आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाची हॅम रेडिओमुळे झाली मुलांशी भेट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर : लाखो भाविकांची मांदियाळी होणाऱ्या गंगासागर मेळाव्यात अनेकदा नातेवाइकांची चुकामुक होते. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून बेपत्ता झालेले राजाराम बोनगीर हे तब्बल २१ वर्षांनी या मेळाव्यात गवसले. विमनस्क अवस्थेतील अापल्या वृद्ध पित्याला पाहून दोन्ही मुले त्यांच्या गळ्यात पडून रडली. हॅम रेडिओ क्लबच्या पश्चिम बंगाल राज्यातील सागर जिल्ह्यातील व नगरच्या सदस्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही गाठभेट होऊ शकली. 


गंगासागर येथे पवित्र स्नानाकरिता लाखो भाविक येतात. मोठ्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता प्रशासन सज्ज असते. वेस्ट बंगाल हॅम रेडिओ क्लब या मेळाव्यात प्रशासनाच्या बरोबरीने काम करतो. रेडिओ क्लबचे प्रमुख अंबरिश नाग विश्वास हे मेळाव्यात स्वयंसेवक म्हणून काम करत असता त्यांना राजाराम बोनगीरवार विमनस्क अवस्थेत सापडले. ते १९९८ मध्ये गंगासागर मेळाव्यात आले होते. तेव्हापासून ते बेपत्ता होते. 


वेस्ट बंगाल हॅम रेडिओ क्लबच्या सदस्यांनी बोनगीरवार यांना ताबडतोब वैद्यकीय सेवा पुरवून चौकशी केली. चौकशीत ते महाराष्ट्रातील असल्याचे समजले. त्यांनी आपल्या गावाचे नाव कोठारी असे सांगितले. त्यानंतर हॅम रेडिओवरून त्या परिसरात संदेश देण्यात आला. हॅम रेडिओ क्लबचे जगभरात ऑपरेटर आहेत. त्यापैकी नगरचे दत्ता देवगावकर यांच्यापर्यंत हा संदेश आला. त्यांनी मग चंद्रपूर जिल्ह्यातील रेडिओ क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधून याबाबत खात्री करण्याची विनंती केली. गजानन कुलकर्णी यांनी मदत केली. 


कोलकात्याहून हैदराबाद येथील हॅम टॉम केजोस यांना ही माहिती मिळाली. त्यांनी ती नगरचे दत्ता देवगावकर यांना दूरध्वनीवर दिली. देवगावकर यांनी चंद्रपूर पोलिस उपविभागातील कोठारी येथील पोलिस निरीक्षक अंबिके यांच्याशी संवाद साधला. कोठारी येथून राजाराम बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोलकात्याहून राजाराम यांचे सध्याचे छायाचित्र पाठवण्यात आले. कुटुंबीयांनी आधी त्यांना ओळखले नाही. 


वन विभागात नोकरीला असलेले राजाराम हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात सन २००२ मध्ये नोंदवण्यात आली होती. त्यात त्यांचे वर्णन व शरीरावरील खुणांची माहिती होती. त्यावरून हे तेच राजाराम असल्याची खात्री पटली. तेथील तहसीलदार बल्लारपूर यांनीही यात मदत केली. राजाराम यांचा मुलगा शेखर आणि लक्ष्मण हे आपले वडील राजाराम यांना आणायला कोलकात्याला गेले. सोबत चंद्रपूर पोलिसही होते. कोलकात्यातील काकद्वीप रुग्णालयात बाप-लेकांची तब्बल २१ वर्षांनी भेट झाली. ही भेट केवळ पश्चिम बंगाल हॅम रेडिओ क्लबच्या सदस्यांमुळे होऊ शकली. त्यामुळे मुलांनी रेडिओ क्लबच्या सदस्यांचे हात जोडून आभार मानले. राजाराम यांना परत आणण्यासाठी पोलिस निरीक्षक अंभोरे, अंबिके, नागपूरचे उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार विकास अहिर, नगरचे हॅम ऑपरेटर देवगावकर यांची मदत झाली आहे. 


हॅम रेडिओ म्हणजे काय? 
एकमेकांशी संपर्क ठेवू शकणारी बिनतारी संपर्क यंत्रणा म्हणजे हॅम रेडिओ. हा संच जुन्या वॉकीटॉकीसारखा दिसतो. लँडलाइन टेलिफोन एकमेकांना तारांद्वारे जोडलेले असतात; पण हॅम यंत्रणा मात्र पूर्णपणे रेडिओ लहरींवर चालते. आपत्कालीन परिस्थितीत इतर सर्व संपर्क यंत्रणा बंद पडली तरी जिल्हा प्रशासनास हे यंत्र उपयोगी पडते. 
 

बातम्या आणखी आहेत...