आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएससी, पीएफवरील व्याजदर आता ८ टक्के; ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीसाठी दर लागू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) तसेच पीपीएफसह इतर अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिलासा देत या योजनांसाठीच्या व्याजदरात वाढ केली आहे. यात पीपीएफ आणि एनएससीवर सध्याच्या ७.६ ऐवजी ८ टक्के वार्षिक व्याज मिळेल. सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ केली आहे. अल्प बचत योजनांवरील व्याजदर दर तिमाहीला निश्चित केले जातात.


ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के वाढ करण्यात आली असून किसान विकास पत्रावर ७.३ ऐवजी ७.७ टक्के व्याज मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेवर ८.५ टक्के व्याज देण्यात येणार आहे. आधी हा व्याजदर ८.१ टक्के होता. त्यामध्ये ०.४ टक्के वाढ करण्यात आली आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.


घरगुती बचत ९ वर्षांत ७ टक्के घसरली
आर्थिक वर्ष २००८ ते २०१७ या काळात घरगुती बचतीचे प्रमाण ३६.०८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आले आहे. मात्र, घरगुती कर्जाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ही बचत घसरली असल्याचा तर्क यासाठी लावता येणार नाही, असे एसबीआयच्या एका संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशाचा जीडीपी १० टक्क्यांच्या खाली अाला तरी देशातील घरगुती कर्जाच्या प्रमाणात वाढ होत नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


बचत खात्यावर चार टक्के व्याज
बचत खात्यांतील रकमेवर सध्या सुरू असलेले ४ टक्के व्याज कायम राहणार आहे. तसेच एक ते तीन वर्षांसाठी करण्यात आलेल्या एफडींवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात ०.३ टक्के वाढ करण्यात आली आहे.


ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर मिळणार ८.७ टक्के व्याज
>अर्थ मंत्रालयाने काढलेल्या अिधसूचनेनुसार, २०१८-१९या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीसाठी विविध अल्प बचत योजनांचे व्याजदर बदलण्यात आले आहेत. ५ वर्षांसाठीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता ८.७ % व्याजदर मिळेल. 
>अर्थ मंत्रालयानुसार, १९ सप्टेंबरपासून विविध वेगवेगळ्या अल्प बचत योजनांच्या व्याजदरांत ३० ते ४० बेसिस पॉइंटपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एक वर्ष, दोन व तीन वर्षांसाठीच्या ठेवींवरील व्याजदर ३० बेसिस पॉइंटने वाढवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...