Mumbai / मुंबईचं मरण : मुंबईत 30 वर्षे जुनी अवैध इमारत कोसळून 11 ठार, 40 जण बेपत्ता, हातानेच उपसले ढिगारे

चिंचोळ्या मार्गामुळे ढिगारे उपसण्यात प्रचंड अडथळे

विशेष प्रतिनिधी

Jul 17,2019 09:16:22 AM IST

मुंबई - मुंबईतील डोंगरी भागातील ३० वर्ष जुनी चार मजली अवैध इमारत मंगळवारी सकाळी ११.४० दरम्यान कोसळली. या दुर्घटनेत १ मुलगा, ४ महिलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ८ जण जखमी असून ढिगाऱ्यांखाली आणखी ४० ते ४५ जण अडकल्याची भीती आहे. यात महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. इमारतीत १५ कुटुंबे राहत होती. चिंचोळ्या जागेमुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. गेल्याच आठवड्यात इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात बैठक होऊन लवकरच काम सुरू करण्याचा निर्णय झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख केले आहे. त्यातच ही इमारत आपली नसल्याचे म्हाडाने स्पष्ट केले असून मुंबई मनपाने मात्र इमारतीची माहिती घेत असल्याचे सांगितले आहे.


मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असताना अचानक इमारत कोसळली अन् एकच हाहाकार उडाला. इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात धुळीचे लोट उठले. स्थानिकांनी दुर्घटनेची माहिती देताच अग्निशमन दलाच्या गाड्या दुर्घटनास्थळी आल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफची टीमही दुर्घटनास्थळी पोहोचली.

हातानेच उपसले ढिगारे
इमारतीकडे जाण्याचा रस्ता अत्यंत चिंचोळा असल्याने जेसीबी नेणे अवघड झाले होते. त्यामुळे एनडीआरएफ जवान व स्थानिक हातांनीच ढिगारा उपसत होते. ढिगारा बाहेर नेऊन टाकण्यासाठी त्यांनी गल्लीच्या दोन्ही बाजूंना मानवी साखळी केली. इमारत कोसळलेल्या ठिकाणी बघे आणि गाड्या जाऊ नयेत म्हणून आसपासचे सर्व रस्ते बंद केले होते.


डोळ्यांसमोर आई गेली
शाहीन ही तरुणी म्हणाली, मी सकाळी ऑफिसला जाताना चावी विसरले होते. आम्ही दुसऱ्या माळ्यावर राहतो. आईने गॅलरीतूनच चावी फेकली. इतक्यात इमारतही कोसळली. माझ्या डोळ्यांसमोर आई ढिगाऱ्याखाली गाडली गेली. परंतु सुदैवाने तिला लवकरच बाहेर काढले. परंतु माझी बहीण आणि तिचा मुलगा मात्र अजूनही बेपत्ता आहेत.


पहिल्या काही मिनिटांतच एका मुलाला वाचवले
इमारत कोसळल्याच्या काही मिनिटांतच बचाव पथकाच्या जवानांनी सहा वर्षांच्या एका मुलाला ढिगाऱ्यांखालून सुखरूप वाचवले. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


गेल्याच आठवड्यात पुनर्विकासासंदर्भात झाली होती बैठक
स्थानिक नागरिक अब्दुल सत्तार म्हणाले, केसरबाई इमारत नव्हे तर त्याच्या मागील गोडाऊनच्या जागेत १९९३-९४ मध्ये मोकळ्या जागेत बांधलेली इमारत कोसळली आहे. मूळ केसरबाई इमारत १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी होती. मुंबई मनपाने त्या इमारतीला धोकादायक घोषित करून गेल्याच वर्षी रिकामी केली होती.

X
COMMENT