आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींबद्दलचे आक्षेपार्ह ट्विट; मुंबईत महिला आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त निधी चौधरी या महात्मा गांधी यांच्यावरील टि‌्वटर पोस्टमुळे वादात अडकल्या आहेत. आरोपानंतर चौधरी यांनी पोस्ट हटवली असून आपण गांधींची शिष्या असल्याचा खुलासा केला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या निलंबनाची मागणी केली. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. 
साध्वी प्रज्ञा यांनी गोडसेला ‘देशभक्त’ म्हटले होते. त्यानंतर निधी चौधरींनी टि‌्वटरवर गांधींचा संदर्भ देत एक उपहासात्मक पाेस्ट टाकली. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टवर हरकत घेतली. त्यानंतर चौधरी ट्रोल झाल्या. चौधरींनी पोस्ट हटवली. आपण गांधींच्या शिष्या असून ती पोस्ट व्यंगात्मक होती, असा खुलासा केला. मात्र त्यांच्या खुलासाने विरोधकांचे समाधान झाले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चौधरींच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय निरुपमांनी ‘तुम्ही गोडसेला देशभक्त मानता का?’ असा मुख्यमंत्र्यांनाच सवाल करत चौधरींवर कारवाईची मागणी केली. दरम्यान, चौधरी यांना सोशल मीडियावर पाठिंबासुद्धा मिळतो आहे. चौधरींची उपहासात्मक टीका समजून न घेता टीका केल्याबद्दल अनेकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला फैलावरही घेतले आहे. तर ‘कलेच्या, कवितेच्या, अर्थांच्या सूक्ष्म छटांच्या ऱ्हासाचा काळ सुरू झाला आहे’, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समीक्षक प्रा. डाॅ. हरिश्चंद्र थोरात (मुंबई) यांनी व्यक्त केली. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौधरी यांच्या पोस्टसंदर्भात सत्यता पडताळून पाहू, असे म्हटले आहे.


निधी चौधरी म्हणतात :

माझ्या आजपर्यंतच्या पोस्ट पाहा. मग मी गांधीविरोधी आहे की गांधीवादी हे कळेल. इंग्रजी साहित्यात सुवर्णपदक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनीच्या विधानाचा असा विपरीत अर्थ काढला जात असेल तर विद्यापीठात आम्ही केवळ पासबुक वाचायला पाहिजे होते.

 

काय होती निधींची पोस्ट
‘म. गांधी यांच्या १५० व्या जयंतीचा उत्सव चालू आहे. आता वेळ आलीय, नोटांवरची गांधींची प्रतिमा हटवण्याची. जगभरातले त्यांचे पुतळे उखडून टाकण्याची. रस्ते व संस्थांना गांधींची दिलेली नावे पुसून टाकण्याची. तीच गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. ’
 

निधी कोण आहेत
निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस आहेत. त्या मूळच्या राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील डिडवानच्या असून त्यांनी जयपूर विद्यापीठातून लोकप्रशासनात पीएचडी मिळवली आहे. टेक्नोसॅव्ही म्हणून बृहन्मुंबई पालिकेत त्या ओळखल्या जातात.