आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्हाळे तलावाने ६५ वर्षांत डिसेंबरमध्ये प्रथमच गाठला तळ; ५५० हेक्टर तहानले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्मितीनंतरच्या ६५ वर्षात वेल्हाळे तलावाने प्रथमच असा तळ गाठला आहे. 
  • मत्स्य व्यावसायिक १२५ कुटुंबांना रोजगाराची, ५ गावांना पाण्याची भ्रांत 

भुसावळ - तब्बल ६५ वर्षांपूर्वी निर्मिती झालेल्या आणि ५ गावांना पिण्याचे, तर ५५० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी पुरवणारा वेल्हाळे (ता.भुसावळ) येथील तलाव इतिहासात पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात कोरडाठाक झाला आहे. महानिर्मितीच्या दीपनगर केंद्राने अॅश रिकव्हरीचे पाणी वेल्हाळे तलावात सोडून कृत्रिम पुनर्भरण करावे, या मागणीसाठी शनिवारी १५० शेतकऱ्यांनी महानिर्मितीला साकडे घातले. त्यास प्रतिसाद न मिळाल्यास या भागाला दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करण्याशिवाय गत्यंतर नसेल. 

 

भुसावळ तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्के पाऊस झाला. यामुळे तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी शासन-प्रशासन कामाला लागले असले तरी दिवसेंदिवस टंचाईची तीव्रता वाढती आहे. त्यातच तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागातील वेल्हाळे गावातील वेल्हाळ नदीवरील तलाव कोरडा पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सन १९५२-५३ मध्ये निर्मिती झालेला या तलावाने गत ६५ वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच तळ गाठला आहे. यापूर्वी सन २००६ मध्ये अत्यल्प पर्जन्यमानामुळे मे महिन्यात अशी स्थिती उद््भवली होती. मात्र, हिवाळ्याच्या सुरुवातीला डिसेंबर महिन्यात तळ गाठण्याची ही पहिलीच घटना आहे. १.९९ एमएम क्यूब क्षमतेच्या या तलावात सध्या १० टक्के साठा शिल्लक आहे. हा साठा मे महिन्यापर्यंत पुरवणे शक्य नाही. यामुळे महानिर्मितीच्या अॅश रिकव्हरी वॉटर प्रकल्पातून पुन्हा दीपनगरात जाणारे पाणी वेल्हाळे तलाव, जाडगाव व्हॉल परिसर, पाटचारीत सोडावे अशी मागणी शनिवारी १५० शेतकऱ्यांनी महानिर्मितीकडे केली आहे. 

या मागणीनुसार महानिर्मिती प्रशासनाने अॅश रिकव्हरीचे पाणी वेल्हाळे तलावात सोडल्यास परिसराची भूजल पातळी वाढून सिंचनासाठी आवर्तन मिळेल. फुलगाव, जाडगाव, मन्यारखेडा, वरणगाव या भागातील ५५० हेक्टर क्षेत्राला दिलासा मिळेल. सोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निकाली काढता येईल. 


तलाव आहे ऐतिहासिक...

राज्यात सन १९५२-५३ मध्ये दुष्काळ पडला होता. यावेळी मजुरांना रोजगार मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या योजनेतून वेल्हाळे तलावाची निर्मिती केली होती. सन १९५२ मध्ये तत्कालिन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते या तलावाचे भूमिपूजन झाले होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जिल्ह्यातील आणि भुसावळ विभागातील पहिला तलाव म्हणून वेल्हाळे तलावाचा उल्लेख केला जातो. वेल्हाळ नदीवरील हा तलाव परिसरातील एकमेव जीवंत जलस्त्रोत आहे. 

 

१५० शेतकऱ्यांचे महानिर्मितीच्या दीपनगर केंद्राला साकडे 
दक्षिणेचे पाणी आणा 
दीपनगर प्रशासनाने रिकव्हरी वॉटर तलावात सोडावे. तलावाच्या जवळील अॅश पॉडच्या दक्षिणेकडे साठले पाणी जेसीबीने चारी खोदून तलावात आणता येईल. महानिर्मितीने तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अॅश पॉड बांधल्याने पाण्याची आवक थांबली आहे. -राजेंद्र चौधरी, माजी सदस्य, जिल्हा परिषद 

 

राखेचे प्रदूषण थांबवावे 
राख मिश्रित पाण्यामुळे तलावाची क्षमता कमी झाली. आता तलाव कोरडा झाल्याने प्रथम त्यात साठलेली राख काढून घ्यावी, नंतर पाणी सोडावे. यामुळे पर्यावरण संवर्धन व शेतकऱ्यांचादेखील फायदा होईल. जांभुळनाला, पाटचारीतील साठलेली राख काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. -संतोष सोनवणे, वेल्हाळे 

 

मासेमारी धोक्यात 
वेल्हाळे तलावात सन १९६७ पासून मत्सपालन व्यवसाय केला जातो. या व्यवसायावर गावातील किमान १२५ कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, दीपनगर औष्णिक केंद्राच्या प्रदूषणामुळे या व्यवसायाला सन २०१० पासून घरघर लागली. आता डिसेंबरात तलाव आटल्याने मत्सपालन कठीण झाले आहे. परिणामी अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. 

 

५ गावांत टंचाई 
तलावाच्या परिसरात साकरी, खडका, मोंढाळे, मन्यारखेडा, जाडगाव या पाच गावांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या कूपनलिका व विहिरी आहेत. तलावाची पाणी पातळी घसरल्याने या विहिरी व कूपनलिका बंद होण्याची भीती आहे. दीपनगर केंद्राने अॅश रिकव्हरीचे पाणी पुन्हा तलावात सोडल्यास ही टंचाई निवळता येईल. 

बातम्या आणखी आहेत...