आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • On Behalf Of 15 Lakh Aurangabadkar, Divya Marathi Ask Question All The Political Parties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे चुकीचा पायंडा; जनतेची काळजी घेणारे गृहखाते फडणवीसांकडे तरीही हजारो लोक वेठीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- १०० कोटींच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनासाठी आयोजकांनी गुरुवारी भररस्त्यात मुख्यत्र्यांची सभा घेऊन सहा तास औरंगाबादकरांना वेठीस धरले. गृह खाते त्यांच्याचकडे असूनही हा प्रकार घडला. टीव्ही सेंटर चौकात हा कार्यक्रम पार पडला. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. देशभरातील विविध पक्षांचे मोठे नेते शहरात येतील. त्यांच्या सभेसाठी इतर राजकीय पक्षही पोलिसांकडे रस्त्यावर सभा घेण्याचा आग्रह करतील, त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या याच सभेचा दाखला देतील. भररस्त्यात मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन चुकीचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न थेट सत्ताधाऱ्यांकडूनच झाला, त्याचाच हा परिणाम असेल. टीव्ही सेंटर चौकात ज्या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी ही सभा झाली तिथून काही फुटांवर मनपाचे मोठे मैदान आहे. या मैदानावर यापूर्वी मोठ्या सभा झाल्या आहेत. तरी मनपा आणि भाजपने रस्त्यावर सभा घेत सहा तास वाहतूक ठप्प केली. 

 

या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक वाहनधारकांनी हडको आणि टीव्ही सेंटर परिसरातील गल्लीबोळात वाहने टाकली. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. शिवाय कार्यक्रमाच्या काळात व्यापाऱ्यांनाही नाइलाजास्तव व्यवहार बंद ठेवावे लागले. सभा झाली त्या ठिकाणाच्या दोन्ही बाजूला चिंचोळ्या गल्ल्या आहेत. अनुचित प्रकार घडला असता तर लोकांना सहजासहजी बाहेर पडता आले नसते. शिवाय चेंगराचेंगरीचा धोकाही टाळता आला नसता. या सर्व प्रकारात पोलिसांचेही नियोजन बारगळल्याचे दिसून आले. भूमिपूजन कार्यक्रम आटोपल्यानंतर मागील बाजूने व्यासपीठावर जाताना झेड सेक्युरिटी असूनही मुख्यमंत्र्यांना कोंडीतून मार्ग काढावा लागला. पोलिस कमांडोनी केलेल्या धक्काबुक्कीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही दुखापत झाली. 

 

या ठिकाणी घेता आली असती सभा 
१ टीव्ही सेंटर चौकाला लागून मोठे मैदान आहे. तिथे ही सभा होऊ शकली असती. याच मैदानाजवळ भारतमाता क्रीडा मैदानही आहे. तिथे पार्किंगची व्यवस्था होऊ शकली असती. पोलिसांच्या आकडेवारीनुसार गुरुवारी झालेल्या सभेला नऊ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. तेवढी गर्दी या मैदानात सहज सामावू शकली असती. तिथे यापूर्वी शिवसेना, काँग्रेससह विविध पक्षांच्या सभा, अन्य मोठे कार्यक्रम झाले आहेत. 
२ याच भागात एम-२ परिसरात फरशी मैदान आहे. यापूर्वी तिथेही मोठ्या सभा आणि राजकीय पक्षांचे कार्यक्रम पार पडले आहेत. गुरुवारची मुख्यमंत्र्यांची सभा तिथेही होऊ शकली असती. असे झाले असते तर हा चुकीचा पायंडा पडला नसता. 

 

महिला पोलिस अधिकारी मंचावरून पडल्याची चर्चा, तसे काही झालेच नाही 
सभेच्या वेळी मुख्यमंत्री व्यासपीठावर जाताना कार्यकर्त्यांनी एकदम गोंधळ केला. त्यामुळे पोलिसांना त्यांना आवरणे कठीण झाले. त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की झाली. मात्र, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे आणि पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी या मंचावरून पडल्या नाहीत. गोंधळामुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून हे वृत्त पसरले. त्यामुळे तसे प्रकाशितही झाले. असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

गतवर्षी राष्ट्रवादी, मनसेला दिली नव्हती परवानगी 
३ फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले होते. विभागीय आयुक्तालयासमोर शरद पवारांची जाहीर सभा होती. तिचे व्यासपीठ रस्त्यावर येत असल्यामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आयोजकांनी व्यासपीठ बाजूला घेतल्यानंतर परवानगी देण्यात आली. 
२७ नोव्हेंबर : मनसेच्या दंडुका मोर्चाचे व्यासपीठही याच रस्त्यावर होते. वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे रस्त्यात हातगाडी लावणाऱ्यांवर पोलिस हेच गुन्हे नोंदवतात. 

 

मैदानातील कार्यक्रम लोकांना कळाला नसता 
बाजूला मैदानात कार्यक्रम घेतला असता तर तो नागरिकांना कळला नसता. विकास कामांची माहिती अधिकाअधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी चौकातील जागा निवडण्यात आली. यापूर्वीही या ठिकाणी अनेक राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. - नंदकुमार घोडेले, महापौर 

 

मनपाने ठरवले स्थळ 
हा सोहळा मनपाने आयोजित केला होता. स्थळनिश्चितीही त्यांनी केली, सहआयोजक म्हणून भाजपची भूमिका होती. नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिक व रहिवाशांची गैरसोय झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. - किशनचंद तनवाणी, शहरप्रमुख, भाजप 

 

रस्त्यांवर सभा घेणे टाळा 
या सभेसाठी वाहतूक शाखा व सिडको पोलिसांची परवानगी होती. रस्त्याची एक बाजू मोकळी राहावी असे नियोजन होते. शिवाय वाहतूकही वळवली होती. परंतु, राजकीय पक्षांनी मोकळ्या जागा किंवा मैदानावर सभा घ्याव्यात. वाहतूक कोंडी होणार नाही. याचा राजकीय पक्षांनी विचार करावा. डॉ. राहुल खाडे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-२