Home | Maharashtra | Mumbai | Now the insecticide victim is the responsibility of Farmers   

कीटकनाशकाच्या बळीबाबत जबाबदारी आता शेतकऱ्याची; मजुराच्या वारसाला भरपाई किंवा नोकरी द्यावी लागणार 

अशोक अडसूळ | Update - Feb 11, 2019, 07:47 AM IST

राज्याच्या कामगार विभागाचे शेतमजुरांसाठी नवे सुरक्षा धोरण 

 • Now the insecticide victim is the responsibility of Farmers   

  मुंबई- शेतामध्ये काम करत असताना अपघात घडल्यास जखमी शेतमजुरास किंवा मृत शेतमजुराच्या वारसास यापुढे शेतमालकाला नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान किंवा मृताच्या वारसाला नोकरी द्यावी लागणार आहे. कारण, कामाच्या ठिकाणी कामगाराला सुरक्षा मिळावी यासाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा कामगार विभागाने तयार केला असून नवे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

  कीटकनाशक फवारणीने राज्यात वर्ष २०१७ च्या जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत ५१ शेतकरी-मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यातील २१ मृत्यू कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील होते. तर राज्यभर कीटकनाशक विषबाधेच्या ८०० घटनांची नोंद झाली होती. त्यावर २०१७ च्या हिवाळी विधानसभेत चर्चा झाली होती. त्या वेळी कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतमजुरांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र धोरण बनवण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार कामगार विभागाने कामाच्या ठिकाणी सुरक्षा, आरोग्य व वातावरण यासंदर्भातल्या एका धोरणाचा १९ पानांचा मसुदा तयार केला आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने तयार केलेल्या या सुरक्षा कृती आराखड्यातील अटी शेतकरी व जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. व्यवसाय जन्य सुरक्षा व आरोग्यास धोका प्रतिबंधक संस्कृतीचा विकास करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य ठरणार असून सर्व विभागांमार्फत सूचना घेऊन सुरक्षा धोरण लवकरच निश्चित करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिली.

  धोरणातील ठळक बाबी
  शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ देण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांने त्याच्या शेतात कामाला असणाऱ्या मजुरांना सुरक्षा संदर्भातील उपकरणे पुरवली आहेत ना, याची खातरजमा जिल्हा कृषी अधिकाऱ्याने करायची आहे. त्यानंतरच अशा शेतकऱ्यास योजनांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी शेतीमधील अपघाती घटनांसंदर्भात अनुदान किंवा भरपाई राज्य सरकार देत होते. यापुढे ती जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्यात येणार आहे. शिवाय मजुरांची ठराविक कालावधीत वैद्यकीय तपासणी करावी लागेल.

  कृषी अधिकाऱ्याची जबाबदारी
  - मजुराला मास्क, ग्लोव्हज, गॉगल, बूट, ऑक्सिजन सिलिंडर, अॅप्रन द्यावा.
  - कीटकनाशक, खतांच्या वापराचे धोके याबाबत जागृती करावी.
  - मजुराला भरपाई मिळण्याबाबत शेतकऱ्याकडे पाठपुरावा करावा.
  - शेतकऱ्यास शासनाच्या योजनांचा लाभ देताना मजुरांना त्याने सुरक्षा साधने दिल्याची खातरजमा करावी.

Trending