आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची पटनाईक यांनी घेतली शपथ, सलग पाचव्यांदा बहुमान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला मोठा विजय मिळवून देणारे नवीन पटनाईक यांनी बुधवारी ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सलग पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले असून हा एक विक्रम आहे. 


इडको एक्झिबिशन ग्राउंडवर झालेल्या समारंभात राज्यपाल गणेशी लाल यांनी नवीन पटनाईक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिजदच्या २० नवनिर्वाचित आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापैकी ११ जण कॅबिनेट मंत्री आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाने १४७ पैकी ११२ जागा जिंकल्या आहेत. हा पक्ष २००० पासून सलग सत्तेवर आहे.


नव्या मंत्रिमंडळात दोन महिलांचा समावेश असून, अनुसूचित जातीचे २ आणि अनुसूचित जमातीचे चार मंत्री आहेत. मंत्रिमंडळात १० मंत्र्यांना नव्याने स्थान देण्यात आले आहे. राज्यातील ३० पैकी १३ जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मागील मंत्रिमंडळातील नऊ मंत्र्यांना पटनाईक यांनी वगळले आहे. त्यात दोन महिला मंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पटनाईक यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे. पटनाईक यांचे सरकार राज्यातील जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल, असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. ओडिशाच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, ओडिशातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना राज्य सरकार सक्रिय पाठिंबा देईल, अशी माझी अपेक्षा आहे.


प्रथमच खुल्या मैदानात झाला शपथविधी
पटनाईक यांनी प्रथमच खुल्या मैदानात शपथ घेतली. याआधी २०००, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये पटनाईक यांचा शपथविधी समारंभ राजभवनात पार पडला होता. बुधवारच्या शपथविधी समारंभाला पटनाईक यांचे ज्येष्ठ बंधू आणि व्यावसायिक प्रेम पटनाईक, बहीण आणि प्रख्यात लेखिका गीता मेहता यांच्यासह ७००० पाहुणे हजर होते. त्यात उद्योगपती, लेखक, कलावंत, संगीतकार आणि बुद्धिवंत यांचा समावेश होता. त्याशिवाय बिजू जनता दलाचे खासदार, आमदार आणि पक्षाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

११ कॅबिनेट मंत्री असे
प्रफुल्ल मलिक, विक्रम केशरी अरुख, निरंजन पुजारी, टुकुनी साहू, राणेंद्र प्रताप स्वेन, अरुण साहू, सुदाम मारंडी, प्रताप जेना, पद्मनाभ बेहरा, सुशांत सिंह आणि नबा किशोर दास.


९ राज्यमंत्री असे 
पद्मिनी दियान, अशोकचंद्र पांडा, समीर रंजन दास, ज्योती प्रकाश पाणिग्रही, दिव्याशंकर मिश्रा, प्रेमानंद नायक, रघुनंदन दास, तुषारकांती बेहेरा आणि जगन्नाथ सरकार.

बातम्या आणखी आहेत...