Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Now thieves also in dashkriya vidhi

आता दशक्रिया विधीतही चोऱ्या; गुन्हेगारांचे पोलिसांना आव्हान

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 11:54 AM IST

गुन्हेगारांवर पोलिसांची जरब बसवली जाईल, असे नवीन निरीक्षकांनी शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.

 • Now thieves also in dashkriya vidhi

  श्रीरामपूर- गुन्हेगारांवर पोलिसांची जरब बसवली जाईल, असे नवीन निरीक्षकांनी शहर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. तथापि, शहरातील चोऱ्यांचे सत्र कमी होण्याऐवजी वाढले आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे चोरांची मजल आता दशक्रिया विधीतही चोऱ्या करण्यापर्यंत गेली आहे.


  श्रीहरी बहिरट यांची आठवडाभरापूर्वीच शहर पोलिस ठाण्यात संपत शिंदे यांच्याजागी निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकारांना शहरात योग्य पोलिसिंग दिसेल, गुन्हेगारांवर वचक बसेल, सर्वसामान्यांना दिलासा दिला जाईल, असे सांगितले. मात्र, बहिरट यांच्या आगमनानंतरच दररोज मोठ्या चोऱ्यांपासून पाकिटमारांपर्यंत सर्वच गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे.


  सुदर्शन भीमाशंकर उपरे हे येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये उभे असता त्यांच्या हातातून तीन महिलांनी तब्बल ९६ हजार रुपये पळवले. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी शिवाजी रस्त्यावरील तीन दुकाने फोडण्यात आली. चोरट्यांनी सई पेहराव या महिलांसाठी असलेल्या दुकानातून पाच ते सहा लाख रुपयांचे कपडे लांबवले. जवळील चायना सेलचे दुकानही फोडले. तेथील सायरन वाजल्याने चोरटे पळाले. त्यानंतर बी. ई. वाघ यांचे कार्यालय व मोहित फूट वेअर हे चपलेचे दुकान फोडले गेले. याशिवाय शहराजवळ असलेल्या गोंधवणी व दिघी शिवारातही चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. दिघीचे बाबुभाई शेख व जाधव यांच्या दोन म्हशी दोन दिवसांपूर्वी टेम्पोत घालून पळवण्यात आल्या.


  या चोऱ्यांची मालिका अद्याप थांबलेली नाही. पाेलिसांच्या जाचास कंटाळून आत्महत्या केलेला सराफ गोरख मुंडलिक यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी नॉर्दन ब्रँच येथे मोठा जनसुमदाय जमा झाला होता. या वेळी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप नागरे यांच्या खिशातील पाकिटावर व विजय कुलथे (नगर) यांचा सुमारे ३० हजार रुपयांच्या मोबाइलवर चोरट्यांनी हात मारला. नागरे यांच्या पाकिटातील सुमारे १० हजार रुपये चोरीस गेले. पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी पानसरे यांच्या खिशातून ८०० रुपये लांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी रमेश भालेराव यांचा दशक्रिया विधी होता. या वेळीही अनेकांचे खिसे साफ झाले. किरकोळ रकमा असल्याने पोलिसांच्या झंझटीत न पडता गप्प राहणे पसंत केले. गोंधवणी शिवारात अमित सोनवणे यांचे १४ तोळे सोने आणि २० हजार रुपयांची घरफोडी झाली. जनता विद्यालयानजीक मंगल सुभाष आभड (बोळेगाव, ता. परतूर, जि. जालना) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे सुमारे सव्वालाख रुपयांचे गंठण धूम स्टाईल लांबवण्यात आले. बेलापूर रस्त्यावरील ओझा पेट्रोलपंपासमोर मोबाइल बोलणाऱ्या तरुणाच्या हातातून मोबाइल चोरण्यात आला.


  आठ दिवसांत दोनदा रंगेहाथ पकडले
  राहुल अशोक सोनी यांच्या घरातून मोबाइल व घड्याळाची चोरी झाली. सोनी कुटुंबीयांनी दोघांपैकी एका भामट्यास रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याच चोरट्यास मागील आठवड्यात कांदा मार्केटमागेही चोरी करताना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. मात्र, किरकोळ कारवाईनंतर तो पुन्हा सुटल्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. पोलिसांनी अशा पद्धतीने गुन्हेगारांना सोडल्याने त्यांना चोऱ्या करण्यासाठी प्रोत्साहनच मिळत आहे.


  शहर पोलिस ठाण्यास आयएसओ मिळाल्यामुळे अपेक्षा वाढल्या
  शहर पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन मिळाले आहे. या मानांकनासाठी ५२ निकष तपासण्यात आले. त्यात गुन्हेगारी किंवा तपास याचा कुठलाही संबंध नसतो. केवळ भौतिक बाबींवर भर दिला जातो. मात्र, सर्वसामान्यांना या बाबी माहिती नसल्याने आता शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात येईल, अशी भाबडी आशा निर्माण झाली होती. अपेक्षाभंग करण्याची जबाबदारी पोलिसांनी पूर्णपणे पार पाडली.

Trending