आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचोलीत एकही मतदार नाही! कोणत्या देशात राहतो हेही माहिती नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राठोड 

आर्णी/यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यातील चिंचोली (बोरगाव) हे गाव २००२ मध्ये फासे पारधी समाजातील लोकांनी जंगलातील एका पडीक जागेवर वसवले. या गावातील लोक बाहेरील जगापासून आजही दूरच आहेत. या समाजाचा मूळ व्यवसाय शिकार, पण शिकारी वर बंदी आल्यानंतर या सामाजातील लोकांपुढे दोन वेळेचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी १९९४ पासून जंगलाच्या परिसरात पडीक शेतजमिनी वाहितीत आणून शेती सुरू केली.  हे गाव देशाच्या नकाशावर नाही. विशेष म्हणजे फासेपारधी सामाजातील तीनशे लोकांना ७२ वर्षांनंतरही मतदानाचा अधिकार मिळालेला नाही. गावाला ‘गावा’चा दर्जा नाही. त्यामुळे गावातील सर्वच नागरिक मतदान,आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि शासनाच्या विविध सोयी-सुविधांपासून वंचित आहेत.

तीनशेपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या या पाड्याची शासनदरबारी ओळखच नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी जमात म्हणून मारलेला शिक्का आजतागायत पुसला गेलेला नाही. त्यामुळे या लोकांची अवस्था “ना घर का, ना घाट का” अशी झाली आहे. भटक्या विमुक्त जाती व जमातीअंतर्गत येणाऱ्या फासे पारधी सामाजातील तीनशेपेक्षा जास्त लोक आजही घटनात्मक हक्कापासून वंचित आहे. कुठेही जबरी चोरी झाल्यानंतर पोलिस सर्वात आधी या पारधी समाजातील लोकांना तपासासाठी तब्यात घेत असल्याचे या लोकांनी सांगितले. पोटापाण्याचा बंदोबस्तासाठी या समाजातील नागरिक वणवण भटकंती करून जगतात. या तीनशेपेक्षा जास्त नागरिकांना मतदानाचा अधिकार नसल्याने ते या निवडणुकीत पुन्हा मतदानापासून वंचित राहणार आहेत.
 

पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार माहीत नाहीत
चिंचोली (बोरगाव) पाड्यावर राहणाऱ्या फासेपारधी सामाजातील लोकांना आजही ते कोणत्या देशात राहतात, देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार हे कोण आहेत हे माहिती नाही. पन्नास-साठ घरांच्या वस्तीत आठ मोबाइल आणि आठ टीव्ही त्यांच्याकडे आहे. मात्र, शिक्षणाअभावी बातम्या काय असतात ते त्यांना समजत नाही. टीव्हीवर केवळ चित्रपट पाहत असल्याचे ते सांगतात
 

पन्नास मुले शिक्षणासाठी अमरावती जिल्हात
शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी काही ग्रामस्थांनी गावातील ५० मुलांना मंगरूळ (चवाळा, जि. अमरावती ) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी पाठवले आहे. 
 

पाणी, रस्ते, वीज या सुविधांपासून वंचित
जंगलातील या पारधी बेड्यावरील लोकांना कोणत्याच सोयी-सुविधा मिळत नाहीत. ते जंगलातून वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. 

बातम्या आणखी आहेत...