आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Nowhere In The Three Textbook Pages Of The Three Boards Does It Say That You Should Honor The Girls, Take Care Of Them

तीन बोर्डाच्या ५ विषयातील ८३ पाठ्यपुस्तकाच्या ८८६७ पानांमध्ये कोठेच म्हंटलेले नाही की मुलींचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • दिव्य मराठी चमूने केला स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई पुस्तकांचा अभ्यास
 • मराठी, हिंदी, इंग्रजी, नागरिकशास्त्र, मूल्य शिक्षणाच्या पुस्तकांतील एक एक पान चाळले

महेश जोशी/विद्या गावंडे, औरंगाबाद

शालेय जीवन म्हणजे संस्कारक्षम वय. कुटूंबात, समाजात कसे वागायचे, जबाबदार नागरीक म्हणून कसे जगायचे हे सांगणारे हे वय. हे संस्कार रूजवण्याची जबाबदारी कुटूंबासोबतच शिक्षण व्यवस्थेचीही आहे. मात्र, देशातील शालेय अभ्यासक्रमात मुलींचा सन्मान करा, त्यांना त्रास देऊ नका, त्यांची काळजी घ्या असे कोठेही म्हंटलेले नाही. दैनिक दिव्य मराठीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई या ३ बोर्डाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, नागरीकशास्त्र आणि मूल्य शिक्षण या ५ विषयाच्या ८३ पाठ्यपुस्तकांतील ८८६७ पाने वाचली, त्यातून ही बाब उघड झाली. कदाचित यामुळेच गेल्या दशकात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत थोडीफार नव्हे तर ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  
    

नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तब्बल ८३ टक्के वाढ झाली आहे. २०१७ च्या गुन्हेगारीविषयक अहवालानुसार महिलांविषयक गुन्हे सतत वाढतच चालले आहेत. देशात १ लाख लोकसंख्येमागे ५७.९ महिलांवर अत्याचार होतात. २०१५ मध्ये ३२,९२४३, वर्ष २०१६ मध्ये ३३,८९५४ तर २०१७ मध्ये ३५,९८४९ महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद झाली. महाराष्ट्रात २०१५-३१२१६, २०१६-३१३८८ तर २०१७ मध्ये ३१९७९ महिलांविषयक गुन्हे नांेदवले गेले.  या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण पुरूषांच्या मानसिकतेत आहे. मुलींचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या हे बालपणापासून घरातून त्यांच्या मनावर बिंबवलेच जात नाही. निदान शालेय अभ्यासक्रमात तरी तशा आशयाचा मजकूर असणे अपेक्षीत आहे. तो तपासण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने १५ दिवस ५ विषयांचे एक एक पुस्तक वाचून काढले. तज्ञांशी चर्चा केली. त्यातून आलेली माहिती धक्कादायक आहे. 
    

८३ पुस्तकांतील एक एक शब्द वाचला


दिव्य मराठी प्रतिनिधींनी स्टेट बोर्ड, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या इयत्ता चौथी ते दहावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, मूल्य शिक्षण आणि नागरीकशास्त्र या ५ विषयांच्या एकूण ८३ पुस्तकातील एक एक शब्द वाचला. यात स्टेट बोर्डाचे २६ पुस्तकातील २४२९ पाने, सीबीएसईच्या २८ पुस्तकातील २९७० तर आयसीएसईच्या २९ पुस्तकांतील ३४६८ असे एकूण ८८६७ पानांचे वाचन केले. यात एकाही पुस्तकात मुली-महिलांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या, संरक्षण करा असा आशयाचा एकही धडा नसल्याचे आढळून आले.महत्वाची निरिक्षणे

 • आयसीएसई, सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांची रचना आणि मांडणी आकर्षक करण्यात आली आहे. आरोग्य,पर्यावरण, स्वच्छता याचे महत्त्व प्रत्येक पुस्तकात काही प्रमाणात आहे. मात्र, महिलांचा आदर करा अशी थेट हाक देणारा एकही धडा अभ्यासक्रमात नाही. असे असले तरी महिलांचे महत्त्व सांगणारे, त्यातून समानतेची शिकवण देणारे काही धडे, कविता आहेत. बराच मजकूर लिंगभेद करणारा आहे.
 • स्टेट बोर्डाच्या चौथीच्या "माय इंग्लिश बुक' पुस्तकाच्या पान-४६ वर नमिता दिदीज टाईमटेबल या धड्यात चहा, भांडी, स्वंयपाक, घराची स्वच्छता, ड्रायव्हिंग क्लास, इस्त्री, भांडी हे काम करतांनाच नमिता नावाची मुलगी ऑफीसलाही जाते. या कामात तिला घरातील पुरूष मदत करत नाहीत. यातून कामाच्या विभागणीतील लिंगभेद दिसतो.
 • याच पुस्तकात पान ५६ वर फ्रॉम दिली पोस्ट बॉक्स २ या धड्यात क्रिकेट मॅचच्या कप्तान पदावर गौरव नावाचा मुलगा आहे. यात एकाही मुलीचा उल्लेख नाही.
 • या पुस्तकात पान-२९ वर आई-बाबा दाेघेही स्वयंपाक करतांना दाखवले आहेत.
 • ७ वीच्या "हिंदी सुलभभारती' पुस्तकाच्या पान-२८ वर बेटी युग कवितेत मुलीचे महत्व विषद करण्यात आले आहे.
 • ८ वीच्या "मराठी बालभारती' पुस्तकाच्या पान-३२ वर धाडसी कप्तान-राधिका मेनन हा लेख आहे.
 • ८ वीच्या "माय इंग्लिश बुक' च्या पान -८० वर पी.व्ही.सिंधूवर एक लेख आहे.
 • राज्य बोर्डाच्या १० वीच्या "मराठी कुमारभारती' च्या पान ३१ वर नीरजा यांची स्त्रीपुरूष समानता दर्शवणारी "आश्वासक चित्र' ही कविता आहे. या पुस्तकात पान ४८ वर कर्ते सुधारक कर्वे हा तर पान ५९ वर लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडीक आणि सबइन्सपेक्टर रेखा मिश्रा यांच्यावरील वीरांगणा हा धडा आहे.
 • राज्य बोर्डाचे १० वी चे इंग्रजीचे पुस्तक "माय इंग्लिश कोर्सबुक' इंग्रजीच्या पुस्तकात पान १७ वर आई वडील घरासाठी काय करता याची यादी आहे. यात वडील कष्ट करता तर आई घर स्वच्छ ठेवते असे म्हंटले आहे. या पुस्तकात पान १४७ वर मेरी कोम हिच्यावर एक धडा आहे.
 • सीबीएसईच्या ८ वीचे हिंदी पूरक पाठ्यपुस्तक "वसंत' मध्ये पिता के बाद या कवितेत मुलींचे महत्व विषद करण्यात आले आहे.
 • राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता ६ वीच्या हिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात भारत की बेटी फक्त चित्र स्वरुपात दर्शविण्यात आले आहे. तर आई आणि मुलीच्या नात्यावरील कवीता सोई मेेरी सोना चा समावेश आहे.
 • इयत्ता ५ वीच्या हिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात चौथा धडा बालिका दिवस नावाने आहे. त्यात ओझरत्या काही ओळी बालिका दिनाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. तर १२ व्या पाठात सपूत यात अच्छे लडके आणि अच्छी लडकी विषयी चित्राद्वारे फक्त माहिती देण्यात आली आहे.
 • इयत्ता ५ वीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात माहेर या पाठात स्त्री मनाची भावनिकता दर्शविण्यात आली आहे.परंतु महिलांचा मान सन्मान अथवा आदर करायला हवा. याबाबत उल्लेख नाही.
 • २० व्या पाठात मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. "माझं शाळेचं नक्की झालं ' यात केवळ मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे.
 • इयत्ता ४ थीच्या मराठी भाषा विषयाच्या पुस्तकातही पाचवा पाठ हा मुलींच्या शिक्षणावरच आहे.
 • सीबीएसईच्या इयत्ता ६ वीच्या इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकात कल्पना चावला वरील पाठ आहे.
 • हिंदी भाषा विषयाच्या पुस्तकात केवळ बाल रामकथा आहेत. तर भाग दोनच्या पुस्तकात झांसी की रानी ही पाठ आहे. तर हेलन केलर यांची प्रेरणा देणारी गोष्ट आहे. तसेच भेदभाव, जाती धर्मावर प्रकाश टाकणारा मत बाँटो इन्सान को हा पाठ देखील आहे. परंतु महिलांप्रती आदरभाव असावा. त्यांना सन्मान दिला पाहिजे.याचा उल्लेख पाठात नाही.
 • आयसीएसईच्या इयत्ता ७ वीच्या इंग्रजी भाषा विषयाच्या पुस्तकात वुमन चेंज द वर्ल्ड धडा आहे. त्यात फक्त कर्तृत्ववान महिलांचे फोटो आणि माहिती देण्यात आली आहे.
 • चौथा धडा हा मुलगा - मुलगी एक समान या संदर्भात आहे. परंतु त्यात मुलांमध्ये मुलींप्रती सन्मानाचा वर्तनभाव या विषयी मात्र उल्लेख नाही.

 

व्हर्जन

शिक्षकांची जबाबदारी


कला रसास्वाद या पुस्तकात तुम्हाला काय पटतं, तुम्ही कस वर्तन कराल यासह मुलगा- मुलगी एक समान, काही दैनंदिन जीवनातील बाबी तसेच मी आणि माध्यमे यात स्री पुरुष समानता याबद्दल मुद्दे आहेत. पण ते स्पष्टपणे नाही. ते पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. या मुद्यांवर शिक्षकांनी मुलांवर हे संस्कार घडवण्याची जबाबदारी आहे. - एस.एस.रोंगे, शिक्षक, कला रसास्वाद विषय, औरंगाबाद         स्पष्टपणे उल्लेख नाही


विज्ञान विषयात मुलगा- मुलगी समानता दाखविण्यात आली आहे. तसेच मुलगा आणि मुलगी यांच्या जन्मविषयीचे वैज्ञानिक कारण सांगितले आहे. परंतु महिलांचा सन्मान करा, त्यांची काळजी घ्या, याबाबत स्पष्ट मुद्दे नाहीत.- उज्वला जाधव - निकाळजे, निवृत्त मुख्याध्यापिका, शारदा मंदीर प्रशाला, औरंगाबाद  मुलींना प्रेरणा देणारे धडे


राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात धडे निर्धारीत करतांना महिला व मुलींचे विशेष लक्ष ठेवले जाते.  मुलींना प्रेरणा देणारे धडे निवडले जातात. मुलगा-मुलगी समानतेचे महत्व सांगणारे धडे प्रकर्षाने समाविष्ट केले जातात. नव्या अभ्यासक्रमात कलारसस्वाद या विषयात काही प्रमाणात मुलींची छेडछाड करू नये, याविषयी चित्रासह माहिती दिली आहे.- अर्चना नरसापूर, माजी अभ्यासमंडळ सदस्य, बालभारती