant Petitions

केंद्राचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय 'सीएए'वर एकतर्फी स्थगिती नाही, संबंधित 144 याचिकांवर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीवर (एनपीआर) स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी तूर्त स्पष्ट नकार दिला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारची बाजू ऐकल्याशिवाय एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.
सर्वाेच्च न्यायालयात सीएएच्या विरोधात १४२ आणि समर्थनार्थ दोन याचिका दाखल आहेत. केंद्र सरकारने आतापर्यंत ६० याचिकांवर उत्तर दिले आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने उर्वरित ८४ याचिकांवर केंद्र सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यांत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. यासंदर्भात तात्पुरता दिलासा देण्याबाबत यानंतरच विचार केला जाऊ शकेल.

सुप्रीम कोर्ट लाइव्ह : उत्तर प्रदेशात सीएए प्रक्रिया सुरू, ४० लाख लोक संशयित : सिंघवी

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, एस. अब्दुल नजीर आणि संजीव खन्ना यांच्या पीठाने सीएएच्या मुद्द्यावर १०.४५ वाजता सुनावणी सुरू केली. केंद्राच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. अॅड. राजीव धवन, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद मांडले. वाचा लाइव्ह कार्यवाही...

 • वेणुगोपाल : १४४ याचिका झाल्या आहेत. आम्हाला ६०च माहिती होत्या. याचे उत्तर आम्ही दाखल केले आहे. उर्वरित ८४ याचिकांवर म्हणणे मांडण्यासाठी ६ आठवडे द्यावेत.
 • सरन्यायाधीश : सर्व याचिकांवर केंद्राचे म्हणणे येईपर्यंत वाट पाहिली पाहिजे.
 • सिब्बल : हा मुद्दा पाचसदस्यीय घटनापीठाकडे सोपवला पाहिजे.
 • विकास सिंह : या कायद्याबाबत आसाममध्ये वेगळी स्थिती आहे. कटऑफ तारीख १९४८ ते १९७१ करण्यास सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. तो निकाल प्रलंबित आहे. त्याचीही सुनावणी घटनापीठाने करावी. त्रिपुरामध्ये या कायद्याबाबत वेगळी स्थिती आहे.
 • वेणुगोपाल : आसामच्या याचिका वेगळ्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांनतंर घ्याव्यात.
 • सरन्यायाधीश : आसाम व त्रिपुराच्या याचिका वेगळ्या ऐकल्या जातील.
 • तुषार मेहता : कोर्टाने आता नव्या याचिका स्वीकारू नयेत. कुणाला काही सांगायचे असेल तर वेगळा अर्ज करावा. हायकोर्टांनाही सुनावणी करू नका म्हणून सूचना द्याव्यात.
 • राजीव धवन : प्रकरण घटनापीठाकडे द्यावे की नाही यावर कोर्टाने निर्णय घ्यावा.
 • सरन्यायाधीश : आम्हाला सबरीमाला प्रकरणी सुनावणी करावयाची आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे.
 • धवन : दोन्ही पक्षांनी काही वकील नेमावेत. कोर्टाने तात्पुरता दिलासा म्हणून सीएएला स्थगिती द्यावी.
 • वेणुगोपाल : कोणताही अंतरिम आदेश देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी.
 • सरन्यायाधीश : केंद्र सरकारचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही आदेश आम्ही देऊ शकत नाही.

सीएएवर नवीन याचिका ग्राह्य नाही

कोर्ट म्हणाले, सर्व याचिकांवर सुनावणीसाठी ५ सदस्यीय घटनापीठ स्थापले जाईल. आता सीएएवर नवीन याचिका ग्राह्य धरली जाणार नाही. याबाबत निकाल देईपर्यंत सर्व हायकोर्टांनी सीएएबाबत सुनावणी करू नये, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यासंदर्भात आसाम आणि त्रिपुरातून दाखल याचिकांची वेगळी सुनावणी केली जाईल.