Home | National | Other State | Omar Abdullah stages sit in against Srinagar Jammu highway ban

जवानांच्या सुरक्षेबाबत उमर अब्दुल्ला अडून, 20 मिनिटे सैन्य वाहने रोखली

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2019, 12:46 PM IST

महेबूबा म्हणाल्या, लोकांनी महामार्ग बंदीचा आदेश अमान्य करावा

 • Omar Abdullah stages sit in against Srinagar Jammu highway ban

  श्रीनगर - नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी श्रीनगर -जम्मू राष्ट्रीय महामार्ग आठवड्यातून दोन दिवस सर्वसामान्य जनतेसाठी बंद ठेवण्याच्या निर्णयाविरोधात बुधवारी धरणे आंदोलन केले. प्रशासनाने सुरक्षा दलाच्या वाहतुकीसाठी हा आदेश काढला होता. उमर यांनी हातात फलक घेतला आहे. यावर “हायवे बॅन अनअॅक्सेप्टेबल’ असे वाक्य लिहिले होते. उमर अब्दुल्ला व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सुमारे २० मिनिटे लष्कराचा ताफा रोखून धरला. उमर म्हणाले, या तुघलकी फर्मानावर पुन्हा विचार करा, असे आम्ही सरकारला वारंवार सांगतो आहोत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसामान्य जनतेस वाहतुकीस अथवा बंदी टाकणे योग्य नाही. सैन्यदलानेही कधी याची मागणी केलेली नव्हती. माजी लष्करप्रमुख व्ही. पी. मलिक यांनीसुद्धा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयानेही याप्रकरणी संरक्षण, गृह व परिवहन मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दहा दिवसांत उत्तर मागवले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी व रविवारी पहाटेच्या ४ वाजेपासून सायंकाळी ५ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांना जाण्यास व येण्यास बंदी घातली आहे.


  गरजूंना परवानगी : प्रशासन
  लोकांना महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यास व येण्यास अधिकारी मदत करत आहेत. वैद्यकीय सेवा, पर्यटक, सरकारी कर्मचारी, शाळेच्या बस व कृषितज्ज्ञांसाठी बंदी लागू नाही. न्यायाधीशांनीही गरजूंना परमिट देण्याची व्यवस्था केली आहे.


  इंटरनेट सेवा झाली ठप्प
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चंद्रकांत शर्मा व त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या हत्येनंतर किश्तवाड व डोडा जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही संचारबंदी होती. या डोडा व किश्तवाडमध्ये इंटरनेट सेवा बंद होती. दळण-वळणातही अडथळा आला.


  निवडणुकीबाबत सुनावणी
  दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले, जम्मू-काश्मीरच्या नेत्यांनी महेबूबा मुफ्ती व उमर अब्दुल्ला यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येईल.


  ‘कोण कारवाई करतो ते पाहू’
  महामार्ग बंदीच्या आदेशाचे लोकांनी पालन करू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा महेबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केले आहे. या महामार्गावरून लोकांनी वाहने न्यावीत. कोण कारवाई करतो तेच आम्ही पाहून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकार वेळीच जागे झाले नाही तर काश्मीरची अवस्था इस्रायल अथवा पॅलेस्टाइनप्रमाणे होईल, असे त्या म्हणाल्या.

Trending