आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दुष्काळाची नेमकी स्थिती कळेल; एमआरसॅकमध्ये तयार होतेय ड्राॅट संकेतस्थळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यात पडणाऱ्या दुष्काळावरून आणि त्याच्या आकडेवारीवरून अनेकदा राजकारण तापते. दुष्काळी भाग घोषित करण्यावरून किंवा किती तालुक्यात वा जिल्ह्यांत दुष्काळ आहे, यावरून वादावादी सुरू होते. पण यापुढे आता कोणत्या तालुक्यात किती दुष्काळ पडला याची अचूक माहिती मिळणार आहे. नागपुरातील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्रामध्ये (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर, "एमआरसॅक') "ड्राॅट' हे संकेतस्थळ बनवले जात असल्याची माहिती "एमआरसॅक'मधील सूत्रांनी दिली. सध्या या संकेतस्थळाचे प्राथमिक परीक्षण सुरू असून ९ सप्टेंबरला मंत्रालयात त्याचे सादरीकरणही झाले. त्यात सुचवण्यात आलेले बदल करून लवकरच संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. 


या संकेतस्थळात राज्यातील पर्जन्यमानाची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येत आहे. शिवाय पावसाळ्यात राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नेमका किती पाऊस झाला वा किती दिवसांपासून पाऊस पडला नाही, याची अचूक माहिती यावर राहील. 


नुकसान भरपाईचीही मिळेल अचूक माहिती 
अनेकदा पटवारी थेट शेतात जाऊन पाहणी करू शकत नाही. अशा वेळी नजरअंदाज पाहणीवरून प्राथमिक अंदाज काढण्यात येतो. मात्र, या संकेतस्थळामुळे त्यातही अचूकता येणार आहे. अतिवृष्टी, कमी वा अवेळी पावसापूर्वी उपग्रहाद्वारे घेतलेले छायाचित्र त्यानंतर घेतलेल्या छायाचित्राशी पडताळणी केल्यानंतर अचूक माहिती मिळणे शक्य होईल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात झालेल्या दैनंदिन पावसाचे नकाशे तयार होतात. यात कुठे किती पाऊस झाला याचे नकाशे रोज दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री कार्यालयासह राज्यातील सुमारे ४०० सरकारी उच्चपदस्थांना ई-मेल जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 


या अॅपवर सुरू आहे काम 
जलसंधारण विभागासाठी "ई-जलशुद्धी', मेडासाठी "अक्षय ऊर्जा', महापालिका प्रशासकीय संचालनालयासाठी "हाॅकर मॅपिंग अॅप्लिकेशन' या अॅपवर काम सुरू आहे. "ई-जलशुद्धी'मध्ये डब्ल्यूआरडीची राज्यातील धरणे, कालवे, हायड्रो स्ट्रक्चर्ससह कार्यालयांची माहिती राहील. "अक्षय ऊर्जा'मध्ये सौर ऊर्जा निर्मिती केंद्र, सौर पथदिवे, बायोगॅस प्लँट आदी १४ घटकांची माहिती राहील. तर "हाॅकर मॅपिंग अॅप्लिकेशन' या अॅपमध्ये राज्यातील सर्व महापालिकाअंतर्गत येणाऱ्या सर्व हाॅकर्सची आधार क्रमांकांद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक हाॅकर्सला एक वर्क कोड देण्यात येईल. या वर्क कोडमुळे हाॅकर्सची वैयक्तिक ओळख आणि व्यवसाय ओळखणे सोपे होईल. 


नकाशासह संपूर्ण माहिती 
"एमआरसॅक'ने तयार केलेल्या संकेतस्थळावर राज्यातील कोणत्या गावात कुठे, किती पाऊस झाला वा झालाच नाही, याची अचूक माहिती राहणार आहे. त्यामुळे ओला वा कोरडा दुष्काळ घोषित करताना त्यात अचूकता येणार आहे. शिवाय अतिवृष्टी वा अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही अचूक माहिती मिळणार असल्यामुळे नुकसान भरपाई वेळेत देण्यास मदत होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...