आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उ. कोरियाने लष्करी संचलनापासून आंतरखंडीय क्षेपणास्त्रे दूरच ठेवली, आर्थिक विकासावर भर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्योंगयाँग- उत्तर कोरियाचा ७० व्या स्थापना दिन रविवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित लष्करी संचलनात नेहमीप्रमाणे दिसणारे अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्र मात्र दिसले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावापुढे झुकलेल्या हुकूमशहांनी ही क्षेपणास्त्रे पुन्हा जगासमोर येणार नाहीत, याची खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. 


उत्तर कोरियाची भविष्यातील वाटचाल व भूमिकेत बदल झाल्याचा संदेश किम जाँग उन यांनी देण्याचा प्रयत्न केला. देशाला आर्थिक विकासाची गरज आहे. त्यामुळे विकासावर भर देण्याचे धोरण अमलात आणण्यात येत असल्याचे उन यांनी अगोदरच सांगितले. रविवारी किम यांनी लष्करी संचलनाला हजेरी लावली होती. परंतु त्यांनी राष्ट्रीय उत्सवासाठी एकत्र आलेल्या लोकांना मात्र संबोधित केले नाही. समारंभाला चीनच्या संसदेचे पीठासीन अधिकारी देखील पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याशिवाय विविध देशांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळही सहभागी झाले आहेत. ते सर्व कोरियाच्या मित्र राष्ट्रांपैकी आहेत. 


भाषा बदलली 
उत्तर कोरियाच्या धोरणात बदल होत असल्याचे लष्करी संचलनाच्या निमित्ताने दिसून आले. कोरियन संसद सदस्य किम याँग नाम यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात मवाळवादी सूर होता. त्यांनी भाषणातून सरकारच्या आर्थिक ध्येयाबद्दलची सविस्तर माहिती दिली. त्यात अण्वस्त्र कार्यक्रमाचा उल्लेख नव्हता. 


संचलनात नागरी जीवन, कार्यसंस्कृतीवर भर 
लष्करी संचलनात सैन्याची विविध दले, तोफा व काही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रांचे सादरीकरण करण्यात आले. त्याशिवाय विद्यार्थी, विविध नागरी समुदायांनी आपले देखावे सादर केले. त्यात परिचारिकांपासून बांधकाम मजुरापर्यंतच्या कार्यसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सादरीकरणाचा समावेश होता. 


ट्रम्प यांच्यासोबतचा तणाव निवळण्यासाठी खटाटोप 
किम जाँग उन यांनी देशाच्या ध्येय-धोरणात अामूलाग्र बदल करण्याचे वचन दिले आहे. त्यानुसार आर्थिक विकासावर भर देऊन वाटचाल केली जात असल्याचे नव्या बदलातून दाखवून देण्यात आले. नि:शस्त्रीकरणासंबंधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असलेला तणाव निवळावा यासाठी किम यांनी कार्यपद्धतीत बदल करून हा खटाटोप केला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या एका संचलनात उन यांनी काही क्षेपणास्त्रांचे खुलेआम सादरीकरण केले होते. त्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. 


तिकीट दरात वाढ : किम यांनी आर्थिक विकासावर भर देण्याचे धोरण स्वीकारल्याचा परिणाम यंदाच्या मनोरंजन कार्यक्रमाच्या तिकीट दरातील वाढीवरून दिसून आला आहे. कारण दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाचे तिकीट दर आतापर्यंत १०० डॉलरवरून ८०० डॉलरवर गेले. 

बातम्या आणखी आहेत...