आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेप्रमाणे भारतीय रस्त्यांवर वृक्षवल्ली दिसण्यासाठी 'एनआरआय'चा प्रयत्न 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - एक झाड तोडल्यानंतर त्या बदल्यात तीन झाडांचे संवर्धन करण्याचा अमेरिकेत नियम आहे. या नियमामुळे अमेरिकेत वृक्षांचे प्रमाण चांगले आहे. विशेषत: अमेरिकेतील रस्त्यांच्या कडेला भरपूर वृक्षवल्ली असते. हेच चित्र भारतात दिसण्यासाठी एक अनिवासी भारतीय आणि एक भारतीय नागरिक प्रयत्न करताना दिसत आहे. अठरा वर्षांपासून अमेरिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजन पिटर फोन्सेका यांच्यासह त्यांचे भारतीय मित्र किशोर मेहता हे भारतातील रस्त्यांवरील वृक्षांचे प्रमाण, वाहतुकीच्या नियमांबाबत शासनाने काही उपाययोजना कराव्यात यासाठी डोक्यावर कॅमेरा लावून रस्त्यांचे शूटिंग करत हा 'डाटा' शासनाकडे देऊन अमेरिकेच्या रस्त्यांप्रमाणे भारताच्या रस्त्यावरही वृक्षांची लागवड होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


मुंबईतील राजन पिटर फोन्सेका हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील स्पॅम शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. भारतातील रस्ते व अमेरिकेतील रस्त्यांबाबत तसेच प्रदूषण, पर्यावरणपूरक संदेश देता यावा, या उद्देशाने त्यांनी किशोर मेहता यांच्यासोबत सायकलवरून मुंबई येथून प्रवास सुरू केला आहे. दहा दिवसांचा हा प्रवास असून, चौथ्या दिवशी जालना येथे ते आले होते. "दिव्य मराठी'शी बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबईतील वसई येथून हा सायकल प्रवास सुरू झाला आहे. रस्त्यावरील प्रत्येक बाबी टिपता याव्या याअनुषंगाने त्यांनी डोक्याला कॅमेरे लावून डाटा सेव्ह करत आहेत. 


७२ वर्षीय मेहता यांचा दररोज १२० कि.मी. प्रवास : मुंबई येथून १ फेब्रुवारीपासून राजन आणि मेहता यांनी सायकल प्रवास सुरू केला आहे. या प्रवासादरम्यान, दररोज ते १२० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करतात. हे अंतर सायकलवरून पार पाडण्यासाठी त्यांना सात ते आठ तास लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दररोज शहरांचा रूट ठरवण्यात आला आहे. कुठे उशीर झाल्यास ते मंदिरात मुक्कामी थांबतात. 


शासनाला आवाहन करणार 
अमेरिकेत बहुतांश वृक्ष आहेत. रस्त्याचे काम करत असताना पूर्ण झाड तोडले जात नाही. त्याच्या फांद्या तोडल्या जातात. भारतातील रस्त्यांवर अत्यंत तुरळक झाडे आहेत. याबाबत प्रवासाचा डाटा देऊन शासनाकडे झाडे लावण्यासाठी आवाहन करणार आहे. - राजन फोन्सेका, अमेरिका. 


असा आहे दररोज मुक्काम 
दररोज सायकल प्रवास करणारे राजन फोन्सेका आणि किशोर मेहता मुंबई येथील वसई, इगतपुरी, शिर्डी, औरंगाबाद, देऊळगावराजा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर असा दहा दिवसाचा त्यांचा प्रवास सुरू आहे. 


असा आहे अमेरिकेत नियम 
अमेरिकेत झाड तोडल्यास त्या बदल्यात तीन वृक्षांची लागवड करावी लागते. भारतातही असा कायदा आहे. परंतु, त्यावर अंमलबजावणी होत नाही. अमेरिकेत रस्ते दत्तक देण्याची परंपरा कायम आहे. भारतात मात्र, त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने वृक्षांची संख्या कमी होत असल्याची माहिती राजन फोन्सेका यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...