आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाच्या विधेयकामुळे अत्यल्प जातीघटकावर थेट अन्याय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सुप्रीम कोर्टाच्या मर्यादेमुळे मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे प्राप्त ओबीसींच्या आरक्षणाच्या टक्केवारीतच बसणार असल्याने मराठा आरक्षण हा महाराष्ट्र शासनाचा मोठा कुटील डाव आहे. मराठा आरक्षण विधयेकामुळे महाराष्ट्रातील अत्यल्प जातीघटकांवर थेट अन्याय होणार असल्याचा आरोप सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे प्रदेश नेते बालाजीराव शिंदे यांनी केला आहे. 
 
पत्रकार भवनात शनिवारी ओबीसी जनजागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी जनगणना परिषेदेचे राष्ट्रीय निमंत्रक प्रा.श्रावण देवरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे प्रदेश नेते शिंदे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, बहुजन चळवळीचे नेते मुकुंद सपकाळे, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष ईश्वर मोरे, राज्य धोबी समाज आरक्षण हक्क परिषदेचे प्रदेश कार्यवाहक विवेक ठाकरे आदी उपस्थित होते. या ओबीसी जनजागरण परिषदेत ओबीसी बचावचा नारा देण्यात आला. प्रा.श्रावण देवरे म्हणाले की, महाराष्ट्रात जातनिहाय जनगणनाच झालेली नसल्याने अधिकृत आकडेवारी शिवाय व मुळात मराठा आणि कुणबी मिळून ही संख्या २७ टक्के असल्याचा शासनाचा अहवाल अाहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज ३२ टक्के कसा? असा सवाल आहे. या वेळी ओबीसी परिषदेला नाभिक मंडळाचे राज्य संपर्क प्रमुख राजकुमार गवळी, मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष अश्फाक पिंजारी, डेबूजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, नाभिक समाजाचे विभाग अध्यक्ष मोहन साळवी, समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, बारी समाजाचे ज्येष्ठ नेते प्रकाश बारी, धोबी समाजाचे जिल्हा सचिव जे.डी. ठाकरे, लाँड्री संघटनेचे अध्यक्ष अरुण राऊत, बाळकृष्ण अहिरे, प्रवीण जगताप, रुपाली श्याम वाघ आदी उपस्थित होते. भगवान खंबायत यांनी सूत्रसंचालन केले. 
 
धोबी, न्हावी, कुंभार, गुरव, शिंपी, सोनार, लोहार, सुतार, वासुदेव, गोंधळी, तेली, तांबोळी, हटकर-धनगर, वाणी व अशा असंख्य ओबीसी समाजाला याचा खूप मोठा फटका आहे. या जाती उद्ध्वस्त होण्याचे फार मोठे संकट समाजासमोर असल्याने ओबीसी समाजाने निकराने लढा देण्यासाठी मानसिकता करावी, असे आवाहन मुकुंद सपकाळे यांनी केले. 
 
संभ्रमित करणारी आकडेवारी 
राज्यातील कुणबी यापूर्वीच ओबीसी प्रवर्गाच्या सवलती घेत असल्याने नव्याने येऊ घातलेला मराठा समाज हा १५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. अशा परिस्थितीत ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण तर १५ टक्के मराठ्यांना १६ टक्के आरक्षण हा कोणता निकष आहे. राज्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण केला आहे. राज्यातील सर्वात मोठा समाज हाच बहुजन समाजातील अल्प समाजाचे वर्षानुवर्षे शोषण करीत असल्याच्या घटना नोंद असताना आता शोषणकर्तेच शोषिक असल्याचा कांगावा करीत असल्याची टीका विवेक ठाकरे यांनी या जनजागरण परिषदेत केली. 

बातम्या आणखी आहेत...