रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची / रुग्णालयात जन्मलेल्या मुलांची जन्मपत्रिका करणार तयार; जन्म प्रमाणपत्राच्या धर्तीवर होईल प्रत्येक मुलाची जन्मकुंडली 

Feb 14,2019 11:06:00 AM IST

जयपूर- राजस्थान सरकारने आता खासगी व सरकारी रुग्णालयांत जन्मलेल्या मुलांची जन्मपत्रिका तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जन्म प्रमाणपत्राप्रमाणेच जन्मपत्रिकाही तयार करून देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जयपूरच्या पाच रुग्णालयांची नावे आहेत. सोबत राशीनुसार मुलाचे नामकरण करण्यासाठी नामावली सुचवण्यात येईल. या योजनेसाठी जगद्गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठास नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. जन्मपत्रिकेचा नमुनाही तयार केला आहे.

कुंडलीसाठी खासगीमध्ये १०१, तर सरकारी रुग्णालयात ५१ रु. फी

संस्कृत शिक्षण आणि संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. काही दिवसापूर्वी संस्कृत शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर विचारमंथन झाले. या योजनेमुळे सुमारे ३ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. जन्मपत्रिकेसाठी आई-वडिलाचे नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्म दिनांक, जन्म वेळ व जन्म स्थान नमूद करावे लागणार आहे. ही योजना दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राजस्थानमध्ये लागू केली जाईल. विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने दिलेल्या माहितीनुसार , जयपूरच्या ५ रुग्णालयांत सुरुवातीला मोफत कुंडली तयार करून देण्यात येतील.


यात जनाना रुग्णालय, महिला चिकित्सालय, कांवटिया रुग्णालय, जयपूरिया रुग्णालय व सॅटेलाइट रुग्णालयात ही व्यवस्था असेल. दुसऱ्या टप्प्यात खासगी व सरकारी रुग्णालयाचा समावेश करण्यात येणार आहे. सरकारी रुग्णालयात यासाठी ५१ रुपये व खासगी रुग्णालयात १०१ रुपये फी घेतली जाईल.

योजना सुरू करण्याचे कारण
ज्योतिष पिंड आणि ब्रह्मांडाचे शास्त्र आहे. यात भूगोल, अंतराळाबरोबरच कृषी, पर्यावरण, जनजीवन, नैसर्गिक आपत्ती इत्यादीचे शास्त्रीय साहित्य यात समाविष्ट आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी खगोलातील ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार, मुलाच्या संपूर्ण आयुष्यात स्वास्थ्य, सुख, वय, उपजीविका, सामाजिक परिणाम आदींचे ज्ञान मिळते. त्याचा आधीचा जन्म व आताच्या जन्मापर्यंतचा विचारही कुंडलीने शक्य होईल.

असे असेल नव्या योजनेचे नाव-
राजस्थान शिशु भाग्य दर्शन योजना, राजस्थान शिशु सौभाग्य योजना, राजस्थान बाल भाग्य दर्शन योजना, राजस्थान आयुष्मान शिशु दर्शन योजना, राजस्थान नवजात सौभाग्य दर्शन योजना, राजीव गांधी जन्मपत्रिका-नामकरण योजना. जगातील प्राचीन वेदांचे एक अंग म्हणजे ज्योतिष्य होय. ज्योतिष ग्रहांच्या फिरण्याबरोबरच माणसाच्या चांगल्या वेळाही ठरवते. यासाठी ही विद्या म्हणजे एक शास्त्र आहे. सरकार या अमर विद्येच्या प्रसारासाठी योजना आखत आहे. योजनेमुळे निश्चितच ज्योतिष प्रत्येकाला सहज व सुलभ होईल. - शास्त्री कोसलेंद्रदास, सहायक आचार्य, संस्कृत विश्वविद्यालय

X