आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त महाराष्ट्राचे नव्हे देशाचेच उत्पन्न घटतेय; मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर अायाेगाची भाषा बदलली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्राचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी मात्र राज्य सरकारची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगत सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नव्हे, तर 'घसरता महसूल ही फक्त एकट्या महाराष्ट्राची समस्या नसून इतर राज्यांचीही समस्या अाहे. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती कौतुकास्पद अाहे,' असे अायाेगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अायाेगाने अाधी महाराष्ट्राबाबत मांडलेल्या नकारात्मक अहवालावर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर अध्यक्षांची भाषा बदलली असल्याची चर्चा अाहे. 


मागील तीन वर्षांत गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूच्या महसुली उत्पन्नातही महाराष्ट्रापेक्षा मोठी घसरण झाली. देशाच्या सरासरी महसुली उत्पन्नातही घट झाल्याचे दिसत असल्याचे सिंग म्हणाले. शिवाय आयोगाच्या अहवालात महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांकही ढासळल्याचे दिसत असले तरीही अलीकडच्या काळात मात्र ताे सुधारत असून राज्याने त्यात सातत्यही राखल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी राज्याचा वीस टक्के वाटा उचलण्यासही महाराष्ट्र सक्षम असल्याचे प्रशस्तिपत्रकही त्यांनी दिले. 


कर्जाचे प्रमाण चिंताजनक नाही 
राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला असून हे कर्ज आता साडेतीन लाख कोटींच्या घरात गेले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या प्रगतीवर होऊ शकेल का, या प्रश्नावर सिंग म्हणाले, सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी महाराष्ट्राच्या कर्जाचे प्रमाण १७ टक्के इतके असून ते चिंताजनक नाही. त्यामुळे राज्याला अजून खर्च करण्यास वाव अाहे. 


सिंचनाची स्थितीही भविष्यात सुधारेल 
राज्य सिंचनात मागे पडल्याचे अायाेगाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले हाेते. त्याबाबत विचारले असता एन. के. सिंग म्हणाले, सिंचनासाठी गेल्या दोन वर्षांपासून सरकारद्वारे केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती आपणास देण्यात अाली. अर्ध्यापेक्षा अधिक प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी गती देण्यात आल्याचे सरकारने सांगितले अाहे. हे प्रयत्न निश्चितच भविष्यातील सिंचन वृद्धीसाठी फायदेशीर ठरू शकतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...