आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नथिंग!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनासारखा अवकाश मिळाला की आसपासचं सारंच लोभस होऊन जातं. कोलाहल मागे पडून मनाचा गाभारा खुणावू लागतो. निसटलेले क्षण, चिमटीत सापडलेले क्षण नवं रूप घेऊन समोर उभे ठाकतात. त्यातून सुरू होतो, आपला आपल्याशी वाद-संवाद आणि उलगडत जातात, जगण्याचे नानाविध अर्थ. त्याचेच हे पाक्षिक प्रतिबिंब...

 

'नथिंग’, साडेचार वर्षांचा शिवराज पुन्हा ओरडून म्हणाला. 
‘अरे नथिंग काय? वॉट अंकल इज आस्किंग यू? जस्ट टेल युवर नेम,’ शिवराजची इरिटेट झालेली मॉम, त्याला समजावून सांगत होती, पण हा पठ्ठ्या काही ऐकायला तयार नव्हता. त्याचा ‘नथिंग’चा धोशा थांबायला तयार नव्हता. 

 

त्याचे आईबाप एकदम खजील झाले होते. झाले होते ते एवढेच, मध्यंतरी मी बडोद्याला माझ्या एका मित्राकडे गेलो होतो. बडोद्यात मराठी मंडळी भरपूर. एके संध्याकाळी माझ्या मित्राच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुण मराठी जोडप्याची भेट झाली. सोबत त्यांचा साडेचार वर्षांचा हा शिवराजही होता. त्याला काहीतरी विचारायचं, बोलायचं म्हणून मी गमतीनं बोललो , ‘हाय, आय ॲम प्रदीप. मे आय नो युवर नेम प्लीज.’ 

तो एकदम मोठ्यानं म्हणाला, ‘नथिंग.’ 

 

स्वाभाविकपणे आम्ही सारेच हसलो, पण त्यामुळं त्याचे ‘मॉम-पॉप्स’ खूप डिस्टर्ब झाले. एखाद्या पाहुण्यानं, तेही पुण्याहून आलेल्या (पुणे हे इटसेल्फ एक क्वालिफिकेशन आहे) साधं नाव विचारावं आणि आपल्या मुलाने ते सांगू नये, हे त्यांच्यासाठी अंमळ इन्सल्टिंग, इम्बॅरेसिन्ग असं काही तरी होतं. पण समहाऊ त्या दिवशी छोट्या शिवराजचा मूड ठीक नसावा किंवा अजून काही तरी! तो काही केल्या त्याचं नाव सांगायला तयार नव्हता. मम्मी पापा जितक्या वेळा विचारतील तितक्या वेळा, त्याला उत्तर म्हणून त्याचं ‘नथिंग’चं पालुपद चालू होतं.

 

‘बाय द वे, तुम्ही कुठं बाहेर निघालाय वाटतं,’ मी काही तरी विषय बदलायचं म्हणून बोललो. तर समजलं की ते कुठल्या तरी सत्संगाला चालले होते. 

 

‘यू नीड नॉट गो टु एनी सच सत्संग. युवर स्पिरिच्युअल गुरू इज राइट हिअर,’ असं म्हणून मी छोट्या शिवराजकडे बोट दाखविले. आणि मी गमतीनं नाही, तर अगदी गांभीर्याने म्हणत होतो. स्वत:चं नाव विचारलेलं असताना, त्याचं उत्तर ‘नथिंग’ देणं, याच्यापेक्षा अाध्यात्मिक साक्षात्कार आणि काय असतो! ‘नावात काय आहे?’, असं म्हणणारा शेक्सपिअर किंवा ‘जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो,’ असं म्हणणारे बा. भ. बोरकर या छोट्या शिवराजला अगदी नकळत्या वयातही उमजले असावेत, असा माझा समज झाला. मी असलं काही तरी बोलायला सुरू केल्यावर, मात्र शिवराजच्या मम्मी-पपांनी माझा द्रुत तालात निरोप घेतला. त्या छोट्या स्पिरिच्युअल गुरूने मग रात्रभर माझी पाठ सोडली नाही. मला एकदम मी कॉलेजात असतानाचा एक प्रसंग आठवला. आमच्या कॉलेजात विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळावा, म्हणून ‘ स्टुडंट कॉलिंग’ नावाची एक हस्तलिखित भित्तिपत्रिका दर आठवड्याला प्रकाशित केली जाई. माझी एक मैत्रीणच त्याची संपादिका होती. झालं असं की एका आठवड्यात तिनं माझी एक कविता त्या भित्तिपत्रिकेत लावली, पण ती कवितेखाली माझं नाव लिहायलाच विसरली. मी सकाळी कॉलेजला आल्यानंतर नोटीस बोर्डाशेजारी लावलेला ‘स्टुडंट कॉलिंग’चा अंक पाहिला आणि माझी कविता पाहून मला खूप आनंद झाला. पण कवितेखाली माझं नाव नाही, हे पाहून माझा चेहरा खर्रकन उतरला. माझा मूडच गेला. माझी नाराजी व्यक्त करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणीला भेटलो, पण मी इतका नाराज झालो होतो की मला तिच्याशी नीट बोलतादेखील येईना. 

 

‘अरे ठीकाय.. चुकून राह्यलं तुझं नाव लिहायचं, पण एवढं काय झालं त्यात,’ ती बिचारी खरं तेच बोलली, पण मला मात्र ते ‘एवढुसं’ वाटत नव्हतं. मला जणू ती जगातील सर्वात मोठी चूक वाटत होती.  त्या मूडमध्ये मी आणखी एक कविता लिहिली. त्यातल्या काही ओळी आठवतात -

‘हरवून काय बसलो, सांगू कसे कुणाला? 
  पैशात मोल माझे, मागू कसे कुणाला?’ 
  
ब्ला ऽ ब्ला ऽऽ वगैरे, वगैरे! आता ते सगळे आठवून आणि ती सो कॉल्ड विनोदी कविता वाचून मला जाम हसू येते. आपण सगळेच आपापल्या नावाबद्दल असे थोड्याफार प्रमाणात हळवे नि आग्रही असतो. गावाकडील लग्नाचे मानापमानाचे प्रसंग आठवले तर हसून हसून मुरकंडी वळायची वेळ येते. पण हा रडका, निमताळा ‘मी’ आणि त्याचे मानापमान नाट्य आपल्या आयुष्यभर चालू राहते. घरीदारी, राजकीय आखाड्यापासून ऑफिसेसपर्यंत हा ‘मी’ एकमेकांना ओरबाडू लागतो. प्रत्येकाला वाटतं, समोरच्या टपरीवरला चहा फुटपाथवर उभा राहून फुर्रकन प्यावा, रस्त्यावर फतकल मांडून भाजीवाल्या मावशीशी गप्पा माराव्यात, ऑफिसातल्या शिपायाला त्याची सुखदुःखं विचारावीत आणि संध्याकाळी एखाद्या कातर गाण्यावर शीळ वाजवीत घरी पोहचावं, पण प्रत्येक वेळी हा ‘मी’ आडवा येतो. व्हावे इतुके लहान, सारी मने कळो यावी, पण असे लहान होता कुठे येते? आपणा साऱ्यांना मोठं होण्याची किती घाई झालेली आहे! इंग्रजीत तर हा ‘आय’ कॅपिटलमध्येच लिहायची पद्धत आहे, पण हा ‘आय’ हे जगण्याचे कॅपिटल नाही. उलटपक्षी तो विसरता आला, विरघळवता आला तरच खरे जगणे गवसते. खरं म्हणजे, कळते सगळ्यांनाच पण अनेकदा वळत नाही. 

 

आमच्याकडे तर एकदा गंमतच झाली. एका आजाराच्या सर्वेक्षणासाठी आम्ही आरोग्य सेवकांच्या काही टीम केल्या आणि प्रत्येक टीमला सुपरवायझर म्हणून एका सीनियर अधिकाऱ्याला नेमले. पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये एक टेबल करून तयार केलेल्या सातही टीममधील सदस्य आणि सुपरवायझरची नावे लिहिली. पण त्यानंतर झाले भलतेच, जे सीनियर अधिकारी सात नंबर टीमचे सुपरवायझर होते, त्यांनी या सर्वेक्षणाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्याला चक्क शो कॉज नोटीस काढली. कशाकरता? तर त्या नियोजनात त्यांचे नाव खाली लिहिण्यात आले होते. कारण ते सातव्या म्हणजे, सर्वात शेवटच्या टीमचे सुपवायझर होते. अखेरीस सात नंबरच्या टीमला पहिला नंबर देण्यात आला, तेव्हा साहेबांचा राग शांत झाला. 


खरं म्हणजे, सतत ‘मी’ ला चिकटून बसल्याने आपण लहान होतो आणि ‘मी’ ला आपण जसेजसे सोडत जाऊ तसतसे  आपण मोठे होत जातो. पण का कोण जाणे, आपण वयाने मोठे होत जातो, आपले केस  पांढरे होतात, पिकतात पण पिकलेल्या फळासारखं आपलं ‘मी’पण  मात्र सहजासहजी गळून जात नाही. म्हणून तर आपल्याला एकमेकांवर प्रेमदेखील करता येत नाही, कारण तिथंही हा मी आडवा येतो, तो सतत टोचत राहतो. आणि  हा मी केवळ नावापुरता नसतो... तो कधी पुरुष म्हणून, कधी कोणता धर्म म्हणून, कधी देश, प्रांत, भाषा, जात, पंथ अशा अनेक रूपांनी आपल्याला घेरून टाकतो, आपल्याला वाढूच देत नाही. आणि कबीर तर म्हणतो, प्रेमाची वाट, प्रेमाची गल्ली खूपच अरुंद आहे, त्यात ‘तू’ आणि ‘मी’ हे दोघं मावतच नाहीत. पण आपल्या ‘मी’च्या वेलांटीचा फास, सुटता सुटत नाही.  

 

हे सारं आपल्याला माहीत नाही, असं थोडंच आहे. पण ऽ…हा ‘पण’ मोठा खतरनाक आहे. तिथंच आपलं घोडं पेंड खातं. पण शिवराज भेटल्यापासून मी जरा बदलण्याचा प्रयत्न करतोय. आता जेव्हा मला कुणीतरी सांगत येतो, ‘सर, त्या बेंगलोरच्या कॉन्फरन्समधून उडवलं तुमचं नाव अमक्या तमक्यानं,’ तेव्हा मी मनाशीच मोठ्यानं हसतो आणि माझ्या बडोदेकर स्पिरिच्युअल गुरूला आठवत मोठ्यानं म्हणतो, ‘नथिंग !’


लेखकाचा संपर्क : ९४२३३३७५५६

 

बातम्या आणखी आहेत...