आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मुख्यमंत्र्यांनीच नयनतारा यांना निमंत्रित करावे; राज्याच्या विविध भागांत साहित्य संमेलन घेणाऱ्या आयाेजकांची अपेक्षा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- असहिष्णुतेविराेधात परखड लिखाण करणाऱ्या ज्येष्ठ पुराेगामी लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण नाकारून यवतमाळच्या आयाेजकांनी व साहित्य महामंडळाने मराठी साहित्य संमेलनाचीच नव्हे तर महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली आहे. त्याविराेधात राज्यभरातून संताप व्यक्त हाेत आहे. राज्याच्या विविध भागात छाेटी-माेठी साहित्य संमेलने घेणाऱ्या आयाेजकांनीही मराठी साहित्य महामंडळाच्या कारभारावर सडकून टीका केली. 'आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेत नयनतारा सहगल यांची माफी मागावी व त्यांना संमेलनात निमंत्रित करावे', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

 

सर्वभाषिक साहित्यिकांना संमेलनात बाेलवावे 
इतर भाषांतील साहित्यिकांनी मराठी संमेलनात येणे ही आपल्यासाठी आनंदाचीच बाब आहे. इतर भाषांतील साहित्यिक मराठी संमेलनाच्या व्यासपीठावर आल्यावर त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी नवीन शिकता येईल किंवा मराठीच्या व्यासपीठावरून ते त्यांच्या भाषेसाठी वसा घेऊन जाऊ शकतील. याउपरही यवतमाळच्या आयाेजकांना जर इंग्रजी साहित्यिकाला बाेलावण्याचा निर्णय पसंत नव्हता तर त्यांनी निमंत्रण देण्याआधीच विचार करायला हवा हाेता. नयनतारा यांना आधी निमंत्रण द्यायचे आणि नंतर ते परत घ्यायचे, ही आयाेजकांची भूमिका महाराष्ट्राच्या परंपरेला साजेशी नाही. आता तरी आयाेजकांना त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप हाेत असेल तर त्यांनी अजूनही नयनतारा यांना निमंत्रण पाठवून चूक सुधारावी. मुख्यमंत्र्यांनीच आता हस्तक्षेप करून स्वत: नयनतारा यांच्याशी बाेलावे व त्यांना संमेलनात येण्याची विनंती करावी. त्या येतील की नाही हा, विचार न करता आपल्याकडून तरी पुढाकार घेऊन झालेली चूक सुधारायला हवी.- नीलेश गायकवाड आयाेजक, विश्व साहित्य संमेलन  


चूक सुधारायची असेल तर भाषण तरी वाचून दाखवा 
साहित्य महामंडळाचे लाेक सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत, लेखकांनाही ते लाचार करत आहेत. संमेलन घेण्यासाठी हे लाेक सरकारकडून अनुदान घेतात, भांडवलदारांसमाेर पिंगा घालतात आणि मग त्यांना सत्ताधाऱ्यांच्या मताप्रमाणे निर्णय घ्यावे लागतात. खरे तर साहित्य समृद्ध करणे, वाचकांना सत्याकडे घेऊन जाणे हे महामंडळाचे काम असते. मात्र हे लाेक भलतेच काम करण्यात मग्न आहेत. यवतमाळच्या संमेलनात नयनतारा यांना निमंत्रण देण्यापूर्वीच महामंडळाने विचार करायला हवा हाेता. बरं आता उशिरा का हाेईना चूक लक्षात आली असेल तर आयाेजकांनी पुन्हा निमंत्रण द्यायला हवे हाेते, मात्र ही उपरतीही त्यांना झाली नाही. मी तर म्हणेन अजूनही वेळ गेलेली नाही. महामंडळ, आयाेजकांनीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेऊन नयनतारा यांची माफी मागावी व त्यांना पुन्हा संमेलनात बाेलवावे, यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा छाेटी नव्हे तर माेठीच हाेणार आहे. किमानपक्षी नयनतारा यांचे भाषण तरी संमेलनात वाचून दाखवायला हवे.- प्रा. बाबूराव गुरव अध्यक्ष, विद्राेही साहित्य संमेलन 

 

स्थानिक आयाेजक नव्हे महामंडळच जबाबदार 
यवतमाळमध्ये झालेल्या चुकांसाठी सर्वस्वी साहित्य महामंडळच जबाबदार आहे. स्थानिक आयाेजकांवर खापर फाेडून चालणार नाही. कारण त्यांचा संमेलनाबाबत फारसा अभ्यास नसताे. संमेलनाचे सर्व निर्णय महामंडळच घेत असते. दरवर्षी स्थानिक आयाेजकांकडून ६ लाख रुपये घेऊन महामंडळाचे पदाधिकारी संमेलनात स्वत:च मिरवत असतात. मुख्यमंत्री, उद‌्घाटकांच्या शेजारी बसण्यातच धन्यता मानत असतात. यवतमाळच्या संमेलनाची सर्व जबाबदारी स्थानिकांची असेल तर महामंडळ त्यांच्याकडून ६ लाख रुपये घेते कशासाठी? त्यांनी पैसे परत करावेत. मुळातच गेल्या काही वर्षांत जसा साेशल मीडियाचा प्रभाव वाढत असल्याने महामंडळाचे महत्त्व कमी झालेे आहे. सध्या महामंडळात व्हिजन नसलेले, कंपुबाजी करणारे लाेक आहेत. त्यांच्यामुळेच अशी परिस्थिती ओढवते. नयनतारा प्रकरणात महामंडळाने बाैद्धिक दिवाळखाेरी दाखवून दिली आहे. आता चूक सुधारण्याची संधी त्यांच्या हाती राहिलेली नाही.- संजय सिंगलवार आयाेजक शब्दविश्व संमेलन 

 

समजुतीने घेतले असते तर नामुष्की टळली असती 
यवतमाळच्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जाे वाद निर्माण झाला आहे, खरे तर ताे मुद्दा केवळ एका संमेलनापुरता मर्यादित राहिला नसून आमच्यासारख्या संमेलन घेणाऱ्या इतर आयाेजकांनाही अडचणी निर्माण हाेऊ शकतात. इंग्रजी लेखिका म्हणून जर नयनतारा यांना महाराष्ट्रात विराेध हाेताे, ताे अयाेग्य आहे. कर्नाटकच्या सीमा भागात आम्हीही दरवर्षी नाेव्हेंबर महिन्यात मराठी साहित्य संमेलन घेत असताे. या संमेलनाला आम्ही महाराष्ट्रातील मराठी भाषक मंत्र्यांना बाेलावले तर आम्हालाही येथील लाेकांकडून विराेध हाेऊ शकताे. यवतमाळच्या आयाेजकांनी नयनतारा यांचे निमंत्रण मागे घेण्याची घाई करण्यापूर्वी त्यांच्या नावाला विराेध करणाऱ्या स्थानिक लाेकांना विश्वासात घेऊन आधी आपली भूमिका समजावून सांगायला हवी हाेती. कदाचित या चर्चेतून विराेधकांचे समाधान झाले असते तर निमंत्रण मागे घेण्याची नामुष्की आयाेजकांवर ओढवली नसती.- कल्पना रायजाधव आयाेजक, कर्नाटक सीमा भागातील कारदगा येथील मराठी साहित्य संमेलन 

 

मसापतील पुराेगामींनी पदाचे राजीनामे द्यावेत 
अ.भा. साहित्य महामंडळाच्या संमेलनात वाद झाला नसता तरच नवल हाेते. मसापमधील लाेक अतिशय संकुचित विचारांचे आहेत, साहित्य संस्कृतीच्या याेगदानात महामंडळाच्या लाेकांनी आजवर भरीव याेगदान दिलेेले नाही. एकमेकांच्या आरत्या करायच्या अन‌् फायदा करून घ्यायचा, असा संकुचित व्यवहार हे लाेक करतात. सांस्कृतिक क्षेत्राला यातून काळिमा फासला जात आहे. नयनतारा प्रकरणामुळे यांनी महाराष्ट्राची अब्रू घालवली. राज्यकर्त्यांकडून निधी घेणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. जनतेसाेबत यांचे नाते नाही, त्यामुळे लाेकांमधून पैसा मिळत नाही. रावसाहेब कसबे, श्रीपाद जाेशी ही मंडळी पुराेगामी असली तरी प्रतिगामी व्यासपीठावर जाऊन ती आपली मते मांडतात. मात्र ती मान्य हाेत नाहीत आणि हे लाेक ताेंडघशी पडतात. यवतमाळमध्ये असेच घडले. साहित्यिकांनी, कलावंतांनी अशा संमेलनावर बहिष्कार टाकावा. सर्व पुराेगामी मसाप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत. त्यांचे विद्राेही संमेलनात आम्ही निश्चितच स्वागत करू.- धनाजी गुरव आयाेजक, विद्राेही साहित्य संमेलन 

बातम्या आणखी आहेत...