आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी प्रोटीन्सच्या कारणावरून अधिकाऱ्यांनी नाकारले दूध, तर मुंबईच्या पथकासमोरच बँड लावून धार काढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - दुधात प्रोटीन्सचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत दूध उत्पादन संस्थांचे दररोज हजारो लिटर दूध पाथरीतील शीतकरण केंद्रावर नाकारले जात होते. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई येथील तपासणी पथक सोमवारी (दि.२२) शीतकरण केंद्रावर दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बँड लावून गाय शीतकरण केंद्रात आणली. अधिकाऱ्यासमोरच दूध काढून ते तपासणीसाठी देण्याचा प्रकार केला. 


पाथरी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शासनाच्या दूध संकलन व शीतकरण केंद्रावर शेतकरी तपासणी पथक दाखल झाले, म्हणून आंदोलनाच्या मानसिकतेत हजर झाले होते. या केंद्रावर दररोज ३० हजारांवर लिटर दूध संकलित करून शीतकरण केले जाते. मात्र दुधामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शेतकऱ्याचे दूध नाकारले जात आहे. 


मुळातच तीन-तीन महिने दुधाचे पैसे शासनाकडून मिळत नसताना  व त्यातही दूध प्रोटीन्सच्या कारणावरून नाकारले जात असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शासनाची ही जाणीवपूर्वक शेतकरीविरोधी भूमिका असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. दरम्यान, या केंद्रावरील दूध तपासणीसाठी मुंबई येथून दोन अधिकारी दाखल झाले होते. त्याचे औचित्य साधून शेतकऱ्यांनी गाय या केंद्रावर आणून अधिकाऱ्यासमक्ष दूध काढले. ते त्यांना तपासणीसाठी दिले. चुकीची मानके वापरत दुधाची तपासणी केली जाते. अधिकारी, कर्मचाऱ्याची साखळीच दुधात भेसळ करून शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. या वेळी झालेल्या आंदोलनात दूध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते.