Magazine / अप्सरा आली...!

समाज महिलांना फक्त देवीच्या रूपात पाहू शकतो अप्सरेच्या रुपात नाही...

देवदत्त पटनायक

May 26,2019 12:10:00 AM IST

राजाचे महत्त्व फक्त तो बलवान आहे म्हणून नसते, तर त्या राजाच्या दरबारातही अशा किती कलागुण संपन्न गणिका आहेत त्यावरही त्या राजाची आणि त्याच्या राज्याची महती गौरवली जाते. म्हणून प्राचीन काळात गणिकांनाही तितकाच बहुमान दिला जायचा.

अप्सरांचा विषय पुराणात वारंवार येतच असतो. या पुराणकथांमध्ये अप्सरांबद्दल काय म्हटलं गेलंय, तर एखादा ऋषी कठोर तपश्चर्येला बसतो. त्याच्या या तपश्चर्येमुळे इंद्राचे सिंहासन डळमळीत व्हायला सुरुवात होते. मग इंद्र त्याच्या दरबारातील मनमोहक अशा अप्सरेला त्या ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवतो. आपल्या सौंदर्य आणि नृत्यगायन शैलीच्या जोरावर अप्सरा ऋषींची तपश्चर्या भंग करण्यात यशस्वी होते. याचाच अर्थ अप्सरांना प्रलोभनाचे प्रतीक म्हणून पुराणकथेत स्थान दिले गेले आहे.


ऋग्वेदामध्ये सर्वप्रथम अप्सरांचा उल्लेख सापडतो. उर्वशी नावाची एक अप्सरा आणि पुरुरवा राजा यांच्यातील संबंधांबद्दल ऋग्वेदामध्ये सांगितले गेले आहे. पृथ्वीवर काही काळ राहिल्यानंतर या अप्सरांना पुन्हा स्वर्गाचे वेध लागतातच. उर्वशीच्या बाबतीतही नेमके हेच घडले. ती जेव्हा राजा पुरुरवाला सोडून पुन्हा स्वर्गात निघाली तेव्हा राजाने तिला अडवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु तो सफल झाला नाही. अप्सरांच्या आयुष्यात प्रेमाची व्याख्या एकदम वेगळी आहे. खरं प्रेम त्या कोणावरही करत नाहीत. उर्वशी पुरुरवासाठी थांबलीच नाही आणि म्हणून पुरुरवा प्रचंड दु:खी झाला. अप्सरांच्या बाबतीत असेही म्हटले जाते की, ऋषीमुनींची एकदा का तपश्चर्या भंग पाडल्यानंतर त्यांच्यातील शरीरसंबंधातून जे मूल जन्माला येतं, अप्सरा त्यांचाही स्वीकार करत नाहीत. त्या नवजात अर्भकाला तसेच जंगलात टाकून अप्सरा पुन्हा स्वर्गात दाखल होतात.


प्राचीन काळातील नगरवधू, गणिका आणि देवदासींना समोर ठेवूनच अप्सरांची कथा लिहिली गेली असण्याची शक्यता आहे. किंवा त्याच्या उलटही घडले असावे. अप्सरांची कार्यशैली डोळ्यासमोर ठेवून नगरवधू, गणिका आणि देवदासींच्या कथा लिहिल्या गेल्या असाव्यात. म्हणूनच चौसष्ठ कलागुण संपन्न असण्याचा मान अप्सरा आणि गणिका यांनाच दिला जातो. राजाचे महत्त्व फक्त तो बलवान आहे म्हणून नसते तर इंद्र दरबारासारख्या त्या राजाच्या दरबारातही अशा किती कलागुण संपन्न गणिका आहेत त्यावरही त्या राजाची आणि त्याच्या राज्याची महती गौरवली जाते. म्हणून प्राचीन काळात गणिकांनाही तितकाच बहुमान दिला जायचा.
अप्सरांचा जन्म कसा झाला यावरही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही पुराण असे सांगतात की अप्सरा या कश्यप ऋषींच्या मुली आहेत, तर काहींच्या मते समुद्रमंथनामधून अप्सरांचा जन्म झालाय. “अप्स’हा शब्द पाण्याशी जोडला गेला आहे आणि “तप’हा शब्द अग्नीशी... आग आणि पाणी यांच्यात जसे वैर आहे तसेच वैर अप्सरा आणि ऋषींमध्ये आहे. यासंदर्भात अनेक कथा पुराणात सापडतात... मेनका आणि विश्वामित्राची कथा म्हणूनच अजरामर ठरली आहे. मेनकेमुळे विश्वामित्राची तपश्चर्या भंग झाली हे जरी खरे असले तरी त्यानंतर जेव्हा पुन्हा विश्वामित्र तपश्चर्येसाठी बसला होता तेव्हा रंभा मात्र ती भंग करण्यास यशस्वी ठरली नाही. असेही म्हणतात की, कंडू ऋषीसोबत प्रमलोचा नामक एका अप्सरेचा तब्बल ९०० दिवस संभोग सुरू होता. ते दोघे एकमेकांच्या सहवासात इतके तल्लीन झाले होते की त्यांना असे वाटले की फक्त एकच दिवस झालाय की काय...
अनेक ऋषीमुनींचे अप्सरांना पाहून वीर्यस्खलन व्हायचे आणि त्यातून दुसऱ्या ऋषींचा जन्म व्हायचा. उर्वशीचे सौंदर्य पाहून विभंद ऋषीचे वीर्यस्खलन झाले आणि त्यातून ऋष्यश्रृंग मुनीचा जन्म झाला... घृताची नामक अप्सरेला पाहून भरद्वाज ऋषीचे वीर्यपात झाले आणि त्यातून द्रोण जन्मले आणि जनपदीसमोर मोहित होऊन शरद्वत ऋषींचे वीर्यस्खलन झाले आणि मग क्रिपा अन् क्रिपि जन्मले. अनेक पौराणिक कथेत या अप्सरांना शाप मिळाल्याचेही उल्लेख आहेत. अद्रिका या अप्सरेला मत्स्य रुपी राहशील असा शाप मिळाला होता. मत्स्यरुपी अद्रिका या अप्सरेने दोन मुलांना जन्म दिला त्यापैकी एक सत्यवती, जिची कथा आपण महाभारतात वाचलेली आहे. ध्यानमाल नावाच्या अप्सरेलाही असाच शाप मिळाला होता. जोपर्यंत हनुमान तिच्यावर विजय मिळवत नाही आणि तिला मोक्ष देत नाही तोपर्यंत ध्यानमालला पाण्यात मगरीच्या रुपात राहावे लागेल असा शाप मिळाला होता. कधीकधी राक्षसांचा नयनाट करण्यासाठीही अप्सरा जन्म घ्यायच्या. तिलोत्तमा ही अशीच एक अप्सरा... तिलोत्तमाला वश करण्यासाठी सुंड आणि अपसुंड हे दोन राक्षस आपापसातच लढले आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला.


मुक्त वातावरणात राहणाऱ्या, उघड उघड अनेक प्रियकरांसोबत संबंध ठेवणाऱ्या, राजदरबारात प्रमुख आकर्षण असलेल्या अशा स्त्रियांचे समाजामध्ये जेव्हापासून महत्व कमी होऊ लागले तेव्हापासून समाज या अप्सरांना वेश्यांसोबत जोडू लागले. आज टीव्हीवरच्या मालिकेत या अप्सरांना बिनडोक आणि “आयटम नंबर’च्या रुपात दाखवले जाते. अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांचे चित्रण केले जात आहे आणि यावरून हेच सिद्ध होतंय की समाजाने महिलांचा आदर करणे सोडून दिले आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणून त्यांना एका चौकटीत अडकवून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. कारण आपला


समाज महिलांना फक्त देवीच्या रूपात पाहू शकतो अप्सरेच्या रुपात नाही...

देवदत्त पटनायक
[email protected]

X
COMMENT