आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमीनंतर आता शहरात सनातनचे 'स्लीपर सेल'; जानेवारीतील कोरेगाव भीमा घटनेपासून शहरात तणाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादकरांना या वर्षी एकापाठोपाठ एक अशांततेचे धक्के बसत आहेत. गेल्या आठ महिन्यांत शहरात चार मोठ्या दंगली झाल्या. आता दाभोलकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील असल्याचा दावा सीबीआयने करताच राज्यभर शहराची चर्चा झाली. पूर्वी येथे सिमीचे 'स्लीपर सेल' कार्यरत होते. ते आता सनातनच्या रूपाने कार्यरत असल्याची चर्चा आहे. मागील पाच वर्षांपासून दाभोलकर खून प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचा शेवट औरंगाबादला येऊन थांबेल, अशी कल्पना औरंगाबादकरांनी कधीही केली नव्हती. यामुळे शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. 


१६ वर्षांपासून फरार असलेला घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल रहेमान शेख (४३, रा. कैसर काॅलनी) याला ७ ऑगस्ट रोजी सिग्मा हॉस्पिटल परिसरातून गुजरात एटीएस आणि मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने अटक केली. तो 'स्लीपर सेल' म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले. त्यापाठोपाठ दहा ऑगस्ट रोजी मुंबईत सनातनचा साधक असलेला वैभव राऊत याच्या घरात बॉम्बस्फोटाचे साहित्य सापडले. त्याचा साथीदार शरद कळसकर हा औरंगाबादचा निघाला. ९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या दंगलीत ७० कंपन्यांची तोडफोड झाली. या धक्क्यातून औरंगाबाद सावरत नाहीच तोच मंगळवारी हर्षनगर येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले. 


वैभव राऊतचा साथीदार शरद दौलताबादजवळील केसापुरीचा रहिवासी 
> १० ऑगस्ट : मुंबई येथील नालासोपारा भागातून वैभव राऊतच्या घरातून आठ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. 
> ११ ऑगस्ट : शरद कळसकर दौलताबाद येथील केसापुरी गावातील तरुण वैभवचा साथीदार असल्याची माहिती समोर आली आणि संशयित म्हणून त्याची चौकशी सुरू झाली. 


आठ महिन्यात दंगलीच्या चार घटना 
> १ जानेवारी रोजी काेरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचे पडसाद शहरात उमटले. तीन दिवस दंगलसदृश परिस्थिती होती. त्यानंतर कचरा प्रश्न पेटला आणि आठ मार्च रोजी पडेगावात पोलिस आणि नागरिकांत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. 
> जुन्या शहरात ११ मे रोजी दोन गटांच्या भांडणाचे रूपांतर दंगलीत झाले. यात घरे, दुकाने आणि वाहनांची जाळपोळ आणि लूट झाली. यात सरकारी, खासगी मालमत्तांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. 
> ९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान वाळूज येथे ७० कंपन्यांची तोडफोड झाली. बुधवारी बकरी ईद आहे. पुढील महिन्यात गणपती, नवरात्र आणि दिवाळी असे मोठे सण आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 


पुरावे गोळा करण्याचे काम सुरू 
> १४ ऑगस्ट : रात्री कुंवारफल्ली भागातून सचिन अणदुरे याला एटीएसने अटक केली. तो शरद कळसकरचा मित्र असल्याचे समोर आले. 
> १८ ऑगस्ट : एटीएसकडून चौकशी पूर्ण होताच सचिन अणदुरेला दाभोलकर खून प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतले. त्याने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा केला. 
सीबीआयने सचिन आणि शरद कळसकरने गोळ्या झाडल्याचा दावा केला आहे. तसे पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी वापरण्यात आलेले पिस्तूल, दुचाकी आदी गोष्टी शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी सांगलीच्या समीर गायकवाडला अटक करण्यात आली होती. 


सचिनचे नातेवाईक, मित्रांची चौकशी 
> सनातनच्या साधकांवरील कारवाईमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सनातनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन आमचा साधक नाही, असे सांगितले. सचिनच्या सासुरवाडीतील नातेवाइकांना मात्र या घटनेमुळे प्रचंड धक्का बसला आहे. 
> एटीएसच्या पथकाने त्याच्या दोन्ही मेहुण्यांना आणि मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घरातील सर्व तरुण मुले अशा प्रकारे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे घरातही तणाव आहे. त्याच्या सासऱ्याचे हेअर कटिंग सलून आहे तर दोन्ही मेहुणे शिक्षण घेतात. 
> सचिन शहरातील एका कापड दुकानात अकाउंटिंगचे काम करतो. त्याचा भाऊ एका पेट्रोल पंपावर कामाला आहे. दाभोलकर यांच्या खुनानंतर पाच वर्षांनंतर अचानक एटीएसने सचिनला उचलल्यामुळे या सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 
> २१ ऑगस्ट : सचिनच्या नातेवाइकांची आणि मित्र परिवाराची चौकशी सुरू झाली. चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. ज्या पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या त्यासारखेच हे पिस्तूल असल्याचे एटीएस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...