आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरअखेरच ऑक्टोबर हीट, ३.३ अंशांनी कमाल तापमानात वाढ; औरंगाबादेत ३३.७ अंश तापमान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या आठ दिवसांपासून सूर्य चांगलाच तळपू लागला असून सप्टेंबरअखेरच ऑक्टोबर हीटला सुरुवात झाली आहे. १७ सप्टेंबर रोजी शहराचे कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सियसवर होते. ते २६ सप्टेंबर रोजी ३३.७ अंशांवर जाऊन पोहोचले. सोलापूरला सर्वाधिक ३६.४ अंश तापमान असल्याची नोंद हवामान विभागाने घेतली. दुपारी तर उन्हाळ्यासारखे चटके बसत आहेत. उकाडा वाढल्याने विजेचा वापरही वाढला आहे. पावसाचा खंड पडल्याने खरीप पिके होरपाळून निघत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 


परतीच्या मान्सूनने पाठ फिरवली. अपोषक वातावरणामुळे चांगल्या पावसाला हुलकावणी मिळत आहे. मात्र, जेथे पोषक वातावरण तेथेच परतीच्या मान्सून बरसणार आहे. त्यासाठीची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाला चार-चार आठवड्यांचे खंड पडला. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून सूर्य तळपू लागल्याने शहराच्या तापमानात ३.३ अंश सेल्सियसने वाढ झाली असून तापमान सातत्याने वाढत चालले आहे. ५१ दिवसांपासून पाऊस नाही. दुसरीकडे सूर्य तळपत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. उकाडा वाढल्याने कुलर, एसी, पिके जगवण्यासाठी कृषी पंप सुरू झाले. म्हणजेच विजेचा वापर वाढला आहे. ऑक्टोबरमध्ये यंदा पारा उच्चांकी पातळी गाठण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांमार्फत वर्तवली जात आहे. त्याचा प्रत्यय सप्टेंबरमध्येच येऊ लागला आहे. 


बुधवारी सोलापूरच्या कमाल तापमानाने उन्हाळ्याप्रमाणेच ३६.४ अंशांवर जाऊन उच्चांकी पातळी गाठली. परभणी ३५.१, चंद्रपूर ३५.४, जळगाव ३५.४ अंशांवर पारा होता. नांदेड ३४.५, नागपूर ३४, अहमदनगर ३४.८ अंश तापमान होते. महाबळेश्वरचे तापमान सर्वात कमी म्हणजे कमाल २६ अंश सेल्सियसवर होते. 


ऑक्टोबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता 
हवामान बदलामुळे ऋतुचक्र बदलत आहे. तापमानवाढीचे तेच कारण आहे. मात्र, उद्यापासून महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायला सुरुवात होईल. ऑक्टोबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ. 

 

बातम्या आणखी आहेत...