आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शिवरायांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही' : छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेड राजा : मी रायगडवाडीच्या पायथ्याच्या बागेत जाईन, पण दुसऱ्या बागेत (रेशीमबाग) जाणार नाही. आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक येत आहे, परंतु त्यांचीच काय, तर कुणाचीही तुलना शिवरायांशी होऊ शकत नाही, असा रोखठोक प्रहार छत्रपती संभाजी राजे यांनी केला, तर दिल्लीतही शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्या वेळी राष्ट्रपती, नौदल, लष्करप्रमुख अभिवादन करायला यायला लागले, असेही छत्रपती संभाजी राजे म्हणाले. तर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केंद्र सरकारने भारतीय नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा तर आणला, परंतु त्याची अंमलबजावणी करणे सहजासहजी शक्य होणार नाही तसेच हा कायदा बदलायचा असेल तर सरकार बदलावे लागेल, असा इशारा सरकारला दिला.

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवधर्मपीठावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संभाजीराजे म्हणाले की, आपणास मराठा विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, परंतु आपण पुरस्कारासाठी काम करत नाही. सलग १२ वर्षे जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतो. काही कारणावरून आधी विमनस्क अवस्थेत गेलो होतो. नंतर त्यातून बाहेर पडत मी कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्रात हिंडलो. लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले. रायगडावर राज्याभिषेक सोहळा सुरू केला. तेथे दरवर्षी ४ ते ५ लाख लोक येतात. त्यांच्या प्रेमापोटी पुरस्कार मावळ्यांच्या हस्ते स्वीकारला. मराठा समाजाला तर आरक्षण नाही हे लक्षात आले. शाहू महाराजांनी तर दिले होते. सारथीसारख्या संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्याविरुद्ध आंदोलन केले, रस्त्यावर बसलो. त्या वेळी मागण्या मान्य झाल्या.

कायद्याविरोधात निघणाऱ्या मोर्चांमध्ये दंगली घडवून आणण्याचे कारस्थान त्यांचेच असल्याचा आरोप पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला. ही मंडळी अखंड हिंदुस्थान म्हणत असली तरी भारताचे तुकडे करण्याचा त्यांचा इरादा असल्याचेही म्हटले. ओबीसी कार्ड वापरून मोदी पंतप्रधान झाले असले तरी त्यांचा विचार व कावा वेळीच ओळखण्याचे आवाहनही त्यांनी केले. याच वेळी डॉ. शिंगणे यांच्या माध्यमातून राज्य शासनाने समुद्रातील शिवस्मारक जमिनीवर आणावे. त्यासाठी राजभवन, महालक्ष्मी रेसकोर्स आदी ठिकाणेही खेडेकर यांनी सुचवली.

प्रबोधनकारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा

छत्रपती संभाजी राजे यांनी किल्ल्यांचे फेडरेशन करण्याचे ठरवले असून, राज्य शासनाने त्याला मदत करावी, पुरातत्त्व खात्याचे इंग्रजकालीन कायदे रद्द करावेत, असेही सुचवले. तसेच २०१४ नंतर बंद पडलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणे नवीन राज्य सरकारने सुरू करावा. यासाठी पुरोगामी विचारांच्या व्यक्तींना जसे सत्यपाल महाराज, आ. ह. साळुंखे यांना किंवा प्रबोधनकार ठाकरे यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असेही खेडेकर यांनी सुचवले.
 

बातम्या आणखी आहेत...