Norve / नॉर्वेतील बेटावर उन्हाळ्यात 69 दिवस सूर्यास्तच नाही, थंडीत 90 दिवस काळोख, लोकांना वेळेचे बंधन नको

युरोपीय बेटांवरील पुलावर टाळे नव्हे, घड्याळे दिसतात 

वृत्तसंस्था

Jun 19,2019 10:41:00 AM IST

सोमारोय (नॉर्वे) - नॉर्वेतील एक बेट जगातील पहिले टाइम फ्री झोन होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सोमारोय बेटावरील ३०० नागरिकांनी एक मोहीम सुरू केली आहे. बेटाला वेळेच्या मर्यादेतून मुक्त ठेवण्यासाठी टाइम फ्री झोन मोहीम सुरू झाली. त्यांच्या समर्थनासाठी एक याचिकादेखील दाखल करण्यात आली आहे.


मोहिमेचे नेतृत्व करणारे केजेल आेव्ह हेविंग म्हणाले, नागरिकांना कामाच्या पारंपरिक तासांपासून मुक्त ठेवणे, असा आमचा उद्देश आहे. लोकांना कोणतीही गोष्ट कधीही करण्याची मुभा असावी. सोमारोय बेटावर १८ मे तर २६ जुलैदरम्यान सूर्य मावळतच नाही. थंडीच्या दिवसांत तीन महिन्यांपर्यंत आम्हाला सूर्यदर्शन घडत नाही. रात्री २ वाजता मुलांना फुटबॉल खेळताना, पोहताना, घराची साफसफाई करताना किंवा रंगरंगोटी करताना पाहू शकता. टाइम फ्री झोन केल्यास स्थानिक पातळीवरील शाळा-महाविद्यालय व कामकाजाच्या वेळांमध्ये लवचिकपणा येऊ लागेल, असा बेटावरील लोकांना विश्वास वाटतो. पर्यटन व मासेमारी हेच लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. बेटावरील लोकांचा बहुतांश वेळ मासेमारी करण्यात व्यतीत होतो, असे हेविंग यांनी सांगितले. वेळापत्रकाची फारशी गरज भासत नाही. हेविंग यांनी मेअखेरीस ही मोहीम सुरू केली होती. स्थानिक खासदार केंट गुडमंड्समॅन यांनी ही याचिका पुढे नेण्याचा ठरवले.या मागणीला शेजारी शहर फिनमार्क व नॉर्डलँड यांचे समर्थन आहे, असे केंट यांनी सांगितले. युरोपियन संघानेदेखील २०२१ पर्यंत डेलाइट सेव्हिंग टाइम (घड्याळ पुढे नेण्याची प्रक्रिया) थांबवण्याची सूचना केली आहे.


युरोपीय बेटांवरील पुलावर टाळे नव्हे, घड्याळे दिसतात
युरोपातील विविध देशांत भटकंती करणाऱ्या पर्यटकांना विविध शहरांतील पुलांवर लव्ह लॉक्स दिसून येतात. परंतु नॉर्वेच्या या भागात पुलांवर घड्याळे दिसून येतात. त्यावरून वेळेचे बंधन मानण्यास लोक तयार नसल्याचे व ते झुगारून लावण्यास सज्ज आहेत, हे स्पष्ट होते. दीर्घकाळ रात्र राहणे किंवा सूर्यास्त न होणे या गोष्टीमुळे रात्र-दिवस असे म्हणण्याला अर्थ राहत नाही. यामुळेच तणाव निर्माण होतो.

X
COMMENT