वर्धा येथील वैद्यकीय जनजागृती मंचाने तयार केले पाणी साठवणीसाठी खास यंत्र
विशेष प्रतिनिधी
Jun 10,2019 09:01:00 AM ISTनागपूर - तलाव बांधून झाला, विहीर खोदून झाली, बोअरवेलही मारून झाली. तरीही पाणी काही लागले नाही. कारण भूगर्भातच पाणी नाही तर ते भूतलावर कसे येणार? कारण बेसुमार उपशामुळे भूगर्भातील पाणीसाठा संपुष्टात येतोय. ही पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे वा ते साठवून वापरणे हा एकमेव उपाय आहे. त्यासाठीच वर्धा येथील वैद्यकीय जनजागृती मंचाने “भूजल मॉइस्ट सॉइल यंत्र’ तयार केले आहे. या यंत्रामुळे छतावरून वाहून जाणारे पावसाचे थेंब अन् थेंब पाणी अंगणातील टाकीत साठवणे सोपे झाले आहे.
िवदर्भात सरासरी १ ते ११०० मिमी. पाऊस पडतो. हे लक्षात घेता एका पावसाळ्यात सुमारे १ लाख लिटर पावसाचे पाणी साठवता येऊ शकते, अशी माहिती व्हीजेएमचे अध्यक्ष डाॅ. सचिन पावडे यांनी दिली. “भूजल मॉइस्ट सॉइल हे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तयार केलेले आणि महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेले एक उपयुक्त भूजल यंत्र आहे. या यंत्राद्वारे ५०० ते २००० स्क्वे. फूट छतावरील पावसाचे पाणी यंत्रातील फिल्टरद्वारे विहीर, बोअरवेल किवा शोषखड्ड्यामध्ये टाकू शकता. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला १०० वर्षाहून अधिक काळ लागतो. ते पाणी पिण्यायोग्य करून मिनिटात भूगर्भात टाकता येते. डबल ग्रॅव्हिटीचा वापर करून पाण्यातील कचऱ्याची यात विल्हेवाट लावली आहे. त्यासाठी फर्स्ट फ्लशचा वापर करण्यात आला. फोम शीट बसवून बारीक कणसुद्धा पाण्यासोबत जाणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.
पावसाचे फक्त २० टक्केच पाणी वापरू शकतो
दरवर्षी आपण पावसाचे २० टक्के पाणी वापरू शकतो. त्यातील ८ टक्के पाणी माती आणि मुरुमाने तयार झालेल्या जमिनीच्या वरच्या स्तरात मुरते. उरलेले दहा ते बारा टक्के पाणी त्या खालच्या स्तरात मुरते. हे पाणी म्हणजेच भूजल आहे. खालच्या स्तरामध्ये साठलेले पाणी अनेक वर्षांपूर्वीचे असल्याने ते अधिक निगुतीने वापरायला हवे.
- डाॅ. सचिन पावडे, अध्यक्ष, व्हीजेएम