आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडरमधील गॅस कोंडीमुळे सांडले वितळलेले लोखंड, ५ जिवांची राख; अशी घडली दुर्घटना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जालना/चंदनझिरा - येथील एमआयडीसीतील ओमसाई राम स्टील कंपनीत लेडरमध्ये गॅस कोंडी होऊन वितळलेले लोखंड पडल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. अकुशल कामगारांच्या यंत्र हाताळणीमुळे ही घटना घडली. तीन वर्षांपूर्वीही एका कंपनीत अशीच दुर्घटना होऊन सात जणांचा बळी गेला होता. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून कामगारांचा मृत्यू नित्याचीच बाब बनली आहे. स्टील कंपन्यांमुळे जालना हे देशाच्या नकाशावर झळकले असले तरी येथील कामगारांची मात्र कायम उपेक्षा होत आलेली आहे. जीव धोक्यात घालून कामगारांना काम करावे लागते. नियमानुसार सुरक्षितता, विमा कवच कामगारांना देणे आवश्यक आहे. मात्र, त्याची साधी नोंदणीसुद्धा स्थानिक कामगार मंडळात केली जात नाही. काही लेबर कॉन्ट्रॅक्टर परप्रांतीय कामगारांचे जत्थेच्या-जत्थे घेऊन येतात. या कामगारांना कुठलेही तांत्रिक तसेच सुरक्षिततेबाबत अद्ययावत प्रशिक्षण दिले जात नाही. केवळ अनुभवी कामगारासोबत काही दिवस सहायक व त्यानंतर थेट त्याच्यावर कामाची जबाबदारी सोपवली जाते. वेतन तसेच कामाच्या वेळासुद्धा निश्चित नसल्यामुळे कामगार कल्याण दूरच राहते. शिवाय, अशा दुर्घटना घडल्यानंतर अनेकदा तक्रारही पोलिस ठाण्यात नोंदवली जात नाही. यामुळे वारसांना हक्कसुद्धा मागणे कठीण होऊन बसते. यामुळे कंपनी व्यवस्थापन लेबर कॉन्ट्रॅक्टरमार्फत वरच्या वर लाख-दीड लाख रुपये देऊन मृत कामगाराच्या नातेवाइकांची बोळवण करतात. साधारणपणे ट्रॅक, क्रेन मागे घेताना, विद्युत उपकरणांची हाताळणी करताना चूक झाल्यावर, तसेच सळईचा अंदाज न आल्यामुळे कामगार जखमी होतात. प्रसंगी त्यांना जीवही गमवावा लागतो. दुर्घटनेचा घटनाक्रम
 

  • ४.०० वाजता घडली दुर्घटना
  • ५.२० वा. तिघांचे मृतदेह आणले सामान्य रुग्णालयात
  • ५.२५ वाजता जखमींना नेले खासगी रुग्णालयात
  • ६.०० वाजता पीएसआय प्रमोद बोडले सामान्य रुग्णालयात दाखल
  • ६.१० वाजता पीआय श्यामसुंदर कोठाळे कंपनीत घटनास्थळी दाखल
  • ६.३२ वाजता डीवायएसपी सुधीर खिरडकर सामान्य रुग्णालयात
  • ७.३५ वाजता एसपी एस. चैतन्या, डीवायएसपी सुधीर खिरडकर, पीआय श्यामसुंदर कोठाळे सामान्य रुग्णालयात दाखल
  • १०.३३ वाजता चंदनझिरा पोलिस ठाण्यात ओमसाईरामच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मृतांची नावे

अजयकुमार  सहानी (४५), भरत रामदेव (३०), रामजितसिंग बीजवानसिंग (२१, ओम साईराम कंपनी, जालना) अंकुरकुमार, राजासिंग .
 

वितळलेले लोखंड बाहेर पडले 

भंगारपासून प्रथमत: वितळण्याची प्रक्रिया सुरू करताना लेडलमध्ये द्रव्य मिसळून घनरूप लोखंड तयार होते. यादरम्यान गॅस तयार होतो, तर गॅस बाहेर काढण्यासाठी छोटेसे छिद्र 
असते, ज्याला एक नळी जोडलेली असते. गुरुवारी झालेल्या अपघातात गॅस काेंडल्यामुळे वितळलेले लोखंड बाहेर फेकले गेले. हेच वितळलेले लोखंड आजूबाजूच्या कामगारांवर उडाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी सांगितले. 
 

तिघा जणांना घेतले ताब्यात

एस. पी. एस. चैतन्या म्हणाले, या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे. मात्र, अद्याप जखमींची ओळख पटलेली नाही, त्यामुळे नावेही समजेनात. तर, या घटनेच्या अनुषंगाने तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आताच सांगता येणार नाही, असेही चैतन्या यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...