आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेंढव्यातील दुर्घटना : मनुष्यवध नव्हे, अॅक्ट ऑफ गाॅड : बचाव पक्ष; हा तर बिल्डरांचा निष्काळजीपणाच : पाेलिस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे  - पुण्यातील कोंढवा परिसरातील अ‍ॅक्लॉन स्टायलस या सोसायटीची संरक्षक भिंत पडून १५ बिहारी मजुरांचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विवेक सुनील अगरवाल (२०) व विपुल सुनील अगरवाल या दाेन बिल्डर भावंडांना रविवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदानी यांनी २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. या प्रकरणी अ‍ॅल्कॉन लँडमार्क्सचे भागीदार जगदीशप्रसाद अगरवाल (६४), सचिन अगरवाल (३४), राजेश अगरवाल (२७), विवेक अगरवाल (२०), विपुल अगरवाल (३२) तसेच कांचन हाउसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत शहा, अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक, बांधकाम मजूर पुरवणारा ठेकेदार यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक व विपुल यांना अटक झाली असून उर्वरित ६ संशयितांचा शाेध सुरू आहे. दरम्यान, फरार संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

 

पाेलिसांचा युक्तिवाद : तक्रारीकडे बिल्डरांचे दुर्लक्ष
बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे १५ निष्पाप मजुरांचा बळी  गेला. अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत २०१३ मध्ये बांधण्यात आली आहे. ती मोडकळीस आली होती. याबाबत वेळोवेळी सोसायटीतील रहिवाशांनी बांधकाम बिल्डर अगरवाल यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळेच ही घटना घडली. 

 

बचाव पक्षाचा युक्तिवाद : पावसामुळे भिंत पडली 
अ‍ॅड. संजय अगरवाल म्हणाले, ‘तीन दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे. त्यामुळे जमीन ढासळून संरक्षक भिंत काेसळली. ही घटना अॅक्ट ऑफ गॉड आहे. मात्र पोलिसांनी कुठलाही विचार न करता कलम ३०४ लावले आहे. शिवाय पोलिसांना जे नकाशे हस्तगत करायचे आहेत ते सध्या मनपा कार्यालयात सहज मिळू शकतात.

 

या मुद्द्यांवरून पोलिस कोठडी
> अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम नकाशे, कागदपत्रे अटक संशयितांकडून मिळवायची आहेत.

> संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा ठेका कोणाला दिला होता.

>  २०१३ मध्ये ही भिंत बांधण्यात आली होती. ती मोडकळीस आली होती याबाबत रहिवाशांनी वारंवार पत्रव्यवहार केला होता. ती कागदपत्रे हस्तगत करणे व अटक आरोपींची विचारपूस करणे आहे.

> इतर संशयिताचा पत्ता काढून त्यांना अटक करायची आहे.

> बांधण्यात आलेली भिंत अधिकृत आहे की अनधिकृत याबाबत तपास करायचा आहे.

> या गुन्ह्यात अधिक आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास करायचा आहे. 

 

कलम ३०४ नको, ३०४ अ हवे 
बचाव पक्षाचे वकील अगरवाल म्हणाले, ‘या घटनेत कलम ३०४ (सदाेष मनुष्यवध) लावणे चुकीचे अाहे. कृतीत सहभाग असेल तरच हे कलम लावले जाते. मात्र या घटनेत पक्षकार कुठेही सहभागी नव्हते. या वेळी त्यांनी जुन्या काही निकालांचे दाखलेदेखील दिले. १५ लोकांचा मृत्यू झाला ही बाब सत्य आहे. मात्र या प्रकरणात जास्तीत जास्त कलम ३०४ अ लावायला हवे हाेते.’
 

 

दाेन्ही कलमांतील फरक
कलम ३०४ :
जो कोणी खून नसलेला सदोष मनुष्यवध करेल त्याला आजन्म किंवा दहा वर्षे कैद आणि दंड हाेऊ शकताे किंवा जीव घेण्याचा किंवा तशी दुखापत करण्याचा उद्देश नसेल आणि सदोष मनुष्यवध झाला असेल तर दहा वर्षे कैद किंवा दंड वा दोन्हीही. 
 

कलम ३०४ अ : निष्काळजीपणा किंवा हयगयीने मृत्यू घडवून आणणे. त्यासाठी दाेन वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्हीही. 

 

बातम्या आणखी आहेत...