आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगला अभिनेत्री नुसरत जहां-जैन म्हणते की, मी नकारात्मक नाही. सासर, माहेर, राजकारण आणि अभिनयाच्या विश्वात समतोल साधत असलेल्या नुसरत यांच्याशी शरद पांडेय आणि पवनकुमार यांनी चर्चा केली.
*प्रश्न : तुम्ही कुंकू लावता, वंदे मातरम म्हणता. इन्क्लुझिव्ह इंडियाबद्दल बोलता. त्यामागे विचार काय?
- मी याचा विचार करत नाही. नकारात्मक विचार तर करतच नाही. अशा प्रकारे नकारात्मक विचारांचे १०% लोकच असतील. ९०% लोक मला पाठिंबा देत आहेत, चांगल्या गोष्टी करत आहेत.
*प्रश्न : भारतात धर्माबाबत सतत वाद होत राहतात. तुम्ही धर्माकडे कशा प्रकारे पाहता?
- आतून मजबुती मिळावी यासाठी लोक धर्म मानतात. स्वत:ला बळ देण्यासाठी. त्यामुळे धर्मावर पूर्ण विश्वास ठेवला जातो. धर्म आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यांची सरमिसळ करू नये.
*प्रश्न : तुमच्या मते धर्माची व्याख्या काय आहे?
- धर्म म्हणजे विश्वास. जो हृदयातून येतो, तो धर्म आहे आणि जो मेंदूतून येतो, तो धर्म नाही.
*प्रश्न : चित्रपटातून बाहेर पडण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयाकडे तुम्ही कसे पाहता?
- याबाबत काही म्हणणे घाईचे ठरेल, पण मी राजकारणातून बाहेर पडायला आले नाही. मी शूटिंग, घर, कुटुंंब हे सर्वकाही सोडून आले आहे, आपल्या लोकांसाठी. समाजाचे काही भले करता यावे यासाठी. मी माघारी जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
*प्रश्न : तुम्ही चित्रपटांतून राजकारणात आला आहात, त्यामुळे तुमच्या दृष्टिकोनात असा बदल आहे का? एक सामान्य भारतीय तुमच्यापासून काय शिकवण घेऊ शकतो?
- मी येथे शिकवण्यासाठी नाही, तर स्वत: शिकण्यासाठी आले आहे. मी तर येथे सध्या नवीन आहे.
*प्रश्न : काही दिवसांपूर्वी तुम्ही इस्कॉन सोसायटीच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी होता, पहिल्यांदा गेल्या होता का?
- नाही, मी दरवेळी रथ ओढत असे. मी धर्म बदलला अशा बातम्या तेव्हा येत असत. आता पतीसोबत मंगल आरती करते तर म्हणतात की, हिंदूशी लग्न केले आहे. मी त्याकडे लक्ष देत नाही.
*प्रश्न : अभिनय करणे, राजकारणही करणे कसे शक्य होईल? नुकतेच लग्नही झाले आहे.
- काहीही अशक्य नाही. राजकारण माझी जबाबदारी आहे. ती कोणत्याही स्थितीत पूर्ण करणारच. चित्रपट ही माझी आवड आहे. ते स्वत:साठी करते. आनंदी राहण्यासाठी हे करते. प्रत्येक माणसाला आपले घर सांभाळावे लागते, ती जबाबदारी असते. हे आव्हानात्मक आहे, पण करावी तर लागेलच.
*प्रश्न : जात, धर्म आणि भाषेवरून बंगालमध्ये जो वाद सुरू आहे, त्याचे निवारण कशा प्रकारे होऊ शकते?
- बंगालमध्ये लोक जाती-धर्माच्या पलीकडे पाहतात. दुर्गा पूजा आणि ईद सोबत साजरी करतात. ज्या दिवशी रामनवमी मिरवणूक निघते, त्याच दिवशी मोहरमचा ताजिया निघतो.
*प्रश्न : नरेंद्र मोदींचे नेतृत्व किंवा व्यक्तिमत्त्व याबाबत तुमचे मत काय?
- पंतप्रधान चांगले वक्ते आहेत. चांगले बोलतात. पुढील पाच वर्षांत भारत कुठे पोहोचतो, ते पाहूनच निर्णय घेऊ शकतो.
*प्रश्न : निवडणुकीच्या वेळी दीदींनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ‘गुंड’ म्हटले होते. हे योग्य होते की राजकारणात चालते?
- मोठे लोक परस्परांवर टीका करतात, त्याकडे मी लक्ष देत नाही. मी अद्याप अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. पुढेही करणार नाही.
*प्रश्न : तुमच्या मते मुस्लिम समाजाला मोदी आणि भाजप यांच्याबद्दल आक्षेप का आहे?
- मी याकडे कधीही लक्ष दिले नाही. ते लोकशाही असलेल्या देशाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सर्व धर्मांना समान महत्त्व द्यायला हवे. त्यांनी म्हटलेही आहे की, सर्वांना सोबत घेऊन जाऊ. होय, सध्या अल्पसंख्याकांचे मॉब लिंचिंग होते आहे, त्यामुळे विश्वास डळमळीत होतो.
*प्रश्न : तुमच्याविरोधात फतवा जारी झाला, पण तुम्ही त्याचा जोरदार मुकाबला केला. असे करण्याची ताकद कुठून आणता?
- माझ्याविरोधात कुठलाही फतवा जारी झाला नाही. ते जारी करण्याचा विचार करत होते, पण कदाचित त्यांचा विचार बदलला असावा. राहिली गोष्ट ताकदीची, तर स्वत:ची लढाई स्वत:लाच लढावी लागते. माझ्या नावाचा अर्थ आहे विजय आणि विजय मिळवण्यासाठी लढाई करावीच लागते.
*प्रश्न : जर फतवा जारी झाला असता तर काही फरक पडला असता का?
- माझा धर्म कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. माझा धर्म प्रामाणिकपणातून येतो, तो जन्मापासून आहे. मी जन्माने मुस्लिम आहे आणि अखेरपर्यंत मुस्लिमच राहीन. मी हिंदूशी लग्न केले आहे. मी हिंदूंसह सर्व धर्मांचा आदर करते. सर्व धर्म समान आहेत, अशीच शिकवण मला शाळेत आणि घरीही मिळाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.