आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अॅपल बनवून घेतेय नवे चित्रपट-सिरीज, नेटफ्लिक्स-अमेझॉनला आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क -  तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलने अलीकडेच हॉलीवूड एंटरटेनमेंट कंपनी एन-२४ सोबत करार केला आहे. ही कंपनी अॅपलसाठी ओरिजनल कंटेंट (चित्रपट आणि सिरीज) बनवणार आहे. या माध्यमातून अॅपल स्ट्रीमिंग क्षेत्रातील दिग्गज नेटफ्लिक्स आणि अमेझॉनला आव्हान देण्याची तयारी करत आहे. लवकरच अॅपल स्ट्रीमिंग सेवा लाँच करणार आहे.  
अॅपलच्या या व्यवसायाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, कंपनीसाठी विशेष करून जो कंटेंट तयार होत आहे, तो २०१९ मध्ये अॅपल डिव्हाइसवर मिळण्यास सुरुवात होणार आहे. “ए-२४’ ही प्रसिद्ध कंपनी असून कंपनीने मूनलाइट, अॅमी, लेडीबर्ड आणि रूम यांसारखे अनेक ऑस्कर मिळवणारे चित्रपट रिलीज केले आहेत. आता नवा कंटेंट तयार करण्यासाठी अॅपलने सुमारे ७,२०० कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. 


वास्तविक या करारातील सर्व अटींची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, हा करार पुढील अनेक वर्षांसाठी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगभरातील दर्शकांना जोडण्यासाठी ओप्रा विन्फ्रेदेखील कंपनीसाठी नवीन प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीने नुकतीच केली होती. याव्यतिरिक्त अॅपलने जेनिफर अॅनिसन आणि रीज विदरस्पून यांच्यासोबत सकाळच्या वेळेसाठी नाटकाची सिरीज तयार करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. त्याव्यतिरिक्त युवक आणि मुलांना अाकर्षित करण्यासाठी विविध कंटेंटवर काम सुरू आहे.  


सायन्स आणि फिक्शन आवडणाऱ्यांसाठी स्टीव्हन स्पीलबर्ग कंपनीसोबत काम सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत ८० च्या दशकात चर्चेत असलेली काव्य शृंखला ‘अमेझिंग स्टोरीज’ पुन्हा तयार करण्यात येत आहे. वास्तविक अॅपलने गेल्या वर्षीच हॉलीवूडकडे मोर्चा वळवला होता. कंपनीचे उपाध्यक्ष अॅडी क्यू यांनी सेलिब्रिटी एक्झिक्युटिव्ह जेमी एर्लिच आणि सोनी पिक्चर्सच्या वेन एम्बर्ग यांना त्यांच्या टीमसोबत आधीच जोडले होते.  


नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ जगभरातील दर्शकांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त ओरिजनल कंटेंट बनवत असताना अॅपलच्या या कराराची बातमी आली आहे. याव्यतिरिक्त एचबीओदेखील पुढील वर्षी त्यांची स्ट्रीमिंग सेवा लाँच करण्याची तयारी करत आहे. तर डिस्नेनेही २० व्या शतकातील फॉक्ससोबत करार करून सुमारे ७१.३ अब्ज डॉलरची मालमत्ता खरेदी करण्याची तयारी केली आहे. यामुळे प्रेक्षकांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील. या सर्वांचा फायदा प्रेक्षकांनाच मिळणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  या क्षेत्रात आता अॅपलसारख्या कंपनीच्या प्रवेशाने स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

 

गुगल सर्वश्रेष्ठ सर्च इंजिन, आम्ही कंटेंट सुरक्षित ठेवू  : टिम कुक  
आयओएस युजरसाठी डिफॉल्ट प्लॅटफॉर्म गुगल सर्च इंजिन सर्वश्रेष्ठ असल्याचे मत अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, युजर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सफारी वेब ब्राउझरवर त्यांचे नियंत्रण आहे. अॅपल आणि गुगल यांच्यातील अब्जावधी डॉलरच्या कराराचेही कुक यांनी समर्थन केले आहे. या करारानुसार अॅपलच्या डिव्हाइसवर गुगल डिफॉल्ट सर्च इंजिनप्रमाणे राहील. यासाठी अॅपल ६४,८०० कोटी रुपये देणार असल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...