आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब क्या ग़ज़ल सुनाऊं तुझे देखने के बाद...

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वसुंधरा काशीकर

आयुष्य रसरशीत करण्याची, ते उजळून टाकण्याची प्रेमात जितकी ताकद आहे, तेवढी दुसरी कशातच नाही. तुम्ही मुळातच प्रेमात असाल, तर ही गझल ऐकल्यावर ते आणखी वाढेल आणि नसाल तर परत प्रेमात पडू शकाल...

प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाला पडलेल्या प्रश्नांची सुंदर मालिका म्हणजे सईद शाहिदी यांनी लिहिलेली ही गझल. प्रेमात असलेल्या माणसाला किती देखणे प्रश्न पडू शकतात, त्याची कश्मकश किती गोड असू शकते, हे या गझलेतून कळतं. शायर प्रेमात पडला असल्याने साहजिकच तो ‘अब क्या ग़ज़ल सुनाऊं तुझे देखने के बाद’ असं म्हणतोय. वाचल्यावर बहुतांश स्त्रियांना, ‘काश! कोणी शायर आपल्या प्रेमात पडला असता तर..!’ असं वाटून जाऊ शकतं. पण, हा निव्वळ गैरसमज आहे. कसा ते सांगते... जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितलं, की शबाना आझमींना  एकीने प्रश्न विचारला, ‘तुमको देखा तो ये ख्याल आया..’ सारखी गझल लिहिणारा शायर तुमचा नवरा आहे. इतका रोमँटिक नवरा मिळणं म्हणजे काय भाग्य ना..!’ त्यावर शबाना म्हणाल्या, ‘रोमान्स आणि जावेद हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. रोमान्स त्यांच्या आसपासही फिरकत नाही..!’ 

असो. माणूस प्रेमात पडतो तेव्हा त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र एकच व्यक्ती दिसत असते. या गझलेतले दोन शेर मला  प्रचंड आवडतात. एकीकडे आयुष्य मला हाका मारतंय.. ‘आवाज़ दे रही है मेरी ज़िंदगी मुझे..’ पण, तुला पाहिल्यावर जीवनाच्या हाकेला प्रतिसाद द्यावा की नाही या विचारात मी पडलोय. जगनियंत्याचं महत्व, श्रद्धा माझ्या मनात आहेच गं.. पण एका बाजूला तू आणि दुसरीकडे तो.. सर किस तरफ़ झुकाऊं तुझे देखने के बाद... आतापर्यंत मी वाचलेल्या प्रेमावरच्या शायरीत हे दोन शेर मला खास उंचीचे वाटतात. यापेक्षा जास्त महत्व कोणीही प्रेयसीला दिलं असेल, असं वाटत नाही. मुख्य म्हणजे ही गझल मनाच्या आत्यंतिक आनंदी अशा अवस्थेत लिहिली असल्याचं जाणवतं. 

मी चालू लागलो आणि रस्त्यात तू दिसलीस.. आता कसं चालावं..? नजरानजर झाली नि त्याची अशी धुंदी चढली की.. ‘क्यूँ मैकदे में जाऊ तुझे देखने के बाद..’ तुला मन भरुन बघितलं.. डोळ्याचं पारणं फिटलं ! आता दुसऱ्या कुणालाही बघायची इच्छा नाहीये. इथे शादाब या यांच्या गझलेतला एक शेर आठवतोय..


उन्हें ये ज़िद कि मुझे देखकर किसी को न देख
मेरा ये शौक़ कि सबको सलाम करता चलू
ं ।

माझ्या ज्या अत्यंत आवडत्या गझला आहेत, त्यात पहिल्या दहामध्ये ही येईल. ज्या तऱ्हेनं उत्कट, भव्य आणि पवित्र असा प्रेमाचा आविष्कार इथं होतो, तसा फार कमी गझलांमध्ये आढळतो. तसाच टोकाचा अद्भूत, सुंदर विरोधाभास हेही या गझलेचे वैशिष्ट्य. आणखी एक गंमत म्हणजे, तिची मेलोडियस कंपोझिशन प्रत्यक्ष जगजीत सिंग यांची आहे. या गझलेतून तर ते ठळकपणे जाणवतं. गझलेची सुरूवातीची ट्यून अगदी ऐकण्यासारखी. आणि त्यानंतर तलत अजीज़ फार सुंदरपणे ‘कैसे सुकून पाऊं..’ असा प्रश्न विचारत गझल उचलतात.. ती चित्रा सिंग यांनीही गायली आहे, पण ही गझल म्हणजे तलत आणि केवळ तलतच... दुसऱ्या शेरच्या आधीचा सॅक्सोफोन वातावरण आणखी रोमँटिक करतो. 

नियंत्यापर्यंत किंवा सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रेम हा एक मार्ग आहे. मधुरा भक्ती, सुफी तत्त्वज्ञान हेच सांगतं. आयुष्याला रसरशीत करण्याची, उजळून काढण्याची प्रेमात जितकी ताकद आहे, तेवढी दुसरी कशातच नाही. तुम्ही मुळातच प्रेमात असाल, तर ही गझल ऐकल्यावर ते आणखी वाढेल आणि नसाल तर परत प्रेमात पडू शकाल, असा विश्वास वाटतो...       


कैसे सुकून पाऊँ तुझे देखने के बाद
अब क्या ग़ज़ल सुनाऊं तुझे देखने के बाद।
आवाज़ दे रही है मेरी ज़िन्दगी मुझे
जाऊं के या न जाऊं तुझे देखने के बाद ।
काबे का एहतराम भी मेरी नज़र में है
सर किस तरफ़ झुकाऊँ तुझे देखने के बाद।
(एहतराम = आदर, सन्मान)
तेरी निगाह-ऐ-मस्त ने मख़मूर कर दिया
क्या मैकदे को जाऊं तुझे देखने के बाद ।
(मख़मूर = नशेमध्ये चूर)
नज़रों में ताब-ऐ-दीद ही बाक़ी नहीं रही
किस से नज़र मिलाऊँ तुझे देखने के बाद ।
(ताब-ऐ-दीद = पाहण्याची शक्ती)
मंज़िल की जुस्तजू में उठे थे मेरे क़दम
कैसे क़दम बढ़ाऊं तुझे देखने के बाद ।
(जुस्तजू = शोध)
तेरी मिसाल ये है की तू बेमिसाल है 
तुझको कहाँ से लाऊ तुझे देखने क
े बाद । 
- सईद शाहिदी

बातम्या आणखी आहेत...