आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आता चंद्र पृथ्वीजवळ आल्याशिवाय चांद्रयानासाठी मुहूर्त नाहीच; त्रुटी दूर करण्यासाठी लागणार वेळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देशाचा अंतराळ विज्ञान क्षेत्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या ‘चांद्रयान - २’ साठी आता नव्याने ‘मुहूर्त’ शोधावा लागणार आहे. त्यासाठी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणे आवश्यक आहे. याला ‘लाँचिंग विंडो’ म्हणतात. पृथ्वीपासून चंद्र ३ लाख ८४ किमी लांब आहे. स्वत:भोवती व पृथ्वीभोवती सतत भ्रमणशील असल्याने हे अंतर रोज बदलते. अशा परिस्थितीत चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वात निकट असतो त्या काळाची लाँचिंग विंडोसाठी शास्त्रज्ञांना प्रतीक्षा आहे, असे प्रतिपादन भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे माजी वैज्ञानिक अधिकारी आनंद घैसास यांनी केले. 


इस्रोची चांद्रयान-२ मोहीम सोमवारी पहाटे प्रक्षेपणाच्या एक तास आधी प्रक्षेपकातील इंधन भरती प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींमुळे पुढे ढकलावी लागली. यासंदर्भात घैसास म्हणाले, ‘ही त्रुटी दूर करण्यासाठी काही कालावधी लागणे अपरिहार्य आहे. तसेच आवश्यक कालावधीचे मोजमाप व कालगणन करूनच प्रक्षेपणासाठी नवा ‘मुहूर्त’ शोधावा लागेल’. विज्ञानतज्ञ व लेखक निरंजन घाटे म्हणाले, ‘चंद्राला स्वत:भोवती प्रदक्षिणेस २९ दिवस लागतात. त्यामुळे साधारणत: १५ दिवस चंद्राचा प्रकाशित भाग यान उतरवण्यासाठी आणि संशोधनासाठी उपलब्ध होतो. सध्या अंतराळयानांसाठी सर्वत्र सोलर ऊर्जा वापरण्याचा प्रघात आहे. ती ऊर्जा कमी वापरली जावी असाच प्रयत्न असतो. त्यामुळे चंद्र प्रकाशित असतानाचे १५ दिवस अभ्यास, निरीक्षणे, नमुने गोळा करण्यासाठी महत्त्वाचे असतात. ती स्थिती पुढील १५ दिवस शक्य नाही. कारण प्रक्षेपक रिकामे करणे, सर्व घटक इंधनापासून मुक्त करून दुरुस्तीनंतर पुन्हा तयार करण्यास काही कालावधी द्यावा लागणार आहे. त्यामुळे किमान महिनाभर तरी मुहूर्त पुढे जाणार.’

 

३० जुलैचा मुहूर्त होता, पण...
अंतराळ व खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे म्हणाले, प्रक्षेपकात घन व द्रवरूप दोन्ही इंधने असतात. ती ज्वालाग्रही असतात. त्यातील त्रुटी वेळीच लक्षात आली हे उत्तम. अन्यथा प्रक्षेपणस्थळीच स्फोट होऊ शकला असता. मात्र, आता ‘लाँचिंग विंडो’ पुन्हा जुळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. त्रुटी सामान्य असती तर पुन्हा प्रक्षेपणासाठी ३० जुलैचा मुहूर्त मिळाला असता. कारण तेव्हा चंद्र पृथ्वीच्या निकट येणार आहे. पण प्रक्षेपकातील इंधन त्रुटी गुंतागुंतीची व गंभीर असल्याने ती दुरुस्त करण्यास अवधी लागणे स्वाभाविक आहे. 


प्रक्षेपण पुढे ढकलले हे शहापणच
इस्रोचे माजी वरिष्ठ अधिकारी सुरेश नाईक म्हणाले, त्रुटी वेळेपूर्वीच लक्षात आल्याने हानी टाळू शकलो. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पुढे ढकलले ही शहाणपणाची गोष्ट आहे. या प्रकल्पाला दीर्घ परंपरा आहे. त्यात शेकडो शास्त्रज्ञांचे परिश्रम, प्रचंड गुंतवणूक व अन्य गोष्टी निगडित आहेत. पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व संगणकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले म्हणाले, मोहिमेत तांत्रिक बारकावे शेवटच्या क्षणापर्यंत तपासावे लागतात. सूक्ष्म चुकीलाही माफी नसते. त्यामुळे चांद्रयान २ पुढे गेले असले तरी ते नक्कीच यशस्वी होईल.
 

0