आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलसेल विक्रेत्याकडून तब्बल ३ लाखांचा नायलॉन मांजा जप्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
नाशिक - घातक नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या होलसेल विक्रेत्यावर छापा टाकत तब्बल तीन लाख रुपयांचे नायलाॅन मांजाचे ३०० गट्टू जप्त करण्यात आले. शनिवारी (दि. १२) सायंकाळी ७.३० वाजता रविवार कारंजा येथे पतंग विक्रीचे होलसेल दुकान असलेल्या दिलीप पतंग येथे गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. संक्रातीपूर्वी पथकाची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. विशेष म्हणजे हा विक्रेता शहरातील इतर पतंगविक्रेत्यांना फोनवर मांजा विक्री करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रांतीपूर्वी शहरात दिल्लीमधून नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाचे स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार यांना मिळाली होती. 


मोठ्या प्रमाणात येणारा नायलॉन मांजा कुठे उतरणार यावर पाळत ठेवली. सायंकाळी पथकाने रविवार कारंजा येथे सापळा रचला. नायलाॅन मांजाचे दहा ते पंधरा बॉक्स दिलीप पतंग येथे उतरवण्यात आले. पथकाला संशय आल्याने छापा टाकला असता तब्बल तीन लाखांचे ३०० गट्टू मांजा जप्त करण्यात अाले. संशयित होलसेल विक्रेता दिलीप पांडुरंग सोनवणे यास अटक केली. त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, महेश कुलकर्णी, बलराम पालकर, वसंत पांडव, येवाजी महाले, संतोष कोरडे, विशाल देवरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 


दिल्ली येथून आला मांजा 
दिल्ली येथून हा घातक नायलाॅन मांजा विक्रीसाठी मागवण्यात आला असल्याचे संशयिताच्या चौकशीत समोर आले. संक्रांतीपूर्वी मांजा मागवला होता. अशाच प्रकारे रविवार कारंजा आणि शहरातील इतर विक्रेत्यांकडे दिल्ली येथून नायलाॅन मांजा विक्रीसाठी आला असण्याची शक्यता पाेेलिसांनी व्यक्त केली आहे. 


फोनद्वारे करत होता विक्री 
संशयित शहरातील किरकोळ पतंगविक्रेत्यांना मांजा-पतंग विक्री करत होता. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी तो फोनद्वारे संपर्क साधून विक्री करत असल्याचे समोर आले. 


कारवाई सुरूच राहणार 
नायलॉन मांजा विक्री करणारे आणि वापर करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात शोधमोहीम सुरू राहणार आहे. नायलॉन मांजाचा वापर केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. - आनंद वाघ, वरिष्ठ निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट १ 

 

बातम्या आणखी आहेत...