आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहिंसा, करुणा ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देण : दलाई लामा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : प्रत्येक माणसाची मूळ इच्छा आंतरिक शांतीची आहे. त्याचाच शोध घेण्यासाठी प्रत्येक जण पृथ्वीवर आला आहे. पण हल्ली जगातील विविध समुदायांत आणि धर्मांत द्वेष निर्माण झाला आहे. अहिंसा आणि करुणेत प्रचंड शक्ती आहे. द्वेष, ईर्षा, तिरस्कार नष्ट करून सुसंवाद साधण्याचे कौशल्य यामध्ये आहे. अहिंसा आणि करुणा ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी भेट आहे, असे मत बौद्ध धम्माचे सर्वात मोठे गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.

जागतिक धम्म परिषदेत उपासक-उपासिकांना संबाेधित करण्यासाठी औरंगाबादेत आलेले दलाई लामा पत्रकारांशी बोलत होते. लामा म्हणाले, भारताने जगाला अतिप्राचीन काळापासून अहिंसा आणि करुणेचा संदेश दिला आहे. तो आजच्या परिस्थितीत संपूर्ण जगाला लागू होतो. भारताचे हेच सौंदर्य आहे. अहिंसा आणि करुणेने प्रत्येक संकटावर मात करता येते, असे उदाहरण भारताने घालून दिले आहे. या महान भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल मी जगभरात बोलत असतो. विविध धर्मातील कलह पाहून माझे मन पिळवटून येते.

धार्मिक सुसंवाद :


अहिंसा आणि करुणेत मन:शांती स्थापित करण्याची शक्ती आहे. अहिंसा बुद्धिवादातून, तर करुणा हृदयापासून पाळली जाते. बुद्धांनी शिकवलेले तत्त्वज्ञान मन:शांती देणारे आहे. धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनातून या ज्ञानाला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे.

निराेगी शरीरासाठी अांतरिक शांती गरजेची : लामा म्हणाले, आजाराच्या मुळाशी अशांती आहे. द्वेष आपल्यातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. मानवतेच्या कल्याणासाठी दयेचा प्रचार-प्रसार ही माझी दुसरी प्रतिज्ञा आहे. माणूस समाजशील प्राणी आहे. त्याच्या मनातील भाव इतरांवर प्रभाव पाडतात, असा माझा विश्वास आहे.

आधुनिक शिक्षणामुळे मनःशांती हरवली


भारतात ब्रिटिशांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. ती रुजली. आधुनिक शिक्षण हे भौतिकवादाकडे नेणारे आहे. त्यामुळे आज भौतिकवादाला महत्त्व आल्याचे दिसते. यातून मनःशांती नष्ट झाली आहे. मी अनेकदा मित्रांना गमतीने म्हणतो की, मॉडर्न शिक्षण घेतलेल्या भारतीयांपेक्षा मी खरा भारतीय आहे. प्राचीन ज्ञानाचा व तत्त्वाचा आदर करून मी कार्य करत आहे, पण फक्त बोलून भागणार नाही. तर या ज्ञानाला शास्त्राच्या आधारे नव्याने सिद्ध करावे लागणार आहे. मॉडर्न शिक्षणासोबत मूळ तत्त्वज्ञान पिढ्यांना शिकवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.