Home | Maharashtra | Vidarva | Akola | 'Non licensing business' running due to no License inspector

परवाना निरीक्षक नसल्यामुळे सुरु आहे 'विना परवाना व्यवसाय'

श्रीकांत जोगळेकर | Update - Sep 08, 2018, 12:05 PM IST

मनपाच्या जवळपास ९६ चौरस कि.मी. क्षेत्रफळातील बोटावर मोजण्या इतके व्यावसायिक वगळल्यास इतर व्यावसायिक विना परवाना व्यवसाय

 • 'Non licensing business' running due to no License inspector

  अकोला- मनपाच्या जवळपास ९६ चौरस कि.मी. क्षेत्रफळातील बोटावर मोजण्या इतके व्यावसायिक वगळल्यास इतर व्यावसायिक विना परवाना व्यवसाय करीत आहे. यामुळे मनपाला लाखोंच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे पदाधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे.


  मनपाचे मालमत्ता, पाणीपट्टी, विकास शुल्क, परवाना, दैनिक वसुली, अतिक्रमण आदी उत्पन्न देणारे विभाग आहे. मात्र मालमत्ता कर वगळता उत्पन्नाच्या इतर स्त्रोतांकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. मनपा क्षेत्रात काही व्यवसाय वगळता प्रत्येक व्यवसायासाठी परवान्याची गरज असते. त्याचे दरवर्षी नूतनीकरणही करावे लागते. न केल्यास दंडाची आकारणी केली जाते. वार्षिक परवाना शुल्क शेकडो रुपयात आहेत. काही विशिष्ट व्यवसायासाठीच अधिक परवाना शुल्क आकारले जाते. नगरपालिका क्षेत्रात परवान्याची गरज नसली तरी मनपा क्षेत्रात व्यवसाय करताना परवाना काढावा लागतो. या शुल्कातून मनपाला उत्पन्न मिळावे, हाच या मागचा उद्देश आहे.


  मनपातही परवाना विभाग कागदावर शिल्लक राहिला आहे. कारण महसूल मिळवून देणाऱ्या या विभागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मनपा हद्दवाढीपूर्वी २८ चौ. कि.मी.क्षेत्रफळाच्या मनपा ४ परवाना निरीक्षक, ४ लिपिक होते. १८ हजार व्यावसायिकांजवळ परवाना होता. हद्दवाढीनंतर मनपाच्या क्षेत्रफळात वाढ झाली. शहरालगतची २१ खेडे मनपात समाविष्ट झाली. त्यामुळे परवाना निरीक्षक, लिपिकांच्या संख्येत वाढ अपेक्षित होती. मात्र कार्यरत परवाना निरीक्षकाच्या सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्या परवाना निरीक्षकांची नियुक्ती केली नाही, परिणामी मनपाच्या क्षेत्रफळात ९६ चौ.कि.मी.ने वाढूनही परवाना धारक व्यावसायिकांची संख्या मात्र १८ हजारच आहे. यामुळे मनपाला महसुलापासून वंचित राहावे लागत आहे.


  हद्दवाढ होवून लोटली दोन वर्ष

  मनपाच्या हद्दवाढीपूर्वी परवाना विभाग शहरात सर्वत्र पाेहोचला नव्हता. त्यामुळे हद्दवाढीपूर्वी अनेक लघु व्यावसायिक, व्यावसायिक विना परवाना व्यवसाय करीत होते. हद्दवाढीनंतर मनपात आलेल्या गावातही परवाना निरीक्षक नसल्याने येथे बोटावर मोजण्या इतके व्यावसायिक वगळल्यास अनेक व्यावसायिकांकडे परवानाच नाही.


  एक अधीक्षक,एक लिपिक, दोन चपराशी

  महापालिकेला महसूल मिळवून देणाऱ्या परवाना विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. पूर्वी वाणिज्य (परवाना) अधीक्षक, चार परवाना निरीक्षक, चार लिपिक, दोन चपराशी असलेल्या या विभागात आता केवळ एक वाणिज्य अधीक्षक, एक लिपिक आणि दोन चपराशी असा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.


  परवाना विभागाकडून एक कोटी उत्पन्न अपेक्षित
  तूर्तास परवाना विभागाकडून वर्षाकाठी ४५ लाख रुपयाचा महसुल महापालिकेला मिळतो. परवाना विभाग सक्षम केल्यास तसेच परवाना आवश्यक असलेल्या व्यावसायिकांना परवाना काढण्याची मोहिम तसेच नूतनीकरणाची मोहिम राबवल्यास महापालिकेला परवाना विभागाकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळु शकते, अशी माहिती महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Trending