आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकोरीतले जीवन सोपे नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने सुमारे दीड तपाच्या कालखंडात माझे वास्तव्य अनुक्रमे कल्याण, खोपोली आणि मुंबईत होते. त्यामुळे लोकलचा प्रवास हा पाचवीलाच पुजलेला होता. बदलीपश्चात 1991 मध्ये औरंगाबादेत स्थायिक झाल्यापासून लाइफलाइनचा संपर्क तुटलेलाच होता. नुकताच मला कल्याण ते मुंबई असा लोकलने प्रवास करावा लागला. सकाळी गर्दीची वेळ होती. लोकलचा प्रवास 20 वर्षांनंतर होत होता. गर्दी पाहून सुरुवातीला तर धस्स झाले. भीत भीत फर्स्ट क्लासचे तिकीट काढले. डब्यात प्रवेश केला आणि पलीकडे सामान्य वर्गाने प्रवास करणा-या सहप्रवाशांकडे लक्ष गेले. लगेचच दोन दशकांपूर्वी मित्रांच्या कोंडाळ्यात केलेल्या रोजच्या लोकल प्रवासाच्या आठवणी ताज्या झाल्या. प्रवासात भजन म्हणणारे, गाणी गाणारे, पत्ते खेळणारे, काही वाचनप्रिय, तर काही कोडी सोडवणारे, क्षणात डुलक्या घेणारे, तर काही शेजारच्या खांद्याचा ताबा मिळवून आराम करणारे, चौथी सीट कधी मिळेल याची वाट पाहणारे असे अनेक वल्ली प्रवासी दिसू लागले. इतकेच काय, अनेकांची सुखदु:खेही तिने जवळून पाहिली असतील.

एकुणात काय तर किती आले, किती गेले, या मायानगरीचे रहाटगाडगे अव्याहतपणे चालूच राहते; परंतु माझी खरी उत्सुकता होती ती माझ्या लाइफलाइनला भेटण्याची. फलाटावर अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे ती आली. तिचे स्वरूप बदलले होते. न्यू लूक ऑफ लाइफलाइन. पारंपरिक रंगसंगती बदलून तिने परिधान केलेल्या नव्या रंगछटा तिला शोभून दिसत होत्या. ती पूर्वी निमूटपणे चालायची; परंतु आता तिच्या मार्गक्रमणाच्या दिशा तीच स्वत:च जाहीर करत होती. मागच्या तसेच पुढच्या इंजिनच्या बळावर मोटारमनने हाताळलेल्या कळीनुसार दोन्ही बाजूंनी वळसा न घेता दोन्ही बाजूंना धावणे सोपे नाही, असेच तर तिला सुचवायचे नसेल ना?