loksabha speaker selection / बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड; यांच्या विनम्र स्वभावाचा गैरफायदा घेण्याची भीती वाटते - मोदींनी व्यक्त केल्या भावना

१७ पैकी १२ लोकसभा सभापती बिनविरोध
 

वृत्तसंस्था

Jun 20,2019 11:15:00 AM IST

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राजस्थानातील कोटा मतदारसंघाचे खासदार आेम बिर्ला यांची १७ व्या लोकसभेच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने लोकसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाने त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आेम बिर्ला यांच्या मृदू स्वभावाची व व्यक्तिमत्त्वाची स्तुती केली. ते म्हणाले, आेम बिर्ला यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाकडे पद सोपवण्यात आले आहे. ते आपल्याला शिस्तीसाठी दिशा दाखवतील. त्याचबरोबर सभागृहदेखील व्यवस्थित चालवतील. किंबहुना अनुशासनाची नवीन उंचीही ते गाठतील. लोकसभेच्या सभापतिपदासाठी पूर्वी जास्त अडचणी असत. आता उलट झाले आहे.

राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर जास्त आव्हाने आहेत. सभागृहात बिर्ला हसतात तेव्हा अतिशय सौम्यपणे हसतात. त्यांचे बोलणेही विनम्र असते. त्यामुळेच मला कधी-कधी त्यांच्या मृदू स्वभावाचा, विवेकाचा कोणी गैरफायदा घेईल, अशी भीती वाटते, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधानांनी माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या कार्यपद्धतीचीही स्तुती केली. महाजन यांनीही उत्तम प्रकारे सभागृह हाताळले होते. त्या रागावत पण तेव्हाही त्या हसत, अशी आठवण मोदींनी सांगितली.


सामाजिक कार्याची स्तुती : मोदी म्हणाले, आेम बिर्ला यांना सभापतिपदाच्या आसनावर पाहणे माझ्यासाठी गर्वाचा विषय आहे. जुन्या सदस्यांना त्यांचा चांगला परिचय आहे. राजस्थानातील त्यांच्या कार्याची सर्वांना आेळख आहे. बिर्ला यांचे कोटा ही शिक्षणाची काशी बनलेली आहे. कोटा एक प्रकारे लघु भारत बनले आहे. आपली सर्वांची एक प्रतिमा असते. आेम यांची कार्यशैली समाजसेवेला केंद्रस्थानी ठेवणारी आहे. बिर्ला प्रसादम योजना चालवतात. गरिबांना भोजन देतात, असे गौरवोद॰गार मोदींनी काढले.

१७ पैकी १२ लोकसभा सभापती बिनविरोध
सामान्यपणे लोकसभेच्या सभापतिपदावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची निवड होते. त्या परंपरेनुसार पहिल्या लोकसभेपासून (१९५२) दहाव्या लोकसभेपर्यंत (१९९१) सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची बिनविरोध निवड झाली आहे. वास्तविक १९९६ ते २००९ पर्यंत ही परंपरा खंडित झाली होती. सत्ताधारी पक्षाने सहकारी पक्षांच्या सदस्यांकडे या पदाची धुरा सोपवली होती. विरोधी पक्षानेदेखील आपला उमेदवार उतरवला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा सुमित्रा महाजन यांची अविरोध निवड झाली होती.

शेरोशायरीने नूतन सभापतींना सदस्यांनी दिल्या शुभेच्छा

हंसी तेरे चेहरे पे रहे इस तरह, खुशबू फूलाें के साथ रहती है जिस तरह : अधीर रंजन
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभापतींना शायरीच्या ढंगात शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘खुदा से क्या मांगू तेरे वास्ते, सदा खुशियो से भरे हों तेरे वास्ते, हंसी तेरे चेहरे पे रहे इस तरह, खुशबू फूलाें के साथ रहती है जिस तरह’. कोटा येथील आठवणीही अधीर यांनी याप्रसंगी सांगितल्या. कोट्याच्या कचोरीसारखे सभागृहालाही स्वादिष्ट बनवा, असे आवाहन त्यांनी केले.

एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए हैं बिर्ला ओम :रामदास आठवले
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सभागृहात हास्यस्फोट घडवले. ‘एक देश का नाम है रोम, लोकसभा के अध्यक्ष बन गए हैं बिर्ला आेम.’ ‘लोकसभा काे आपको अच्छी तरह से चलाना है काम, वेल में आनेवालों का ब्लॅकलिस्ट डालना है नाम, नरेंद्र मोदी आैर आपका दिल है विशाल, राहुल आप रहो खुशहाल, हम सब मिलकर हाथ में लेते है एकता की मशाल।’

X
COMMENT