आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना, एनएसयूआयच्या अध्यक्षाने चपलांचा हार घालून काळं फासलं

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार दिल्ली विद्यापीठात घडला आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांच्या पुतळ्या शेजारी सावरकरांचा पुतळा बसवण्यावरून हा वाद झाला. त्यानंतर काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा दिल्ली अध्यक्ष अक्षय लाक्रा याने गुरुवारी सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासून चपलांचा हार घातला.

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शक्ती सिंग यांनी मंगळवारी सावरकर, भगतसिंह आणि बोस यांचे अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण केले होते. दिल्ली विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता उत्तर कॅम्पसमध्ये हे पुतळे बसवण्यात आले होते. यानंतर ‘सावरकर देशद्रोही होते. ते गांधीजींच्या हत्येमध्ये सहभागी होते. आणि तुम्ही भगत सिंह आणि सुभाष चंद्र बोस यांच्यासारख्या स्वातंत्र्य सेनानींच्या शेजारी सावरकरांचा पुतळा बसवता?’ असा प्रश्न एनएसयूआय अध्यक्ष अक्षय लाक्राने उपस्थित करत पुतळ्याला काळं फासलं. अनधिकृतपणे पुतळा बसवण्याची तक्रार पोलिस आणि विद्यापीठाकडे केल्यानंतर 48 तास उलटून गेले, तरीही कोणतीच कारवाई केलेली नाही, असा दावा एनएसयूआयच्या सदस्यांनी केला आहे.
 

सावरकर द्वेषाचं सलाईनही त्यांना वाचवू शकणार नाही- रणजीत सावरकर
या प्रकारानंतर सावरकरांचे वंशज आणि सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष रणजीत सावरकर यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "सत्ता गेल्याने हे संतप्त आहेत. यांचे पेशंट आयसीयूमध्ये आहे, सावरकर द्वेषाचे सलाईन लावून पण जगू शकणार नाही. आजची तुमची मानसिकता सुधारा, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमचे अध्यक्ष उरलेच नाहीत, आता संघटना पण राहणार नाही", असा संताप रणजीत सावकर यांनी व्यक्त केला.
 

घटनेचे पडसाद सोलापूरात
दिल्ली विद्यापीठातील स्वातंत्रवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबणाचे पडसाद सोलापूरात पडले. यावेळी अनेक सावरकर प्रेमींनी सोलापूरातील काँग्रेस भवनासमोर निषेध करत एनएसयूआयच्या पोस्टरवर काळी शाई फासली. तसेच अनेक कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, सावरकरांचा विजय असो अशा घोषणाही दिल्या.

बातम्या आणखी आहेत...