आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलच्या मदतीने शेतीच्या वादांवर तोडगा काढण्यासाठी पोलिस राबवणार आता मोहीम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड घडल्यानंतर आता शेती व जमिनीबाबतचे वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.


जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यांत जमिनीच्या बाबतीमधील वाद उफाळून येत असल्याचे चित्र दरवर्षी जिल्ह्यात असते. जून, जुलै हा पेरणीचा काळ असल्याने शेतीच्या बांधाची भांडणे, जमिनीच्या वाटणीची भांडणे, जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वाद या काळात अधिक प्रमाणात होतात. किरकोळ स्वरूपांच्या  वादाचे पर्यवसान खून, खुनाचा प्रयत्न व  शारीरिक इजा होईल, अशा प्रकारच्या  गुन्ह्यात (बॉडी ऑफेन्सेस) मध्ये  घडते. पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्ष पोद्दार यांनी जिल्हा दौरा करून गुन्ह्यांच्या पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर शेतीच्या वादातून होणारे गुन्हे अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. यासाठी त्यांनी उपाययोजना सुरु करण्याचा निर्णय शुक्रवारी (२६ जुलै) घेतला होता. ठाणे प्रमुखांपर्यंत या सूचना पोहोचेपर्यंतच शनिवारी (२७ जुलै) वासनवाडी शिवारात पवने कुटुंबातील शेतीचा वाद उफाळून आला अन् यात तिहेरी हत्याकांड घडले.


या घटनेनंतर एसपी पोद्दार यांनी तातडीने सर्व ठाणे प्रमुखांना शेतीचे व मोकळ्या जमिनींबाबत असलेले वाद मिटवण्यासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीट अंमलदारांना आपल्या कार्यक्षेत्रातील गावात कोणत्या शेतकऱ्यांचे शेतीचे वाद आहेत, जमिनीचे वाद आहेत, यापूर्वी काही गुन्हे नोंद आहेत का ही प्रकरणे कुठल्या पातळीवर आहेत याची  माहिती घेऊन संबंधित गावाचा तलाठी, मंडळ अधिकारी अथवा गरज असेलच तर नायब तहसीलदार, तहसीलदार यांची मदत घेऊन महसूल व पोलिस यांनी संयुक्तपणे या वादांवर तोडगा काढण्याची ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या वादातून भविष्यात मोठा गुन्हा घडू नये यासाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे.

 

वाद वाढू नये म्हणून
जिल्ह्यात शरिराविरोधात होणारे सर्वाधिक गुन्ह्यातील प्रमुख कारण हे शेतीचा वाद व जमिनीचा वाद असल्याचे एकूण आढावा घेतल्यानंतर निदर्शनास आले आहे. यातून मोठे गुन्हे होऊ नयेत. यासाठी महसूलच्या मदतीने बीट अंमलदार हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील.
हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक, बीड