आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदाघाटावर छटपूजेला उत्तर भारतीयांची मांदियाळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - उत्तर भारतीयांच्या छटपूजेत शहर व परिसरातील हजारो भाविकांनी गोदाघाटावर विधिवत पूजा करून सूर्याला अर्घ्य दिले. सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत पूजेला प्रारंभ झाला. सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देत पूजा संपन्न होणार आहे. गोदाघाटावर भाविकांसाठी खास भोजपुरी संगीत कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कुटुंबियांच्या सुख शांतीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी महिला व पुरुष दोघेही सूर्य नारायणाचा उपवास आणि पूजाविधी करत असतात.


उत्तर भारतीय बांधवांचा सर्वात मोठा पूजा सोहळा अर्थात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने गोदा घाटावर साजरा करण्यात आला. मंगळवारी चार वाजता रामकुंड परिसरात शेकडो उत्तर भारतीय भाविकांनी मावळत्या सूर्याला अर्घ्य देत पूजेला प्रांरभ केला. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, नगरसेवक गुरुमित बग्गा यांच्यासह रावसाहेब कोशिरे, द्वारकानाथ तिवारी, देवांग जानी, धनंजय बेळे, प्रकाश चौहान, निरंजन चौधरी, राजाभाऊ पाटील, उमापती अाेझा यांच्यासह उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अतिरिक्त पोलिस बंदोबस्त
छटपूजेनिमित्त गोदाघाटावर पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तीन अधिकारी, ५० कर्मचारी आणि 'एसआरपीएफ'ची विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती.


अशी केली जाते छटपूजा...

दिवाळीपासून सहाव्या दिवशी छटपूजेचे आयोजन केले जाते. पूजेच्या तीन दिवस आगोदर २४ तास निर्जल उपवास सुरू केला जातो. सूर्य मावळण्याच्या चार तास आधी पूजा करणाऱ्या स्त्रिया आणि गर्भवती महिला अथवा आजारी स्त्रियांचे पती गंगेच्या पाण्यात प्रवेश करतात. सूर्यदर्शन घेऊन पूजेची सांगता केली जाते. गायीच्या दुधाने मावळत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. पूजेनंतर भोपळ्याची अथवा हरभऱ्याची भाजी, तांदळाची खीर खाऊन उपवास सोडला जातो. पूजा केल्यानंतर प्रार्थना दाेन महिने अथवा वर्षात पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

बातम्या आणखी आहेत...