आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून गोळी झाडून औद्योगिक वसाहतीतील ठेकेदाराची निर्घृण हत्या; मारेकऱ्यांनी हवेत गोळीबार करत घटनास्थळावरून काढला पळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत संजय अंभोरे - Divya Marathi
मृत संजय अंभोरे

बदनापूर - जुन्या वादातून एकावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे घडला. संजय अंभाेरे असे मृत व्यक्तीचे नाव असून या पूर्वीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

संजय अंभोरे (४२, सेलगाव, ता.बदनापूर) हे सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत बदनापूर रोडवरील एका पान टपरीवर गप्पा मारत बसले होते. त्याच वेळी तिथे दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी जुन्या भांडणातून अंभाेरे यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यातच एकाने अंभोरे यांच्या डोक्याला पिस्तुल लावून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. या प्रकाराने तेथे एकच धावपळ उडाली. स्थानिक लोकांनी त्यांना तातडीने जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान या ठिकाणी मृताच्या नातेवाइकांनी डीवायएसपी सुनील खिराडकर यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. अंभोरे यांच्यावर यापूर्वी हल्ला झाला तेव्हाच त्याचा तपास केला असता तर हा प्रकार घडला नसता, असे नातेवाइकांनी म्हटले.

मारेकऱ्यांनी घातले होते हेल्मेट :
मृत अंभोरे हे जालना औद्योगिक वसाहतीत ठेकेदार म्हणून काम करत होते. त्यांच्यावर गोळीबार करणारे मारेकरी दुचाकीवरून आले होते. त्यांनी हेल्मेट घातलेले असल्याने चेहरा दिसला नाही. मात्र गोळीबारानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हवेत गोळीबार केला.